राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यादृष्टीने निवडणूक आयोगाकडून तयारी करण्यात आली आहे. गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी ठिकठिकाणी पथकं नेमून वाहनांची तपासणी केली जाते आहे. अशातच गेल्या दोन दिवसांपासून राजकीय नेत्यांच्या बॅग आणि हेलिकॉप्टरचीसुद्धा तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, तपास करणारे हे अधिकारी नेमके कोण आहेत? त्यांना कोणते अधिकार असतात? जर अशा तपासणीवेळी पैसे आढळून आल्यास, त्याचं पुढे काय होतं? या सगळ्यासंदर्भात छत्रपती संभाजीनंतरचे निवडणूक अधिकारी विकास मीणा यांनी माहिती दिली आहे. ते एबीपी माझा यावृत्तावाहिनीशी बोलत होते.

नेमकं काय म्हणाले विकास मीणा?

निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागू होते. त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी चार प्रकारची पथकं स्थापन केली जातात. यापैकी फ्लाईंग स्क्वाड टीम ( एफएसटी) आणि स्टॅटीक सर्विलन्स टीम ( एसएसटी ) ही दोन मुख्य पथकं असतात, याशिवाय नेत्यांच्या सभांवर लक्ष ठेवण्यासाठी व्हिडीओ रेकॉर्डीग टीम आणि भाषणं तपासण्यासाठी व्हिडीओ तपासणी टीम या दोन पथकांचाही समावेश असतो. लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत या पथकांची नियुक्ती केली जाते आहे. निडणुकीची घोषणा झाल्यापासून ते निकाल जाहीर होईपर्यंत ही पथकं कार्यरत असतात, असे मीणा यांनी सांगितलं.

हेही वाचा – IRCTC Refund Policy: ट्रेनची तिकीट रद्द केल्यावर किती ‘रिफंड’ मिळतो? जाणून घ्या सविस्तर

स्टॅटीक सर्विलन्स टीम ही रस्त्याने जाणाऱ्या वाहनांची तपासणी करते. या पथकांत चार कर्मचारी असतात. त्यापैकी वरिष्ठ अधिकाऱ्याला कार्यकारी दंडाधिकारींचे अधिकार प्रास्त असतात. एखाद्या ठिकाणी रोकड सापडली, तर त्याचा पंचनामा करण्याची जबाबदारी या अधिकाऱ्याची असते. याशिवाय आणखी एक सहायक अधिकारी, पोलीस अधिकारी आणि व्हिडीओग्राफर अशा चार जणांचा या पथकांत समावेश असतो, असेही ते म्हणाले.

सापडलेल्या पैशांचं पुढे काय होतं?

विकास मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक काळात जर एखाद्या व्यक्तीजवळ ५० हजारांच्यावर रोकड सापडली, तर त्या व्यक्तीला ती कुठून आली, याचा पुरावा द्यावा लागतो. जर अधिकाऱ्यांना काही संशय आला, तर ती रोकड जप्त केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जिल्हापातळीवरील एका समितीसमोर संबंधित व्यक्तीला बोलावले जाते. त्याची चौकशी केली जाते. जर त्या व्यक्तीने योग्य पुरावे सादर केले, तर ती रक्कम त्याला लगेच किंवा निवडणूक झाल्यानंतर परत केली जाते. जर संबंधित व्यक्तीने योग्य ते पुरावे सादर केले नाहीत, तर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार पुढील तपास केला जातो. नवीन नियमानुसार जर जप्त केलेली रोकड १० लाखांपेक्षा जास्त असेल, तर ते प्रकरण आयकर विभागाकडे हस्तांतर केलं जातं.

निवडणूक काळात कोणत्या वाहनांची तपासणी केली जाते?

कोणत्या वाहनांची तपासणी करावी, याचा निर्णय स्टॅटीक सर्विलन्स टीममधील अधिकाऱ्यांना घ्यावा लागतो. त्यांना ज्या वाहनांवर संशय असेल, त्या वाहनांना थांबवून ते तपासणी करू शकतात, असं मीणा यांनी सांगितलं.

हेही वाचा – आता बँक खाते नसलेला व्यक्ती करू शकतो UPIचा वापर; NPCIने कुटुंबातील सदस्यांसाठी सुरू केलं UPI Circle, जाणून घ्या नव्या फीचरबद्दल…

हेलिकॉप्टरचा तपास कोणते अधिकारी करतात? ते कोणत्या पथकांत असतात?

व्हीआयपी नेते प्रचारासाठी येतात. तेव्हा फ्लाईंग स्क्वाड टीम आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग टीम त्याठिकाणी जातात. या नेत्यांबरोबर आलेल्या बॅगांची तपासणी हे अधिकारी करतात. या संपूर्ण प्रक्रियेची व्हिडीओ रेकॉर्डिंग केली जाते, असेही ते म्हणाले.

Story img Loader