ऑटो एक्स्पो २०१६
मुंबई : दर दोन वर्षांनी भारतात होणारा ऑटो एक्स्पो शो दिल्लीत आयोजित करण्यात आला आहे. पुढील वर्षी ५ ते ९ फेब्रुवारी या कालावधीदरम्यान हा एक्स्पो शो पार पडेल. ग्रेटर नोइडा परिसरातील भव्य पटांगणावर हा शो होईल. तर ऑटो कॉम्पोनन्ट शो ४ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत होईल. २०१४ मध्ये झालेल्या ऑटो एक्स्पो शोमध्ये २६ ग्लोबल तर ४४ भारतीय गाडय़ांचे लाँचिंग झाले होते. २०० दुचाकी व तिचाकी तर ३०० कार या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. तर एक लाख वाहनप्रेमींनी या ऑटो शोला भेट दिली होती. पुढील वर्षीही तेवढय़ाच उत्साहात या शोचे आयोजन करण्याचा आयोजकांचा मानस आहे.

बीएमडब्ल्यू एक्स ३ बाजारात
नवी दिल्ली : बीएमडब्ल्यूच्या एक्स ३ एक्स ड्राइव्ह ३० डीएम स्पोर्ट या नव्या मॉडेलचे नुकतेच बाजारात आगमन झाले आहे. बीएमडब्ल्यूच्या चेन्नईतील प्लान्टमध्ये या गाडीची निर्मिती करण्यात आली असून देशभरात ती विक्रीसाठी उपलब्ध आहे. बीएमडब्ल्यू एक्स ३ सहा रंगांमध्ये उपलब्ध असून कार्बन ब्लॅक मेटॅलिक या रंगाच्या मॉडेलला सर्वाधिक मागणी आहे. चालकासाठी स्पोर्टस सीट, एम लेदर स्टीअरिंग व्हील आणि स्पोर्टी अ‍ॅम्बियन्स ही या गाडीच्या अंतरंगाची वैशिष्टय़े आहेत. ३० डी आणि २० डी या दोन व्हेरिएन्ट्समध्ये बीएमडब्ल्यू एक्स ३ उपलब्ध असून या गाडीची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत ६० लाख रुपये आहे.

विक्रीचा मर्सिडीज बेन्झचा विक्रम
मुंबई : वाहननिर्मिती क्षेत्र मंदीच्या खाचखळग्यांतून मार्गक्रमण करत असतानाच मर्सिडीजने मात्र विक्रीचा नवा विक्रम नोंदवला आहे. जानेवारी ते जून या कालावधीत मर्सिडीजच्या विविध अशा सहा हजार ६५९ गाडय़ांची विक्री झाल्याची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ ४१ टक्क्य़ांनी जास्त आहे. ही सर्वाधिक विक्री नोंदवण्याचे मुख्य कारण म्हणजे सर्वात मोठी उत्पादन श्रेणी असलेल्या विविध गाड्या असून त्यांत नवीन पिढीतील गाड्या, एसयूव्हीज, एएमजी परफॉर्मन्स कार्स आणि सेडान्स यांचा समावेश आहे.  यापकी सी क्लास आणि ई क्लास लक्झरी सेडान या गाड्या सातत्याने ग्राहकांची पहिली पसंती ठरल्या असून एसयूव्ही विशेषकरून एम क्लास ही सातत्याने मागणी नोंदवत आहे त्या पाठोपाठ जीएल क्लास लाही चांगली मागणी आहे. सी २२० सीडीआय आणि तीच्या स्थानिक उत्पादनामुळे मर्सिडीज बेन्झ आता सातत्याने वाढत्या लक्झरी सेडान ची मागणी पूर्ण करू शकत आहे. यशस्वीरित्या सुरू असणाऱ्या एनजीसीज विशेष करून सीएलए आणि जीएलए मुळे विविध बाजारपेठा विशेष करून तरुण ग्राहकांमध्ये वाढ दिसून येते. जीएलए २०० सीडीआयच्या स्थानिक उत्पादनामुळे एसयूव्हीची मागणी पूर्ण होणार असल्याने वेटिंग चा कालावधी कमी होऊ लागेल अशी आशा आहे. ‘दि ड्रीम कार्स’ आणि हाय परफॉर्मन्स एएमजी मॉडेल्स मुळे ही दीर्घकालीन वाढ होऊ शकली आहे.

कार्सऑनरेंटच्या ताफ्यात ऑटोमॅटिक कार्स
मुंबई : तुम्हाला लाँग ड्राइव्हला जायचं असेल किंवा मग बिझनेस मीटिंगसाठी कोणाला भेटायचे असेल तर विविध कार्सचा पर्याय खुल्या करून देणाऱ्या कार्सऑनरेंट या संकेतस्थळाने आता त्यांच्या ताफ्यात ऑटोमॅटिक कार्सचा समावेश केला आहे. या ताफ्यात मर्सिडीजच्या सी व ई क्लास, होंडा सिटी, ह्य़ुंदाई आय१० यांसह विविध गाडय़ांचा समावेश आहे. मोबाइलवरूनही या गाडय़ांचे बुकिंग करता येणे शक्य आहे. सर्व गाडय़ांमध्ये जीपीएस यंत्रणा स्थापित केली असल्याने गाडी नेमकी कोठे आहे, याची चाचपणी करता येणे शक्य आहे. ३४ प्रकारच्या गाडय़ांमध्ये इलेक्ट्रिक गाडय़ांपासून ते ऑटोमॅटिक गाडय़ांपर्यंत सर्व गाडय़ांचा समावेश असून एक हजार गाडय़ांचा ताफा ग्राहकांच्या दिमतीला आहे. २१ शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध आहे.