गाडी चालवण्याची मजा घ्यायची असेल, तर टोयोटा इटिऑस क्रॉस ही अत्यंत सुखद अनुभव देणारी गाडी आहे. पण त्याव्यतिरिक्त मनोरंजन आणि इतर सुखसोयींना प्राधान्य द्यायचे असेल, तर कदाचित थोडी निराशा होऊ शकते..

कारवेडय़ा लोकांमध्येही दोन गट पडतात. एक गट म्हणजे गाडीतील इतर सोयीसुविधा, एसी ब्लोअर, साइड मिरर, लेग स्पेस, बूट स्पेस अशा सगळ्याच गोष्टींचा विचार करणारा आणि दुसरा गट म्हणजे इंजिन क्षमता, गाडीची ताकद, गाडी चालवताना जाणवणाऱ्या गोष्टी आदींचा विचार करणारा! टोयोटा इटिऑस क्रॉस ही गाडी यातील दुसऱ्या गटाला नक्कीच उत्तम अनुभव देऊ शकते, तर पहिल्या गटालाही आपल्याकडे आकर्षति करण्याची कुवत या गाडीत आहे. या गाडीतून लाँग ड्राइव्हला जाताना क्रॉस गाडीच्या उत्तम पॉवरमुळे हा ड्राइव्ह खूपच आरामदायक आणि सोयीचा होतो.

आतमध्ये दडलंय काय?
टोयोटा इटिऑस क्रॉसच्या डिझेल श्रेणीतील गाडीमध्ये सर्व बेसिक दर्जाच्या सुखसोयींचा समावेश आहे. एसी, यूएसबी रीडर, ड्रायव्हर व को ड्रायव्हर यांच्या सुरक्षेसाठी एअरबॅग्ज, पॉवर विंडोज अशा अनेक सोयी गाडीत आहेत. मात्र मागे बसलेल्या प्रवाशांना एसीचा वारा लागण्यासाठी सोय नाही. पुढे असलेले एसीचे व्हेंट्स विशिष्ट प्रकारे फिरवल्याशिवाय मागच्या प्रवाशांना एसी जाणवत नाही. त्याचप्रमाणे गाडीतील साउंडची व्यवस्थाही अपुरी आहे. गाडीने वेग घेतल्यानंतर गाडीतील मागच्या सीटवर बसलेल्यांना गाण्यांचा आवाज येणे कठीण आहे. फक्त पुढील बाजूला दोन स्पीकर असल्याने मागच्या प्रवाशांना गाण्यांचा आस्वाद घेता येत नाही. त्याचप्रमाणे साउंडमध्येही अत्यंत बेसिक साउंड पुरवल्याने गाण्याचे शब्द तेवढे कळतात. यूएसबी, ऑक्झिलरी केबल, सीडी प्लेअर अशी सर्व मनोरंजनाची साधने गाडीत असल्याने मनोरंजनाची हमी गाडी देते. मात्र आवाजाबाबत काही तरी करणे आवश्यक आहे. मात्र, मागील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी लेग स्पेस गाडीला खूप चांगली आहे. त्यामुळे मागे बसणारे तीनही प्रवासी अत्यंत आरामात बसू शकतात. त्याच बरोबर पुढे बसलेल्यांचीही गरसोय होत नाही. पाचही जण पाय ताणून आरामात प्रवास करू शकतात. गाडीची बूटस्पेस अर्थातच डिकीही व्यवस्थित ऐसपस असून त्यात चार जणांचे सामान, अगदी चार दिवसांच्या सहलीसाठीचेही, अगदी व्यवस्थित राहू शकते. गाडीचे साइड मिरर आणि रिअर व्ह्यु मिरर यांतही तक्रार करण्यासारखे काहीच नाही. गाडीत कप होल्डर असल्याने तीदेखील सोय उत्तम करण्यात आली आहे. ड्रायव्हरने गाडी चालू झाल्यानंतरही सीटबेल्ट न लावल्यास गाडीतील प्रणाली आपोआप सूचना देते. तसेच गाडीत सेंट्रल लॉकिंग सिस्टम असल्यामुळेही गाडीत सुरक्षेचा काहीच प्रश्न उद्भवत नाही. गाडीतील सीट्सही फॅब्रिक मटेरिअलच्या असल्याने गाडीच्या स्पोर्टी लुकमध्ये भर टाकतात. तसेच ड्रायव्हर व को-ड्रायव्हर या दोघांच्याही सीट्स अत्यंत आरामदायक आहेत.

गाडीचा लुक
कोणत्याही ‘क्रॉस’ प्रकारातील गाडीप्रमाणे या गाडीचा लुकही मस्त स्पोर्टी आहे. गाडीच्या बॉडीभोवती खालच्या बाजूला ब्लॅक फायबर लावल्याने गाडी खूपच छान आणि डॅिशग दिसते. ओबडधोबड रस्त्यांवरूनही ही गाडी आरामात घेऊन जाईल, असा विश्वास गाडीच्या लुकमधूनच मिळतो. त्याचप्रमाणे अँटेना आणि रूफ रेल्समुळे गाडीला रफ अ‍ॅण्ड टफ लुकही मिळतो. जमिनीपासून गाडीची उंचीही चांगली असल्याने एखाद्या एसयूव्हीमध्ये बसल्याचा अनुभव ही हॅचबॅक प्रकारातील गाडी सहज देऊ शकते. फक्त गाडीचा बॅक पोर्शन साचेबद्ध टोयोटाच्या डिझाइनची आठवण करून देणारा आहे. कंपनीने गाडीचा स्पोर्टी लुक तिच्या दिव्यांमध्येही जोपासला आहे.

चालकाच्या दृष्टिकोनातून गाडी
टोयोटा इटियॉस क्रॉस ही गाडी टोयोटा कंपनीच्या इतर गाडय़ांप्रमाणेच चालकांसाठी नंदनवन आहे. स्मूथ गीअर शिफ्ट्स, अत्यंत हलका क्लच आणि एक्सलरेटर, योग्य दबावाने लागणारे ब्रेक्स आणि जबरदस्त पीक अप यांमुळे ही गाडी चालवणे, हा अत्यंत सुखद अनुभव ठरतो. ० ते १०० किमी एवढा वेग घेण्यासाठी गाडीला सहा ते आठ सेकंदांचा अवधी पुरेसा आहे. १३६४ सीसी एवढय़ा क्षमतेच्या इंजिनामुळे मिळणारी पॉवर गाडीला हा वेग देऊ शकते. त्याचप्रमाणे गाडी वेगात असताना पाचव्या गिअरमध्येही एखाद्या चढणीवर सहज चढून जाऊ शकते. गाडीचे टìनग रेडियस आणि स्टीअिरग व्हील कंट्रोल खूपच छान आहे. त्यामुळे अगदी हेअर पीन वळणांवरही गाडीचा ताबा सुटत नाही. मॅन्युअल ट्रान्समिशन असूनही गीअर शिफ्ट करतानाही गाडीला अजिबात गचके बसत नाहीत. गाडी १२०-१४० किमी प्रतितास या वेगाने चालवल्यावरही अजिबात उडत नाही किंवा रस्ता सोडत नाही. त्यामुळे गाडीची व्हील अलाइन्मेण्टही खूपच उत्तम आहे. दोन दिवसांत १००० किलोमीटरचा टप्पा गाठूनही गाडी चालवताना कुठेही थकवा किंवा ताण येत नाही. त्यामुळे ही गाडी चालकांसाठी खरेच खूप उत्तम अनुभव देणारी आहे.
-रोहन टिल्लू
(rohan.tillu@expressindia.com)