Why Train Wheels Are Not Painted: भारतात रेल्वे हा केवळ प्रवासाचा पर्याय नाही, तर तो लाखो लोकांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. स्वस्त, सोयीस्कर आणि लांब पल्ल्याचा विश्वासार्ह प्रवास म्हणून रेल्वेची निवड आजही मोठ्या प्रमाणावर केली जाते. देशभर पसरलेलं विस्तीर्ण रेल्वे जाळं शहरांना, गावांना आणि माणसांना जोडतं.
आपण सगळ्यांनी कधी ना कधी ट्रेनने प्रवास केला असेलच. खिडकीतून बाहेर पाहताना, स्टेशनवर उभं राहून ट्रेनकडे पाहताना किंवा प्लॅटफॉर्मवर थांबलेली गाडी न्याहाळताना एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली आहे का? ट्रेनचे डबे रंगीबेरंगी असतात, पण त्याच ट्रेनच्या चाकांवर मात्र कुठलाही रंग नसतो. हा फरक का? आणि त्यामागचं खरं कारण काय आहे? याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला थोडं आश्चर्यचकित करू शकतं…
डबे रंगीत… पण चाके का नाहीत?
ट्रेनचे कोच आकर्षक रंगांनी रंगवलेले असतात कधी निळे, कधी लाल, कधी पांढरे. हे रंग केवळ सौंदर्यासाठी नसतात तर ओळख आणि संरक्षणासाठीही उपयोगी ठरतात. पण, जेव्हा नजर खाली जाते तेव्हा चाके मात्र पूर्णपणे साधी, न रंगवलेली दिसतात. हे फक्त दिसण्याचा मुद्दा नाही… यामागे अत्यंत महत्त्वाचे तांत्रिक आणि सुरक्षिततेचे कारण दडलं आहे.
कारण क्रमांक १: प्रचंड घर्षण आणि वजन
ट्रेनची चाके ही सतत प्रचंड दाब आणि घर्षण सहन करत असतात. हजारो टन वजन उचलणाऱ्या या चाकांचा सतत रेल्वे रूळांशी संपर्क असतो.
जर या चाकांवर रंग लावला तर तो काही दिवसांतच घासून निघून जाईल, म्हणजेच वारंवार रंगकाम करावं लागेल जे वेळखाऊ आणि खर्चिक ठरेल; म्हणूनच चाकांना रंग न लावणं हे अधिक व्यवहार्य ठरतं.
कारण क्रमांक २ : सूक्ष्म भेगा ओळखणं सोपं
हे कारण सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. ट्रेनच्या चाकांमध्ये कधी कधी सूक्ष्म भेगा (cracks) निर्माण होऊ शकतात. या भेगा वेळेवर दिसल्या नाहीत तर मोठा अपघात घडू शकतो. जर चाकांवर रंग असेल तर या भेगा सहज दिसणार नाहीत. पण, न रंगवलेल्या धातूच्या पृष्ठभागावर अगदी छोटी भेगही स्पष्टपणे दिसते, म्हणजेच रंग नसल्यामुळे तपासणी अधिक अचूक आणि सुरक्षित होते.
कारण क्रमांक ३ : तापमान ओळखणं सोपं
ट्रेनची चाके सतत चालू असल्यामुळे गरम होतात. काही वेळा तापमान जास्त वाढल्यास धोका निर्माण होऊ शकतो. न रंगवलेल्या चाकांवरून तज्ज्ञांना त्यांच्या तापमानाचा अंदाज सहज घेता येतो. रंग लावला असता तापमानातील बदल ओळखणं कठीण झालं असतं, त्यामुळे रंग नसलेली चाकं म्हणजे सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचा उपाय आहे.
फक्त साधेपणा नाही, तर सुरक्षिततेचा भाग
पहिल्या नजरेत ही गोष्ट साधी वाटू शकते, “चाकांना रंग नाही.” पण, यामागे प्रवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित मोठं गणित आहे. रेल्वे प्रशासनासाठी प्रत्येक छोटा निर्णय महत्त्वाचा असतो आणि चाकांना रंग न लावणं हा त्याचाच एक भाग आहे.
शेवटी एक विचार करायला लावणारी गोष्ट…
पुढच्या वेळी तुम्ही ट्रेनने प्रवास कराल तेव्हा फक्त खिडकीतून बाहेरचं पाहू नका, थोडं खालीही पाहा. ज्या साध्या दिसणाऱ्या चाकांवर संपूर्ण ट्रेन धावते, त्यामागे किती मोठं विज्ञान आणि सुरक्षिततेचं तंत्र दडलं आहे याची तुम्हाला नक्की जाणीव होईल!
एक छोटासा प्रश्न… पण उत्तर मात्र खूप मोठं!
