आपल्या अस्तित्वाने रुपेरी पडदा व्यापून टाकणाऱ्या अभिनेत्यांविषयी प्रत्येकाच्याच मनात एक कुतूहल असते. त्यांचा आवडता रंग कोणता, पुस्तक कोणते, लेखक कोणता, त्यांचा आवडता अभिनेता कोणता, त्यांची आवडती कार कोणती वगैरे असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनात पिंगा घालत असतात. अशाच काही सेलिब्रिटींच्या
‘ड्रीम कार’विषयी आपण जाणून घेणार आहोत, या सदरातून.
गाण्याबरोबरच मला गाडय़ांचीही खूप आवड. इंडियन आयडॉल ठरल्यानंतर गाडी घेण्याचे माझे स्वप्न साकार झाले. त्या वेळी मी होंडासिटी कार घेतली. त्या वेळी मुंबईत मोजक्या लोकांकडेच ही गाडी होती. माझी पहिली कमाई म्हणून माझे या गाडीवर खूप प्रेम होते. नंतर मी स्कोडा घेतली. नवी कोरी स्कोडा माझ्या दारात उभी राहिल्यानंतर मला खूप आनंद झाला. कारची नवनवीन मॉडेल्स बाजारात येतात तेव्हा ती आपल्याकडे असावीत असे मला नेहमीच वाटायचे. खरेतर मी खूप ‘ब्रॅण्ड कॉन्शस’ आहे. अर्थात ‘ब्रॅण्ड कॉन्शस’ म्हणजे आवडलेला ब्रॅण्ड वाट्टेल तेवढी किंमत मोजून खरेदी करायचाच असे मी करीत नाही. ब्रॅण्ड कॉन्शस असलो तरी नवीन ब्रॅण्डची कार माझ्या आर्थिक कुवतीमधील आहे की नाही हे मात्र मी नक्कीच बघतो. माझी आर्थिक कुवत आणि अन्य आर्थिक बाबी बारकाईने अभ्यासून मगच मी माझ्या आवडीच्या ब्रॅण्डची गाडी घेणे पसंत करतो. स्कोडा गाडी तेव्हा मुंबईत पहिल्यांदाच येत होती आणि बाजारात हे मॉडेल लोकप्रिय होण्यापूर्वीच स्कोडासाठी नोंदणी केली होती. ब्रॅण्ड कॉन्शस म्हणजे मी गाडीच्या बाबतीत सांगायचे तर जी गाडी किंवा एखादे मॉडेल लोकप्रिय आहे आणि सर्वाकडे मुंबईत ते दिसत असेल तर त्या ब्रॅण्डची गाडी मी घेत नाही. सगळ्यांकडे नसेल असे नवीन कार मॉडेल खरेदी करण्याकडे माझा कल असतो. सध्या माझ्याकडे ऑडी कारचे ए फोर हे मॉडेल आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी मी ऑडी घेतली. जर्मन मेकची गाडी हे अप्रूप होते. क्रिकेटपटू रवी शास्त्री यांना ऑडी मिळाली होती. ते लहानपणी टीव्हीवर पाहिले होते. त्यामुळे ऑडी घेतली तेव्हा यशस्वी झाल्याचा आणि स्वप्न साकार झाल्याची भावना मनात आली. माझ्यापेक्षाही मी ऑडी घेतल्याचा आनंद घरच्यांना खूप झाला.  आता मला भविष्यात पोर्शे कारचे कयान हे मॉडेल घ्यायला आवडेल. आता इतक्यात मी नवीन ब्रॅण्डची गाडी घेणार नाही.
शब्दांकन : सुनील नांदगावकर