उंचच उंच डोंगर.. खाली खोल दरी.. त्यातून कोरून काढलेला रस्ता.. खरंतर हे सर्व नयनरम्य दृष्य.. परंतु या कोरून काढलेल्या रस्त्यावरून जेव्हा तुम्हाला चारचाकी किंवा दुचाकी भरधाव वेगाने नेऊन स्पर्धा जिंकायची असते त्यावेळी खरोखर कस लागतो.. ‘मारुती सुझुकी रेड डी हिमालया’ ही स्पर्धा त्यासाठीच तर ओळखली जाते. शिमलापासून या स्पर्धेला सुरुवात होते. तब्बल १८० किमीचा पल्ला पार करून स्पर्धेचा मानकरी ठरतो.. त्यासाठी आव्हानांनी भरलेली खडकाळ वाट पार करावी लागते, हे नक्की..

एरवी डांबराच्या चकाचक मार्गावर (सर्किटवर) सहभाग घेणाऱ्या चारचाकी आणि दुचाकी वाहनचालकांची ‘रेड डी हिमालया’ स्पध्रेत खरी कसोटी लागते. उंच उंच झाडांतून, चिंचोळ्या खडकाळ वाटेतून आणि गोठवणाऱ्या थंडीतून मार्ग काढत अंतिम विजेत्या बनण्याच्या या धडपडीत शरीरासोबत गाडीच्या इंजिनाचीही परीक्षा असते.. या सर्व मार्गात संपर्क साधण्याचे कोणतेच साधन उपलब्ध नसल्याने चालक आपले नशीब त्याच्या आवडत्या गाडीवर सोपवतो.. तिची सोबत मिळाली तर ठीक, नाही तर ही शर्यत अध्र्यावर सोडण्यावाचून दुसरा पर्याय उरत नाही.. रेड डी हिमालया शर्यतीचा हा आठ दिवसांचा प्रवास १६७ स्पर्धकांनी सुरू झाला, परंतु अखेरीस केवळ ३८ स्पर्धकांनाच शर्यत पूर्ण करण्यात यश आले.. यावरून या स्पध्रेतील आव्हानांचा अंदाज बांधता येतो!

शिमला येथून या प्रवासाला सुरुवात झाली. डलॉग ते चमोला या १९.६१ किलोमीटरच्या पहिल्या स्पर्धात्मक टप्प्याने स्पर्धकांची उजळणी घेतली. त्यानंतर गाडीच्या इंजिनांच्या परीक्षेला सुरुवात झाली. स्पर्धात्मक अंतरापेक्षा प्रवासाचे अंतर अधिक असल्यामुळे स्पर्धकांची तारांबळ उडत होती. त्यांच्यासाठी समाधानकारक बाब इतकाच हा प्रवासाचा टप्पा चांगल्या रस्त्यातूंन जात होता. चमोलाहून ३५.५७ किमीचे प्रवासात्मक अंतर पूर्ण केल्यानंतर लुहरी ते बेहना या स्पर्धात्मक टप्प्यात स्पध्रेतील आव्हान अधिक वाढत जाईल याची झलक दाखवली.

मारुती सुझुकी ग्रॅण्ड व्हिटारा, मारुती सुझुकी एक्सएल-७, मारुती सुझुकी जिप्सी, बोलेरो, पोलारिस आणि ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या एस क्रॉस या चारचाकी, तर केटीएम डय़ुक ३९०, यामाहा डब्लूआर ४५०, टीव्हीएस अपाचे, इम्पल्स, एनफिल्ड आदी प्रकारच्या दुचाकींनी यंदाच्या स्पध्रेतीच रंजकता आणखी वाढवली. एका बाजूला खोल दरी आणि त्यात डोंगराच्या पायथ्याशी वाहणारी नदी.. हे दृश्य वरवर पाहता नयनरम्य वाटत असले तरी स्पर्धकाच्या दृष्टीने हा जीवघेणा प्रवास होता. दिलेल्या वेळेत टप्पा पूर्ण करण्यासाठी सर्वाची धडपड सुरू होती आणि त्यात दुखापत होण्याची शक्यताही बळावत होती. तरीही स्पर्धकांचा उत्साह कौतुकास्पद होता. शिमला ते मनाली या १२५ किमीच्या स्पर्धात्मक आणि एकूण ३१० किमीचे अंतर पूर्ण करून स्पर्धक पुढील आव्हानासाठी सज्ज झाले होते. या प्रवासात गाडय़ांचे अधिक नुकसान झाले होते आणि त्याची दुरुस्ती करण्यासाठी स्पर्धक व त्यांच्या संघाची रात्रभर कसरत सुरू होती. कारण पुढील आव्हान याहून अधिक खडतर असेल याचा अंदाज सर्वाना होता.

मनाली ते डलहौसी या टप्प्यातील २१६ किमीचे स्पर्धात्मक अंतर जंगलवाटेनेच पूर्ण करायचे होते. त्यामुळे रस्ता अधिक खडकाळ आणि निसरडा होत गेलेला. या सर्व कसोटींवर सुरेश राणा आणि अरविंद के. पी. यांनी एक्स्ट्रीम गटातील आपापल्या विभागात आघाडी कायम राखली होती. या जंगलवाटेत स्पर्धकांना अपघातांनाही सामोरे जावे लागले. या टप्प्यात दूरदूपर्यंत मनुष्यवस्ती नाही. जी काही घरे दिसत होती, ती रिकामी होती. हिमवर्षांवाला सुरुवात होणार असल्यामुळे येथील गुज्जर आणि गड्डी समाजाची लोक घरदार सोडून पंजाबमध्ये नोकरीकरिता गेली होती. दुसऱ्या दिवसाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास श्रीनगर-रंगदूम-द्रास-श्रीनगर येथे संपला.

यातील रंगदूम-रंगदूम हा १८० किमीचा टप्पा स्पर्धकांसाठी आणि गाडीच्या इंजिनांचा कस पाहणारा होता. गोठवणाऱ्या थंडीत इंजिनांची साथ ही शर्यतपटूंसाठी फार महत्त्वाची होती. यामध्ये पाच टप्प्यांत आघाडीवर असलेल्या सुरेश राणाला तिसऱ्या स्थानावर फेकले. त्याच्या गाडीच्या इंजिनाने दगा दिल्याने राणाच्या गाडीचा अपघात झाला, तरीही त्याने शर्यत पूर्ण केली. या संपूर्ण प्रवासात १६७ पैकी केवळ ३८ स्पर्धकांनाच अंतिम पल्ला पार करण्यात यश आले. यात चारचाकी गटात राजसिंग राठोड आणि दुचाकी गटात अरविंद केपी याने बाजी मारली.

* मारुती सुझुकी ग्रॅण्ड व्हिटारा

पेट्रोलवर चालणारी ही गाडी २३९३ सीसी इंजिन आहे. अवघ्या १२ सेकंदांत ० ते १०० किमीची गती सहज गाठू शकण्याची क्षमता या गाडीत आहे. ताशी १७५ किमीच्या गतीने ही गाडी धावू शकते.

* मारुती सुझुकी एक्सएल-७

व्हिटारा गटातील या गाडीची इंजिन क्षमता ३६०० सीसी इतकी आहे.

* मारुती सुझुकी जिप्सी

सीसीच्या बाबतीत जिप्सी व्हिटारा व एक्सएल-७ पेक्षा कमी असली तरी बर्फाळ, वाळवंटी रस्त्यावर भरवशाची गाडी म्हणून हिची ओळख आहे. १२९८ सीसीच्या या गाडीने स्पध्रेत सर्वात जास्त चुरस आणली.

* पोलारिस

या स्पोर्टी गाडीने यंदाची स्पर्धा गाजवली. पोलारिस गाडी चालवणाऱ्या स्पर्धकांनी अव्वल दोन क्रमांक पटकावून नऊ वेळा जेतेपदावर नाव कोरणाऱ्या सुरेश राणाला पराभूत केले. डोंगराळ भागातील शर्यतींसाठीच या गाडीची निर्मिती करण्यात येते.

– स्वदेश घाणेकर
swadesh.ghanekar@expressindia.com

 

 

विजेतेपदाचा अत्यानंद – अरविंद के. पी.

‘‘राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील बहुतांश पदकं नावावर केल्यानंतरही  ‘रेड डी हिमालया’चा चषक नावावर करण्यात अपयश आले होते. त्यामुळे गेली दोन वष्रे जेतेपदासाठी कसून सराव केला. त्याचे फळ मिळाले. घरातील चषकांच्या कपाटात या स्पध्रेसाठी असलेला रिकामा रकाना आता भरला गेला. त्यामुळे अत्यानंद झाला आहे,’’ अशी प्रतिक्रिया रेड डी हिमालयाच्या एक्स्ट्रीम गटातील दुचाकी विभागात बाजी मारणाऱ्या अरविंद के. पी. याने दिली. सहा दिवसांच्या आव्हानात्मक टप्प्यांमध्ये बंगळुरूच्या अरविंदने ‘टीव्हीएस आरटीआर ४५०’ या दुचाकीवर स्वार होत निर्विवाद वर्चस्व गाजवले. प्रत्येक टप्प्याच्या अंतिम रेषेवर छायाचित्र टिपण्यासाठी उभ्या असलेल्या छायाचित्रकारांना पाहताच तो विविध स्टंट करून दाखवत आपला आनंद साजरा करत होता.

शिमलापासून सुरू झालेल्या या शर्यतीत अरविंदला नटराज आणि आशीष मुदगील यांच्याकडून कडवी झुंज मिळाली. शिमला ते मनाली आणि मनाली ते डलहौसी या पहिल्या दोन टप्प्यांत या तिघांनी सेकंदाच्या फरकाने शर्यत पूर्ण केली. त्यांच्यातील या चुरशीमुळे स्पध्रेतील उत्सुकता आणखी शिगेला पोहचली होती. मात्र अरविंदने सहाही दिवस आघाडी कायम राखत बाजी मारली.

तो म्हणाला, ‘‘शिमला ते मनाली हा टप्पा आव्हानात्मक होता, कारण नटराजनकडून कडवी झुंज मिळाली. मात्र पाचव्या टप्प्यात (रंगदूम ते पदम ते रंगदूम) १८० किलोमीटरच्या शर्यतीत पाच मिनिटांची घेतलेली आघाडी महत्त्वाची ठरली. हा टप्पा खरी कसोटी पाहणारा होता. शून्य अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात गाडी चालवताना हात अक्षरश: गोठले होते. त्यातही अव्वल स्थान कायम राखल्याचा अभिमान वाटतो.’’ ही स्पर्धा तुझ्यासाठी काय आहे, या प्रश्नावर अरविंद म्हणाला, ‘‘ या स्पध्रेने बरेच काही शिकवले. कमकुवत पैलूंची जाण मला या स्पध्रेतून झाली. त्या पैलूंवर काम करण्यास सुरुवात करणार आहे.’’

पहिला फोन आईला करायचाय..

सहा दिवसांच्या या शर्यतीदरम्यान घरच्यांशी कोणताच संपर्क होऊ शकला नव्हता. त्यात माझ्या आईला सर्वात जास्त चिंता लागली होती. गतवर्षी याच स्पध्रेत मला दुखापत झाली होती. त्यामुळे यंदा येथे सहभाग घेण्यासाठी तिला खूप विनवणी करावी लागली होती. माझ्या आवडीपायी तिने येथे येण्याची परवानगी दिली. या विजयाची बातमी सर्वप्रथम तिला द्यायची आहे, अशी भावूक प्रतिक्रिया अरविंदने दिली.