Why Do Elevators Have Mirrors: लिफ्टमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेकांची नजर आपोआप आरशाकडे जाते. केस व्यवस्थित आहेत का, चेहरा ठीक दिसतोय का, कपडे नीट आहेत का, हे पाहण्यासाठी काही जण आरशात स्वतःचं प्रतिबिंब पाहतात, तर काही जण लिफ्टच्या आरशासमोर उभं राहून चक्क फोटोही काढतात, त्यामुळे लिफ्टमध्ये आरसा असण्यामागचं कारण केवळ स्वतःला पाहणं किंवा फोटो काढणं असावं असं आपल्याला वाटतं.

पण, लिफ्टमधील हा आरसा केवळ सौंदर्यासाठी किंवा सेल्फीसाठी लावलेला नसतो. त्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. खरं कारण जाणून घेतल्यानंतर तुम्ही पुढच्या वेळी लिफ्टमधील आरशाकडे वेगळ्याच नजरेने पाहाल.

लहान जागा मोठी वाटावी म्हणून आरसा

लिफ्टची जागा साधारणपणे खूपच मर्यादित असते. एकाच वेळी अनेक लोक आत उभे राहिल्यामुळे कोंदटपणा जाणवू शकतो. काही लोकांना बंद आणि अरुंद जागेमुळे अस्वस्थताही वाटते.

अशा वेळी आरसा महत्त्वाची भूमिका बजावतो. आरशामुळे लिफ्टच्या आतील जागेचं प्रतिबिंब तयार होतं आणि ती जागा प्रत्यक्षापेक्षा मोठी असल्याचा भास होतो. समोरची भिंत आणखी मागे गेल्यासारखी दिसते, त्यामुळे लिफ्टमधील कोंदटपणा आणि बंदिस्तपणाची भावना काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते.

लिफ्टमध्ये उजेडही वाढतो

आरशाचा आणखी एक फायदा म्हणजे लिफ्ट अधिक प्रकाशमान आणि मोकळी वाटते. लिफ्टमधील दिव्यांचा प्रकाश आरशावर पडून परावर्तीत होतो, त्यामुळे आतली जागा अधिक उजळ दिसते.

कल्पना करा, छोट्याशा लिफ्टमध्ये काही लोक उभे आहेत आणि आत पुरेसा प्रकाशही नाही. अशा परिस्थितीत जागा आणखी लहान आणि अस्वस्थ करणारी वाटू शकते. आरशामुळे हा अनुभव काही प्रमाणात बदलतो.

खरं तर लहान जागा मोठी आणि खुली दिसावी यासाठी आरशांचा वापर वास्तुरचनेत अनेक वर्षांपासून केला जात आहे. घरं, दुकानं, कार्यालयं अशा अनेक ठिकाणी याच युक्तीचा वापर केला जातो.

लिफ्टचा प्रवास कंटाळवाणा होऊ नये म्हणूनही उपयोग

लिफ्टचा प्रवास काही सेकंदांचाच असतो, पण अनोळखी लोकांसोबत एका छोट्याशा बंद जागेत शांत उभं राहिल्यावर हे काही सेकंदही मोठे वाटू शकतात.

पूर्वी लिफ्टचा वेग तुलनेने कमी असल्याने प्रवासाला जास्त वेळ लागत असे, त्यामुळे लोकांना लिफ्टचा प्रवास कंटाळवाणा वाटत असे. आरशामुळे मात्र या वेळेत लोकांना स्वतःकडे पाहता येतं, कपडे व्यवस्थित करता येतात किंवा आजूबाजूला पाहता येतं.

म्हणजेच आरसा हा लिफ्टमधील त्या काही क्षणांचा कंटाळा कमी करण्यासाठीही उपयोगी ठरतो.

व्हीलचेअर वापरणाऱ्यांसाठी आरसा ठरतो महत्त्वाचा

लिफ्टमधील आरशाचा सर्वांत महत्त्वाचा उपयोग व्हीलचेअर वापरणाऱ्या व्यक्तींसाठी होतो. लिफ्टमधून बाहेर पडताना मागे काय आहे, दरवाजा कुठे आहे किंवा बाहेरची जागा मोकळी आहे का, हे पाहणं त्यांच्यासाठी नेहमीच सोपं नसतं.

आरशामुळे मागची जागा न वळताही पाहता येते, त्यामुळे लिफ्टमधून आत-बाहेर जाताना अधिक सुरक्षितपणे हालचाल करता येते. यामुळे इतरांच्या मदतीवर अवलंबून राहण्याची गरज कमी होते आणि त्यांचा स्वतःहून हालचाल करण्याचा आत्मविश्वास वाढतो.

मग पुढच्या वेळी लिफ्टमधील आरसा पाहाल तेव्हा…

लिफ्टमधील आरसा दिसला की स्वतःचा चेहरा पाहणे किंवा फोटो काढणे यात काहीच गैर नाही. मात्र, त्यामागे केवळ सौंदर्य पाहण्याचा उद्देश नाही. लिफ्टमधील जागा मोठी आणि प्रकाशमान भासवणे, कोंदटपणाची भावना कमी करणे, प्रवासातील कंटाळा कमी करणे आणि व्हीलचेअर वापरणाऱ्या व्यक्तींना सुरक्षित हालचालीस मदत करणे अशी अनेक कारणे त्यामागे आहेत, म्हणूनच पुढच्या वेळी लिफ्टमध्ये उभे राहून आरशात स्वतःचं प्रतिबिंब दिसलं तर लक्षात ठेवा-तो आरसा तुमचा चेहरा दाखवण्यासाठी जितका आहे, तितकाच तो लिफ्टमधील अनुभव अधिक आरामदायी आणि सुरक्षित करण्यासाठीही महत्त्वाचा आहे.