Dogs Chasing Bikes at Night: रात्री उशिरा बाईक किंवा कारने प्रवास करताना अचानक एखादा कुत्रा जोरात भुंकत तुमच्या गाडीच्या मागे धावू लागला असा अनुभव अनेकांना आला असेल. काही वेळेला तर एखादा कुत्रा भुंकायला सुरुवात करताच संपूर्ण परिसरातील कुत्रे एकत्र येतात आणि गाडीचा पाठलाग करू लागतात, त्यामुळे वाहनचालक घाबरून जातात; काहींचा तोल जातो आणि अपघात होण्याची शक्यताही वाढते.

पण तुम्ही कधी विचार केला आहे का, कुत्रे नेमकं असं का करतात? ते माणसांना शत्रू समजतात का? की त्यांच्या या वागण्यामागे काही वेगळंच कारण दडलं आहे? विशेष म्हणजे यामागे एक वैज्ञानिक कारण असल्याचं सांगितलं जातं. हे कारण समजल्यानंतर तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.

कुत्र्यांची वास ओळखण्याची क्षमता असते अफाट

कुत्र्यांची घ्राणशक्ती म्हणजेच वास ओळखण्याची क्षमता अत्यंत तीव्र असते. माणसांच्या तुलनेत कुत्रे अनेक पटींनी अधिक प्रभावीपणे वास ओळखू शकतात; म्हणूनच सैन्य, पोलिस दल, बॉम्ब शोधक पथक किंवा गुन्हे अन्वेषणात कुत्र्यांची मदत घेतली जाते.

कुत्रे केवळ माणसांचा नाही तर वस्तू, जागा आणि वाहनांचाही वास लक्षात ठेवतात. प्रत्येक परिसरातील कुत्र्यांचा स्वतःचा एक ‘इलाका’ किंवा हद्द असते. त्या भागावर त्यांचा नैसर्गिक हक्क असल्यासारखं ते वागतात, त्यामुळे त्या भागात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर ते बारकाईने लक्ष ठेवतात.

गाड्यांच्या टायरशी काय असतो संबंध?

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाड्यांच्या टायरवर कुत्रे लघवी करताना दिसतात. ही केवळ सवय नसून त्यामागे त्यांच्या ‘सीमा चिन्हांकित’ करण्याची प्रवृत्ती असते. कुत्रे त्यांच्या परिसरातील वाहनांचा वास अशाच प्रकारे लक्षात ठेवतात.

जेव्हा रात्री उशिरा दुसऱ्या भागातील एखादी बाईक किंवा कार त्या परिसरात प्रवेश करते, तेव्हा कुत्र्यांना लगेच त्या वाहनाचा वास वेगळा जाणवतो. त्यांना ती गाडी ‘आपल्या भागातील नाही’ हे समजतं. त्यानंतर ते त्या वाहनाच्या मागे धावू लागतात. काही वेळा ते फक्त भुंकतात, तर काही वेळा आक्रमकही होऊ शकतात.

कुत्रे रात्रीच जास्त का धावतात?

रात्रीच्या वेळी परिसर शांत असतो. वाहने कमी असतात आणि कुत्रे अधिक सतर्क असतात, त्यामुळे एखाद्या अनोळखी वाहनाचा आवाज किंवा वास त्यांना पटकन जाणवतो. शिवाय रात्री कुत्रे त्यांच्या हद्दीबाबत अधिक सजग असतात, त्यामुळेच रात्री गाडीच्या मागे कुत्रे धावण्याचे प्रकार अधिक दिसून येतात.

अशावेळी घाबरून काय चूक करू नये?

अनेक वाहनचालक कुत्रे मागे लागले की घाबरून वेग वाढवतात. पण, हीच सर्वात मोठी चूक ठरू शकते. कारण घाईत वाहनाचा ताबा सुटण्याची शक्यता वाढते. काही वेळा अचानक ब्रेक मारल्याने किंवा घाबरून वळण घेतल्याने गंभीर अपघात होऊ शकतो.

तज्ज्ञांच्या मते, अशावेळी शक्यतो शांत राहणं महत्त्वाचं असतं. गाडीचा वेग नियंत्रणात ठेवावा. कुत्र्यांकडे दगड मारणे किंवा त्यांना चिडवण्याचा प्रयत्न करू नये. बहुतांश वेळा काही अंतरानंतर कुत्रे स्वतःच मागे फिरतात.

अपघातांचा धोकाही वाढतो

अनेकदा कुत्र्यांपासून वाचण्याच्या प्रयत्नात वाहनचालक घसरतात किंवा दुसऱ्या वाहनाला धडकतात. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा प्रकार अधिक धोकादायक ठरू शकतो, त्यामुळे रात्री अनोळखी भागातून प्रवास करताना अधिक सावध राहणं आवश्यक मानलं जातं.

कुत्र्यांचं हे वर्तन माणसांविषयी द्वेषामुळे नसून त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तीचा भाग असल्याचं सांगितलं जातं, त्यामुळे पुढच्या वेळी रात्री एखादा कुत्रा तुमच्या गाडीच्या मागे धावताना दिसला तर त्यामागचं खरं कारण तुम्हाला नक्कीच माहिती असेल!