Why Is a Red Ribbon Always Cut During an Inauguration: नवीन दुकान असो, मोठा मॉल असो, रुग्णालय असो किंवा एखादा भव्य पूल… उद्घाटनाचा कार्यक्रम म्हटला की एक गोष्ट हमखास दिसते. मोठी कात्री, समोर बांधलेली रिबन आणि ती कापण्यासाठी आलेले मान्यवर. रिबन कापताच टाळ्यांचा कडकडाट होतो आणि नव्या सुरुवातीची घोषणा केली जाते.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का, उद्घाटनावेळी नेहमी लाल रंगाचीच रिबन का कापली जाते? पिवळी, हिरवी किंवा निळी रिबन का वापरली जात नाही? यामागे केवळ परंपरा नाही तर एक अतिशय रंजक इतिहास आणि खास अर्थ दडलेला आहे.
आज जगभरात रिबन कापून उद्घाटन करण्याची पद्धत लोकप्रिय झाली आहे. कोणत्याही नवीन प्रकल्पाची सुरुवात या छोट्याशा विधीने केली जाते. मात्र, ही परंपरा नेमकी कधी सुरू झाली याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही.
काही अहवालांनुसार ही परंपरा १९व्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेत सुरू झाली. असे मानले जाते की सुमारे १८९८ च्या सुमारास लुईझियाना रेल्वे मार्गाच्या उद्घाटनावेळी रिबन कापण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर पूल, रेल्वे मार्ग आणि इतर मोठ्या विकासकामांच्या उद्घाटनात ही पद्धत रूढ झाली.
विशेष म्हणजे युरोपातील काही जुन्या विवाह परंपरांमध्येही नव्या घराच्या प्रवेशद्वारावर बांधलेली रिबन कापण्याची प्रथा होती. त्याचा अर्थ नव्या आयुष्याची सुरुवात आणि अडथळ्यांवर मात असा घेतला जात असे.
इतकेच नाही तर प्राचीन रोमन संस्कृतीतही मोठ्या बांधकामांच्या पूर्णत्वानंतर दोरी किंवा रिबनसदृश वस्तू कापण्याचे उल्लेख आढळतात. अर्थात, आजच्या आधुनिक रिबन कटिंगसारखी ती पद्धत नव्हती.
काळ बदलला, तंत्रज्ञान बदलले पण उद्घाटनाची ही परंपरा कायम राहिली. भारतात तर ती इतकी लोकप्रिय झाली आहे की दुकानापासून ते सरकारी योजनांपर्यंत प्रत्येक ठिकाणी लाल रिबन कापूनच उद्घाटन केले जाते.
मात्र आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न… लाल रिबनच का?
यामागील कारण अतिशय रोचक आहे. जगातील अनेक संस्कृतींमध्ये लाल रंग हा शुभ, समृद्धी, उत्साह, यश आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. भारत, चीन आणि अनेक आशियाई देशांमध्ये लाल रंगाला विशेष महत्त्व आहे. कोणत्याही शुभ कार्यात लाल रंगाचा वापर केला जातो.
तसेच लाल रंग दूरवरून लगेच लक्ष वेधून घेतो, त्यामुळे उद्घाटनाचे फोटो, व्हिडीओ आणि प्रसारमाध्यमांमधील दृश्ये अधिक आकर्षक दिसतात. काही बौद्ध परंपरांमध्ये लाल रंग नकारात्मकता आणि अडथळ्यांचे प्रतीक मानला जातो, त्यामुळे लाल रिबन कापणे म्हणजे अडथळे दूर करून नव्या वाटेची सुरुवात करणे, असा त्यामागील अर्थ सांगितला जातो,
म्हणूनच पुढच्या वेळी तुम्ही एखाद्या उद्घाटन समारंभात लाल रिबन पहाल तेव्हा लक्षात ठेवा… ती फक्त एक रिबन नसते तर नव्या सुरुवातीचे, यशाचे आणि शुभतेचे प्रतीक असते.
