News Flash

वाहन पार्किंग करताना सावधान

आपण नेहमी वाहन चालवताना झालेल्या अपघाताबाबत चर्चा केली, पण कधी हा विचार केला का, की स्थिर उभ्या असलेल्या वाहनाला अपघात होऊ शकतो का? उभ्या असलेल्या

| March 27, 2014 12:12 pm

आपण नेहमी वाहन चालवताना झालेल्या अपघाताबाबत चर्चा केली, पण कधी हा विचार केला का, की स्थिर उभ्या असलेल्या वाहनाला अपघात होऊ शकतो का? उभ्या असलेल्या वाहनाचा अपघात झाला असता नुकसानभरपाई कशी व कोणाकडून मिळवायची? वस्तुत अपघात हा स्थिर वाहना बाबत देखील होतो. अचानक एखादे वाहन एका स्थिर उभ्या वाहनाला येऊन धडकले व त्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर स्थिर उभ्या असलेल्या वाहनाचे मालक व चालकही या अपघाताला जबाबदार असतील न्यायव्यवस्थेने स्पष्ट केले आहे. हे थोडेसे मनाला पटण्यासारखे नसले तरी न्यायव्यवस्थेने त्यास योग्य असे समर्थन केलेले आहे.
‘मोटार वाहनाच्या वापरा मुळे होणारा अपघात’ ही अशी शब्द रचना कलम १४७ (१) (ब) मध्ये वापरण्यात आली आहे. त्यामुळे या शब्द रचनेला संकुचित अर्थ न स्वीकारता न्यायव्यवस्थेने विस्तृत व व्यापक अर्थ दिलेला आहे. या शब्द रचनेचा संकुचित अर्थ न्यायव्यवस्थेला मान्य नाही. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी विरुद्ध आमिर बाशा या खटल्याचा निकाल देताना न्यायव्यवस्थेने प्रथम विस्तृत व व्यापक असा अर्थ लावला आहे. या खटल्यात वाहन एका रस्त्या लगतच्या वर्कशॉप मध्ये उभे होते. त्यावर वेल्डिंगचे कामकाज चालू होते. अचानक वेिल्डगचे कामकाज करताना वाहनाच्या पेट्रोल टाकीने पेट घेतला. या आगीत मेकॅनिक जखमी व मृत्यूमुखी पावले. या प्रकरणी न्यायालयाने मोटार वाहन कायद्यानुसार संबंधित वाहनाच्या मालकाला अपघातासाठी जबाबदार धरले व त्याला संबंधितांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. या निकालाचा परिणाम वर नमूद शब्द रचनेचा विस्तृत असा अर्थ वेगवेगळया घटनांमध्ये लावण्यात आला. तसेच काही वेळा उभे असलेले वाहन अचानक पेट घेते, अथवा पेट्रोल वा डिझेलच्या वा नवीन गाडय़ांच्या सिलेंडरच्या टाक्या यांचा अचानक स्फोट होतो, किंवा काही वेळा तांत्रिक अडचणींमुळे स्थिर वाहनात लोक गुदमरतात अशा परिस्थितीतही अपघातग्रस्तांना आता मदत मिळते, व वाहनाच्या मालकाला अपघातप्रकरणी  जबाबदार धरले जाते. बऱ्याचदा तीव्र उतारावर वाहन पार्क केलेले असते व तिसऱ्याच कोणा व्यक्तीच्या चुकीमुळे वाहन हे अपघतास कारणीभूत होते. अशा परिस्थितीतही संबंधित वाहन चालक किंवा मालक अपघातासाठी जबाबदार धरला जातो. म्हणूनच आपण आपले वाहन एखाद्या सुरक्षित स्थळी पार्क करणे महत्त्वाचे आहे. आपल्या चुकीच्या पद्धतीने वाहन पार्क करण्याने देखील आपण एखाद्या अपघाताला कारणीभूत ठरू शकतो हे स्पष्ट होते.
jayramsuryawanshi @gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2014 12:12 pm

Web Title: be alert while parking your vehicle
Next Stories
1 मी बाइकवेडा.. फटफजिती
2 सेलेरिओ.. सुखद अनुभव
3 हर कलम कुछ कहता है..
Just Now!
X