एका श्रीलंकन घराच्या परसदारात विहीर खोदण्याचं काम सुरु असताना कामगारांना अत्यंत भव्य असा नीलम रत्नाचा दगड सापडला आहे. हे जगातील सर्वात मोठं नीलम रत्न असल्याचा दावा केला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या भव्य रत्नाची किंमत सुमारे १० कोटी डॉलर (७४० कोटी रुपये) रुपये इतकी असल्याचं सांगण्यात येत आहे. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, २५ लाख कॅरेटचं हे रत्न जगातील सर्वात मोठं नीलम रत्न आहे. श्रीलंकेतील रत्नापुरा शहरातील तिसऱ्या पिढीतील रत्न व्यापाऱ्याच्या घराच्या परसदारात हे भव्य रत्न सापडलं आहे. खरंतर, रत्नापुरा हे शहर जेम सिटी म्हणून ओळखलं जातं. इथे यापूर्वी देखील अनेक मौल्यवान दगड सापडले होते. ५१० किलो वजन आणि तब्बल २५ लाख कॅरेटचा 'सेरेंडिपिटी सफायर' सुमारे ५१० किलो वजनाच्या आणि तब्बल २५ लाख कॅरेटच्या या नीलम रत्नाच्या दगडाला तज्ज्ञांनी 'सेरेंडिपिटी सफायर' असं नाव दिलं आहे. दरम्यान, या भव्य नीलम रत्नाचे मालक आणि मौल्यवान रत्नांचे तिसऱ्या पिढीतील व्यापारी असलेल्या डॉ. गामागे यांनी सुरक्षेच्या कारणास्तव आपलं पूर्ण नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं कि, "माझ्याकडे विहिरीचं खोदकाम करण्यासाठी आलेला जो माणूस होता त्याने आम्हाला खोदकामादरम्यानच जमिनीखाली कोणतं तरी अमूल्य रत्न असल्याबद्दल माहिती दिली होती. त्यानंतर, जमिनीतील हे भव्य रत्न बाहेर काढण्यात ते यशस्वी झाले." डॉ. गामागे यांनी आपल्याला सापडलेल्या या रत्नाबाबत प्रशासनाला माहिती दिली होती. परंतु, याच्या विश्लेषण आणि नोंदणीपूर्वी हा दगड स्वच्छ करण्यासाठी, त्यावरील सर्व माती-मळ काढून टाकण्यासाठी जवळपास एक वर्षभराचा कालावधी गेला. त्यानंतरच त्याचे विश्लेषण होऊन तो प्रामाणिक करण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत रत्नशास्त्रज्ञ डॉ. गमिनी झोयसा यांनी बीबीसीशी बोलताना असं सांगितलं आहे कि, "मी यापूर्वी कधीही एवढा मोठा रत्नाचा नमुना पाहिलेला नाही. हा बहुधा सुमारे ४०० दशलक्ष वर्षे जुना असावा." अत्यंत उच्चश्रेणीमधील मौल्यवान दगड डॉ. गामागे यांनी असंही सांगितल्याची माहिती मिळते की, या दगडाच्या सफाईदरम्यान त्यामधून नीलमचे काही तुकडे तुटून पडले होते. त्यांचे विश्लेषण केल्यानंतर हे अत्यंत उच्चश्रेणीमधील मौल्यवान दगड असल्याचं दिसून आलं. श्रीलंका हा जगभरात नीलमचे दगड आणि अन्य मौल्यवान रत्नांचा निर्यातदार देश आहे. ह्यातून हा देश मोठी कमाई करतो. श्रीलंकेच्या नॅशनल जेम अँड ज्वेलरी अथॉरिटीचे अध्यक्ष थिलक वीरसिंगे यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं कि, "हा एक स्पेशल स्टार नीलम रत्नाचा नमुना आहे, जो जगातील सर्वात मोठा असू शकतो. एकंदर या रत्नाचा आकार आणि मूल्य पाहिलं तर आम्हाला वाटतं की हा प्रायव्हेट कलेक्टर्स किंवा म्युझियम्सना अधिक आवडेल."