dr10वयाच्या ३८व्या वर्षांपर्यंत माझ्याकडे गाडी चालवण्याचा परवाना नव्हता. गाडी घ्यायची आणि कुटुंबासह देशभर भ्रमंती करण्याची मनापासून इच्छा होती. हो-नाही करता मी गाडी शिकायला लागलो. त्या वेळी काही फारसे ड्रायिव्हग क्लासेस नव्हते. त्यामुळे मग मित्रांच्या गाडय़ांवर शिकायला सुरुवात केली. हळूहळू जमू लागले. मग परवाना मिळवण्यासाठी आरटीओची परीक्षा दिली. परवाना मिळाला त्या दिवशी आनंदोत्सव साजरा केला. आता गाडी कोणत्याही परिस्थितीत घ्यायचीच, असे ठरवले. १९८० मध्ये अ‍ॅम्बॅसिडर गाडी घेतली. तब्बल १३ वष्रे चालवली. कुटुंबासह माऊंट अबू, रतलाम, भिलाई, म्हैसूर, बंगलोर, तिरुपती आदी ठिकाणी फिरून आलो. कुटुंबीयांसह फिरतानाचा आनंद काही औरच असायचा. माझे स्वप्न साकार झाले होते. प्रवास करताना मी, पत्नी, तीन मुली, वडील, सासू-सासरे व आम्ही पाळलेला कुत्रा असा परिवार असायचा. मात्र, प्रत्येक वेळी असेच असायचे असे नाही. एकदा भिलाईला जात असताना बाका प्रसंग उद्भवला. खामगाव बायबास हायवेवरून फियाटने जात होतो. अचानक समोरून एक ट्रक दुसऱ्या ट्रकला ओव्हरटेक करून आमच्या गाडीसमोर आला. प्रसंगावधान राखून मी गाडी डावीकडच्या रस्त्यावर उतरवली. क्षणाचा जरी विलंब झाला असता तर.. असो. ३४ वर्षांत मी बऱ्याच गाडय़ा बदलल्या. पहिल्या दोन अ‍ॅम्बॅसिडरच होत्या. त्यानंतर फियाट, अल्टो या गाडय़ा चालवल्या व आता वॅगन आर चालवतो. कोणत्याही गाडीने मला कधीही दगा दिलेला नाही. गाडीची प्राथमिक दुरुस्ती, तिची निगा राखणे वगरे कामे मीच करतो. यात माझ्या पत्नीची, जयश्रीची, पूर्ण साथ असते. आता आम्ही दोघेही अनुक्रमे ७२ व ६८ वर्षांचे आहोत. मात्र, अजूनही मी पूर्वीच्याच जोमाने कार चालवतो. तीनही मुली संसारात रमल्यामुळे आता आम्ही दोघेच असतो. २००० सालापासून राज्यभरातल्या बहुतेक सर्वच ठिकाणांना आम्ही भेटी दिल्या आहेत. माझ्या प्रत्येक गाडीवर मी प्रेम केले. तिला फुलासारखे जपले. आजही मी माझ्याशिवाय कोणालाही गाडीला हात लावू देत नाही. अपवाद, फक्त माझ्या नातवाचा..
– विजय कुळकर्णी, ठाणे

ड्राइव्हिंग शिकणं हा एक भन्नाट अनुभव असतो. शिकताना अनेकदा मजेशीर अनुभव येतात. काही अनुभव गंभीर असतात. शिकण्याच्या या प्रक्रियेतून तावूनसुलाखून बाहेर पडल्यानंतर मिळालेले ड्रायिव्हग लायसन्स अनोखा आनंद देऊन जाते. तुमचा हा ड्रायिव्हग शिकण्याचा अनुभव कसा होता, शिकल्यानंतर तुम्ही लाँग ड्राइव्हला कुठे गेलात, काही अडचणी आल्या का, तुमचा फर्स्ट हँड अनुभव कसा होता, आता तुम्ही किती सफाईदारपणे गाडी चालवता.. थोडक्यात तुमची ‘कार’कीर्द कशी घडली, याची माहिती तुम्ही ‘लोकसत्ता’कडे शेअर करायची. सोबत कारबरोबरचा तुमचा फोटोही पाठवायचा. शब्दमर्यादा २००च असावी. मग टाका गीअर आठवणींचा.. मेल करताना त्यावर ‘माझी कारकीर्द’साठी असा उल्लेख अवश्य असावा.
माहिती मेल करा.. ls.driveit@gmail.com