Why Do Indian Trains Have An “X” Mark on the Last Coach: भारतातील रेल्वे ही आज सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेलं विशाल रेल्वे जाळं दररोज कोट्यवधी प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवतं. अनेक जण रोज रेल्वेने प्रवास करतात. काहीजण खिडकीतून बाहेर पाहत प्रवासाचा आनंद घेतात, तर काहीजण स्टेशनवर उभं राहून धावत्या रेल्वेकडे कुतूहलाने पाहतात.

मात्र, रेल्वेच्या प्रवासादरम्यान अनेक अशा गोष्टी आपल्या नजरेस पडतात, ज्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही. त्यापैकीच एक म्हणजे रेल्वेच्या अगदी शेवटच्या डब्यावर मोठ्या आकारात रंगवलेलं ‘X’ चिन्ह. हे चिन्ह तुम्हीही अनेकदा पाहिलं असेल. पण, कधी विचार केला आहे का की ते नेमकं का असतं? ते फक्त ओळख म्हणून असतं की त्यामागे आणखी काही महत्त्वाचं कारण दडलं आहे? याच प्रश्नाचं उत्तर अनेकांना आश्चर्यचकित करणारं ठरू शकतं. खरं तर रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर असलेलं ‘X’ हे कोणतंही सजावटीचं चिन्ह नसतं. रेल्वेच्या सुरक्षिततेशी त्याचा थेट संबंध असतो. रेल्वे प्रशासनासाठी हे चिन्ह अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं.

रेल्वे एखाद्या स्टेशनमधून किंवा विशिष्ट रेल्वेमार्गातून पूर्णपणे गेली आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी या चिन्हाचा उपयोग केला जातो. स्टेशनवरील कर्मचारी जेव्हा शेवटच्या डब्यावरचं ‘X’ पाहतात, तेव्हा त्यांना खात्री होते की संपूर्ण रेल्वे सुरक्षितपणे पुढे गेली आहे आणि कोणताही डबा मागे राहिलेला नाही.

विशेष म्हणजे धुके, मुसळधार पाऊस किंवा रात्रीच्या वेळी दृष्यमानता कमी असते. अशा परिस्थितीतही हे चिन्ह रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी मदत ठरतं, त्यामुळे कोणताही गैरसमज किंवा तांत्रिक अडचण निर्माण होण्याची शक्यता कमी होते.

यामागे आणखी एक महत्त्वाचं कारण आहे. समजा एखाद्या कारणामुळे रेल्वेचा एखादा डबा मार्गात वेगळा झाला, तर शेवटच्या डब्यावर अपेक्षित असलेलं ‘X’ चिन्ह दिसणार नाही. अशा वेळी रेल्वे कर्मचाऱ्यांना तात्काळ काहीतरी बिनसलं असल्याचा इशारा मिळतो आणि पुढील कारवाई जलदगतीने करता येते.

फक्त ‘X’ चिन्हच नाही, तर रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर इतरही काही संकेत दिलेले असतात. दिवसा ‘LV’ म्हणजेच ‘लास्ट व्हेईकल’ अशी पाटी लावली जाते, तर रात्रीच्या वेळी लाल रंगाचा चमकणारा दिवा लावला जातो, त्यामुळे दूरवरूनही रेल्वेचा शेवटचा डबा सहज ओळखता येतो.

विशेष बाब म्हणजे हे ‘X’ चिन्ह अनेकदा परावर्तीत रंग किंवा रेडियमसारख्या पदार्थांनी रंगवलेलं असतं; त्यामुळे अंधारात, धुक्यात किंवा कमी प्रकाशातही ते स्पष्टपणे दिसतं.

पुढच्या वेळी तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल किंवा एखादी रेल्वे जाताना पाहत असाल तर तिच्या शेवटच्या डब्याकडे एकदा नक्की लक्ष द्या, कारण साधंसं दिसणारं हे ‘X’ चिन्ह प्रत्यक्षात रेल्वे सुरक्षेतील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि हीच ती रोचक माहिती आहे, जी लाखो प्रवाशांच्या नजरेसमोर रोज असते; पण फार कमी लोकांना तिचं खरं महत्त्व माहिती असतं.