How Did Swargate in Pune Get Its Name: पुणे म्हटलं की, डोळ्यांसमोर उभं राहतं ते इतिहास, संस्कृती, पेशवाईचा वारसा आणि कायम गजबजलेलं शहर. या शहरातील प्रत्येक पेठ, प्रत्येक रस्ता आणि प्रत्येक चौकाच्या नावामागे एखादी रंजक कथा दडलेली आहे. पुणेकरांच्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेलं एक ठिकाण म्हणजे स्वारगेट. हजारो लोक दररोज या ठिकाणावरून प्रवास करतात, बस पकडतात, कामानिमित्त धावपळ करतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का, या ठिकाणाला ‘स्वारगेट’ हे नाव नेमकं कसं पडलं?
पहिल्यांदा ऐकल्यावर हे नाव अनेकांना थोडं वेगळं वाटतं. काहींना वाटतं ‘स्वर्ग’ या शब्दाशी त्याचा संबंध असेल; पण प्रत्यक्षात या नावामागे दडलाय एक ऐतिहासिक आणि थरारक प्रवास. आजची प्रचंड वर्दळ असलेली जागा एकेकाळी पुण्याच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात होती.
लेखक सुप्रसाद पुराणिक यांनी ‘नावामागे दडलंय काय?’ या त्यांच्या पुस्तकात पुण्यातील अनेक ठिकाणांच्या नावांमागचा इतिहास उलगडून सांगितला आहे. त्यात त्यांनी स्वारगेटच्या नावाची गोष्टही सांगितली आहे. त्यांच्या मते, पूर्वी पुण्यात प्रवेश करण्यासाठी काही ठरावीक मार्ग होते आणि त्यापैकी एक महत्त्वाचा मार्ग आजच्या स्वारगेट परिसरातून जात असे. त्या काळात पुण्याची वस्ती वाढत होती, नवीन पेठा निर्माण होत होत्या आणि शहर हळूहळू विस्तारत होतं.
त्या वेळी शहराच्या सुरक्षेला खूप महत्त्व दिलं जात असे. गावाबाहेर विविध ठिकाणी पहारेकऱ्यांच्या चौक्या उभारल्या जात आणि तिथे घोडेस्वार सैनिक तैनात केले जात. हे घोडेस्वार सतत गस्त घालत असत. कोण शहरात येतंय, कोण बाहेर जातंय, यावर त्यांची नजर असे. या ठिकाणांना त्या काळी ‘नाके’ किंवा ‘चौक्या’, असं म्हटलं जात होतं.
याच घोडेस्वारांमुळे या परिसराची वेगळी ओळख निर्माण झाली. पुढे इंग्रजांच्या काळात प्रशासन पद्धतीत बदल झाले. कोतवाली व्यवस्था बंद होऊन पोलीस यंत्रणा अस्तित्वात आली. त्या काळात ‘नाके’ किंवा ‘चौकी’ यांना इंग्रजीत ‘गेट’ असं संबोधलं जाऊ लागलं. त्यामुळे घोडेस्वारांची चौकी असलेलं हे ठिकाण पुढे ‘स्वारगेट’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. ‘स्वार’ म्हणजे घोडेस्वार आणि ‘गेट’ म्हणजे प्रवेशद्वार अशा प्रकारे या नावाचा जन्म झाला.
इतिहासात स्वारगेटला अनन्यसाधारण महत्त्व होतं. इ.स. १६६० मध्ये शाहिस्तेखान पुण्यात आला तेव्हा कात्रज घाट उतरल्यावर त्याने पहिली मोठी गस्तीची चौकी याच परिसरात उभारल्याची नोंद आढळते. त्या काळी हा भाग रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. पुढे छत्रपती शाहू महाराजांनी सातारा राजधानी केल्यानंतर पुण्याहून साताऱ्याकडे जाणारा महत्त्वाचा मार्गही याच नाक्यावरून जात असे.
पेशवाईच्या काळात या चौकीचा उपयोग केवळ सुरक्षेसाठीच नाही, तर जकात वसूल करण्यासाठी आणि प्रवाशांची तपासणी करण्यासाठीही केला जात होता. म्हणजे आज जिथे बसच्या रांगा आणि वाहनांची गर्दी दिसते, तिथे एकेकाळी घोड्यांच्या टापांचा आवाज घुमत होता.
आजचं स्वारगेट हे पुण्याच्या वाहतुकीचं प्रमुख केंद्र बनलं आहे. एसटी बसस्थानक, पीएमपीएमएल बस सेवा आणि मेट्रोमुळे या भागाचं महत्त्व आणखी वाढलं आहे. दिवस-रात्र गजबजलेलं हे ठिकाण पुण्याच्या धावत्या जीवनाचं प्रतीक बनलं असलं तरी त्यामागे दडलेला इतिहास अनेकांना माहीत नाही.
आज घोडेस्वार नाहीत, पहारेकऱ्यांच्या चौक्या नाहीत; पण ‘स्वारगेट’ हे नाव अजूनही त्या ऐतिहासिक वारशाची साक्ष देत उभं आहे.
