23 September 2020

News Flash

भौगोलिकता, ऋतुमानानुसार वापर हवा

प्रवासाच्या वेळी पायाला अतिशय सुखद स्पर्श असावा असे अनेकदा वाटते, त्यामुळे प्रवासाचा शीण अनेकदा नाहीसा होतो. उन्हाळ्यामध्ये असणारा गरमा तुमच्या पायाला त्रासदायक ठरत असतो, मोटारीमध्ये

| December 12, 2012 11:44 am

प्रवासाच्या वेळी पायाला अतिशय सुखद स्पर्श असावा असे अनेकदा वाटते, त्यामुळे प्रवासाचा शीण अनेकदा नाहीसा होतो. उन्हाळ्यामध्ये असणारा गरमा तुमच्या पायाला त्रासदायक ठरत असतो, मोटारीमध्ये बसल्यानंतरही तो गरमा कमी व्हावा असे वाटत असते पण प्लॅस्टिकची मॅट्स गाडीमध्ये असतील तर मात्र हा त्रास कमी होण्याऐवजी वाढतो. पावसाळ्यामध्ये पावसाचे पाणी, चिखल या साऱ्यांमधून वाट काढीत मोटारीत येऊन बसतो आणि मग पुन्हा त्या मोटारीत चढउतार झाल्यानंतर लक्षात येते की सारा चिखल व ओलसरपणा, दमटपणा यामुळे मोटारीमध्ये बसणे नको. कुबट वासही त्यामुळे पसरतो. अशा वातावरणाच्या त्रासामुळे मोटारीतील अंतर्गत स्वच्छता धोक्यात येते, तसेच प्रवासही नकोसा वाटतो.
मोटारीच्या फ्लोअरिंगची काळजी ही अत्यंत महत्त्वाची आहे. कंपनीकडून मोटार खरेदी करतो तेव्हा त्यात अनेकदा देण्यात आलेली मॅट्स मनपसंत असतातच असे नाही. तुमच्या आसनाला साजेशी रंगरूपाची मॅट्स जशी दिसायला चांगली वाटतात तशी ती उपयुक्त व सुखद हवीत हेही महत्त्वाचे. तुमचे पाय मोटारीमध्ये ज्या फ्लोअरिंगला टेकलेले असतात, त्या ठिकाणी असणारा गालिचा किंवा आच्छादन म्हणजे मॅट जे रबराचे असते, पीव्हीसी वा त्यासारख्या अन्य घटकांपासून बनविलेले असते, काथ्याचेही मॅट काहींना आवडते, किंवा पीव्हीसी, नायलॉन यांच्यापासून वा अन्य प्रकारच्या कपडय़ांपासून बनविलेले असते. रबराचे मॅट हा तर मोटारीमध्ये वापरण्यात येणारा जुना प्रकार आहे. मुळात मोटारीमध्ये मॅट वापरण्याची पद्धत ही सुरुवातीला उपयुक्तता व देखभाल यासाठी पाहिली गेली. कालांतराने त्यामध्ये निघालेले विविध प्रकार, रंगसंगती, रूप या दृष्टीने बदल होत गेले. मोटारीमध्ये चासीवर असणाऱ्या लोखंडी बॉडीमुळे एक लोखंडाच्या पत्र्याची जमीन तयार झालेली असते. त्यावर होणाऱ्या वर्दळीमुळे त्याची होणारी झीज, त्यामुळे होणारा त्रास, त्यामुळे तापमानाच्या अधिक प्रखरतेमुळे जाणवणारा गरमपणा, पावसाळ्यात त्यामुळे त्या जमिनीला म्हणजे लोखंडाला येणारा गंज अशा अनेक बाबी लक्षात घेऊन त्यावर आच्छादन टाकण्याचा मार्ग स्वीकारला गेला. रबर हा अतिशय स्वस्त व टिकाऊ प्रकार त्यासाठी वापरला गेला. कालांतराने त्या उपयुक्ततावादी दृष्टीला सौंदर्य, स्वच्छता असे नवे आकारही मळिाले व मॅटमध्ये आज दिसणाऱ्या वैविध्यपूर्ण घटकांचा, कच्च्या मालाचा वापर होऊन मॅट तयार करणाऱ्या कंपन्याही निघाल्या.
रबर मॅट – रबरापासून तयार केलेली ही मॅट प्रामुख्याने काळ्या रंगाची असतात. त्यावर विशिष्ट प्रकारचे आरेखन असते, त्यात पायाची धूळ अडकून ती मोटारीच्या मूळ फ्लोअरिंगवर वा त्यावरील कापडसदृश आच्छादनावर पडत नाही. पावसाळ्यात ही मॅट अधिक चांगली म्हणता येतात. ती धुवायला सोपी, त्यावरील चिखल धुवायला व काढायला सोपा असतो, त्याचप्रमाणे हिवाळा, उन्हाळा व पावसाळा या तीनही ऋतूंत ती त्रासदायक ठरत नाहीत. ती जमिनीला तशी घट्ट बसून -पकडून राहतात. मागे सरकत नाहीत.
व्हिनिएल मॅट – इंटेरियर उद्योगात व्हिनिएल हा शब्द कायम ऐकायला मिळतो. या प्रकारच्या घटकाद्वारे तयार केलेल्या कृत्रिम फरशा- कारपेट ज्या मूळ जमिनीला चिकटविल्या जातात. पाण्यापासूनही या तशा सुरक्षित असतात. त्याचप्रमाणे त्या वेगवेगळ्या रंगरूपात, आरेखनात मिळू शकतात. कार मॅटमध्ये वापरण्यात येणारे हे व्हिनिएलही त्याच प्रकारे उपयुक्त असे असते. टिकाऊपणाबरोबरच या मॅटवरून पाय सरकत नाही व ते मॅट रबरासारखे खरखरीत होत नाही. वजनाला काहीसे हलके असल्याने साफसफाई करताना त्रासदायी वा अडचणीचे ठरत नाही.
नायलॉन मॅट- पॉलीप्रॉपलीनवर नायलॉनच्या धाग्यांचे आवरण असलेले हे मॅट आहे. याच प्रकारची अन्य कपडय़ांच्या वा धाग्यांच्या सहाय्यानेही तयार केलेली कार मॅट मिळतात. पॉलीप्रॉपलीनवर म्हणजे प्लॅस्टिकच्या बेसवर धाग्यांची वीण असल्याने ती पायाला अगदी गालिच्यासारखी वाटते, त्याचप्रमाणे पावसात पाण्यामुळे डाग लागल्यास नायलॉनचे धागे असणारे बाह्य़ आवरण धुताही येते. दुसरी बाब म्हणजे पायाकडील भागात असलेल्या काही भागांच्या भेगांमध्येही ते घुसविण्यात येत असल्याने त्या भागांचा मोटारीच्या व्हायब्रेशनमुळे येणारा आवाजही कमी करता येतो.
या मॅटप्रमाणे प्लॅस्टिक वा पॉलीप्रॉपलीनचे मॅटही बाजारात मिळतात. काही मॅट्सची रचना पूर्णपणे सपाट नसते, काहीशा हौद्यासारखी रचना असते, त्यामुळे पाणी त्यात साचल्यास ते टिपून घेता येते. तसेच कचरा त्याबाहेर येत नाही. तो साफ करताना बाहेरही पडत नाही. अर्थात मोटारीच्या मॉडेलप्रमाणे त्याची बनावट असते. किंबहुना त्यानुसार मॅट्स घेतल्यास ती मॅट्स मोटारीमध्ये चपखल बसतात. आसनांच्याखाली, बूटस्पेसमध्ये ही मॅट्स वापरली जतात. मॅट्स वापरणे ही गरज आहे. मात्र ती का प्रकारातील असावीत, हे ठरविणे हौशीप्रमाणेच ऋतुमान, भौगोलिक स्थिती याची जाण ठेवूनच वापरायला हवीत. मॅट्सचा रंग हादेखील मोटारीच्या रंगानुसार वा त्याला अनुरूप असा मिळतो. मोठय़ा शहरांमध्ये मोटारींच्या साधनसामग्री मिळणाऱ्या बाजारात मॅट्सची वैविध्यता नजरेस पडू शकते. सर्वच ठिकाणी ती मिळतील असे नाही. मोटारीतील प्रवासात मॅट कोणते आहे त्यावर एक वेगळाच अनुभव काही क्षणांमध्ये मिळत असतो. मऊशार असा कापडी वा रेशमी गालिच्याचा तुकडाही पायाखाली असल्यास थंडीच्या मोसमात खूप छान वाटते. त्यासाठी काही जण मुद्दाम लोकरीचा वापरही करतात. तर पावसाळ्यामध्ये पायांना येणारा थंडावा रोखण्यासाठीही अशा प्रकारची मॅट्स तात्कालिक स्वरूपात वापरली जात असतात. वैयक्तिक आवडनिवडही यामागे असते. पावसाळ्यामध्ये वास्तविक रबरी मॅट हे खूप उपयुक्त व योग्य असते असे म्हणता येते. अर्थात काहीजण मोटारी वापरताना मुळात विशिष्ट पद्धतीने वापरत असल्याने त्यांना मोटारीतील स्थिती ही ऋतुमानाऐवजी प्रवासातील चांगल्या अनुभवासाठी कोणत्या प्रकारचे मॅट वापरावे यावर अधकि जोर देतात. भारतातील एकंदर भौगोलिकतेची व ऋतुमानाची स्थिती पाहता, विशिष्टच मॅट वापरावे असे सांगणे बरोबर ठरणार नाही. प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी असलेली वातावरणाची व वापराची स्थिती पाहूनच काही साधनसामग्रीबाबत निर्णय घेणे योग्य ठरू शकेल, असे वाटते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2012 11:44 am

Web Title: according to geografic and seasons use should be there
Next Stories
1 आपण उत्तम चालक आहोत का?
2 मर्सिडिझ बेन्झ तंत्रकौशल्याचा अनोखा अनुभव
3 सीटकव्हर्स : सौंदर्यदृष्टीची परीक्षाच
Just Now!
X