भारतात शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे लोक आहेत. दोन्ही प्रकारचे लोक असले तरी भारतात शाहाकारी लोकांची संख्या जगात सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे भारतात प्रत्येक संस्कृतीनुसार, वेगवेगळे शाकाहारी पदार्थ पाहायला मिळतात. त्यामुळे देशात मांसाहाराबरोबरच शाकाहारी पाककला तितक्याच आवडीने जपली जात आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, जगातील सर्वात जुने शाकाहारी रेस्टॉरंट कुठे आहे? अनेकांना याचे उत्तर ठावूक नसेल, पण आम्ही तुम्हाला सांगतो, जगातील सर्वात जुने शाकाहारी रेस्टॉरंट भारतात नाही तर स्वित्झर्लंडमध्ये आहे. चला तर मग, या रेस्टॉरंटबद्दल जाणून घेऊ…
१०० वर्षांहून अधिक काळ जुन्या असलेल्या या रेस्टॉरंटच्या बांधकामाची कहाणीही खूप रंजक आहे. हे शाकाहारी रेस्टॉरंट स्वित्झर्लंडमधील झुरिचमध्ये आहे, जे Haus Hiltl zürich या नावाने प्रसिद्ध आहे. रेस्टॉरंटची स्थापना झुरिचच्या हिल्ट कुटुंबाने १८९० साली केली होती आणि पिढ्यानपिढ्या हा वारसा चालवला जात आहे. आता हे रेस्टॉरंट जगभरात खूप प्रसिद्ध होत आहे.
असे म्हटले जाते की, हिल्ट कुटुंबाचे प्रमुख ॲम्ब्रोसियस हिल्ट यांना सांधेदुखीचा त्रास होता. बरेच उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मांसाहार सोडून शाकाहारी आहार घेण्याचा सल्ला दिला. एम्ब्रोसियस हिल्टने शहरातील शाकाहारी रेस्टॉरंट्स शोधण्यास सुरुवात केली; परंतु त्यांना एकही चांगले रेस्टॉरंट सापडले नाही. यानंतर त्यांनी स्वत: एक रेस्टॉरंट सुरू करण्याचा प्लॅन केला. असं म्हटलं जातं की, सुरुवातीच्या काळात या रेस्टॉरंटमध्ये फक्त ठराविक पदार्थ मिळत होते, पण आज इथे अनेक देशांतील शाकाहारी पदार्थ मिळतात.
आता या रेस्टॉरंटमध्ये भारतीय, आशियाई, मेडिटेरेनियन आणि स्वित्झर्लंडमधील सर्व शाकाहारी पदार्थ मिळतात. खाण्यासोबतच तुम्ही इथे स्वयंपाकाची पुस्तकेही वाचू शकता. आता या रेस्टॉरंटच्या आठ फ्रँचायझी सुरू करण्यात आल्या आहेत. एक काळ असा होता की, या रेस्टॉरंटवर लोक हसायचे, ग्राहक नसल्यामुळे अन्न फेकून द्यावे लागायचे. पण, यानंतर रेस्टॉरंट मालक भारतात आले आणि त्यांनी अनेक पदार्थांची माहिती घेतली.
या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला थाळीमध्ये जेवण मिळू शकते, जे भारतापासून प्रेरित आहे. त्याच्या पूर्णपणे शाकाहारी शैलीमुळे त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. या रेस्टॉरंटमध्ये एक लायब्ररीदेखील आहे, जिथे शाकाहारी जेवणाचे फायदे सांगणारी हजारो पुस्तके सापडतील.