वयाच्या २५/२६व्या वर्षी ऑस्टीन १० हे १९४०चे मॉडेल १९५८ला पूर्ण वेळ व्यवसायासाठी घेतले. प्रॅक्टिस करण्याकरिता रात्रौ १० वा. मी, दोन भाऊ, तीन मित्र असे शिवाजी पार्कहून माहीमला निघालो. शितलादेवी टेम्पलला गाडी बंद पडली. आम्ही सर्वच जण बा. भ. बोरकरांच्या म्हणण्याप्रमाणे श्रमसेच्या तीरावरचे युवक. माहीम चर्चपर्यंत व परत शितलादेवी टेम्पल, असा धक्का मारून बघितले. तेथे पेट्रोलपंप आहे. तेथे पेट्रोल भरले. गाडी चालू झाली. घरी आणली.

एक दिवस मुंबईतील व्यावसायिक कामे करून परत येत असताना शारदाश्रम बिल्डिंगपाशी गाडी बंद पडली. इंजिनमधून, बॉनेटमधून वाफच-वाफ येऊ लागली. १० मिनिटे थांबून, कपडा घेऊन हात भाजत घेऊन बॉनेट उघडले. सर्व वाफ अंगावर आली. १० मिनिटे थांबलो. शारदाश्रम शाळेचे बांधकाम सुरू होते. त्यांच्याकडून बादलीभर पाणी घेऊन ते रेडीएटरमध्ये भरले. गाडी पूर्ण थंड होऊ दिली. स्टार्टर मारला आणि गाडी घरी आणली. रिपेरिंग काहीच करावे लागले नाही.

१९६०ला लॅण्डमास्टर गाडी घेतली. सर्व कुटुंबीयांनी पुण्याला जाण्याची टूम काढली. आम्ही एकूण ४ कुटुंबे व ४ मुले निघालो. पहिलाच लांबचा प्रवास, माहीतगार कोणीच बरोबर नाही. शींग्रोबाच्या देवळाजवळ गाडी बांधाला लागून पार्क केली. सगळेजण उतरून दर्शन घेऊन गाडीत येऊन बसलो. गाडी स्टार्ट केली. परंतु ती वर जाण्याऐवजी पाठीमागेच उताराला लागली. मग लक्षात आले. गाडीतून उतरून डाव्या बाजूच्या म्हणजे बांधाजवळच्या दोन्ही चाकांना दगड लावले. गाडीत बसलो. गाडी न्यूट्रल केली, ब्रेक सोडला, गाडी तशीच उभी राहिली. मी गाडी कण्डिशनमध्येच ठेवतो. सर्वाना गाडीत बसविले. गाडीने घाट चढायला सुरुवात केली. मध्येच दोन्हीही होजपाइप फाटले. ते लोणावळ्याला बदलले. त्यानंतर मात्र या गाडीने कधीच कोणताही त्रास दिला नाही.

१९७० साली अ‍ॅम्बॅसेडर गाडी घेतली. अ‍ॅम्बॅसेडर गाडीने एकूण मला तीन वेळा जीवदान दिले. तीनही जीवदाने पुणे-मुंबई प्रवासातच मिळाली. त्याही वेळेस आम्ही असेच बाराजण गाडीत होतो. ट्रकला ओव्हरटेक करताना समोरून ट्रक आला. माझा निर्णय चुकला. दोन्हीही ट्रकच्यामधून देवानेच गाडी सुखरूप बाहेर काढली. दुसऱ्यांदाही असाच प्रकार झाला. त्यानंतर एकवेळा पुणे-मुंबई प्रवासात देहूरोड, मिलिटरी एरियातून येताना एक मिलिटरीमन मोटारसायकलवर माझ्या उजवीकडून डावीकडच्या रस्त्यावर, मेनरोड क्रॉस करून गेला. माझ्या लक्षातच आले नाही. केवळ संतभूमी, देवभूमी असल्यामुळे त्यांनी आम्हाला वाचवले. नंतर कोणत्याही गाडय़ांकडून काहीही त्रास झाला नाही.

ड्रायव्हिंगवर माझी हुकमत आहे. अजूनपर्यंत एकही अपघात नाही. ताडदेव आर.टी.ओ.ने १९५५ला मला लायसन्स दिले. ६० वर्षे झाली. अजूनही ते व्हॅलिडच आहे. माझी विवाहित कन्या जी माझ्या शेजारीच राहते, ती व मी मिळून सॅण्ट्रो-झिंग वापरतो. अ‍ॅक्टिवा स्कूटर मात्र मी एकटाच वापरतो. अ‍ॅक्टिवावरून मी आजही फोर्ट ते बोरिवली, घाटकोपपर्यंत जातो. आमच्या पिढीला नवीन गाडी घेण्याचा चॉइस फारसा नव्हता, कारण फियाट, लॅण्डमास्टर डिलिव्हरी पीरियड अनुक्रमे १५/५ वर्षे असा होता.