News Flash

मी बाइकवेडा.. : मोलाची साथ

मी वयाच्या ४०व्या वर्षी बजाज कॅलिबर बाइक विकत घेतली. त्याआधी मी चेतक स्कूटर वापरायचो. त्यामुळे दुचाकी चालवण्याचा छंद तसा जुनाच.

| October 16, 2014 02:56 am

मी वयाच्या ४०व्या वर्षी बजाज कॅलिबर बाइक विकत घेतली. त्याआधी मी चेतक स्कूटर वापरायचो. त्यामुळे दुचाकी चालवण्याचा छंद तसा जुनाच. सध्या माझ्याकडे अ‍ॅव्हेंजर ही बाइक आहे. कुठेही एकटय़ाने प्रवास करण्याची वेळ येते त्या वेळी मी बाइकनेच प्रवास करतो. जळगाव, पाचोरा, कराड या ठिकाणी माझे बरेचसे नातेवाईक असल्याने सुट्टीच्या दिवशी पहाटे पाच वाजता उठून उन्हं वर यायच्या आधीच मी कराड सहज गाठतो.
२०१० मध्ये माझी बायपास सर्जरी झाली. शस्त्रक्रियेनंतर सहा महिन्यांची विश्रांती घेऊन प्रसंगी घरच्यांचा विरोध पत्करून पुन्हा एकदा बाइक चालवायला सुरुवात केली. हळूहळू तब्येतीची गाडी पूर्वपदावर आल्यावर कुठेतरी लांबचा प्रवास करण्याचा इरादा होता. यंदाच्या वर्षी एप्रिलमध्ये ठाण्यातील एका मित्राकडे गेलो होतो. तेव्हा त्याच्याकडून ट्रेकमेट्स इंडिया या संस्थेची माहिती मिळाली. ही संस्था लेह-लडाख येथे बाइक टूर्स आयोजित करते. ताबडतोब त्यांच्याशी संपर्क साधून १९ जुल २०१४च्या टूरसाठी नाव नोंदवले. वांद्रे टर्मिनसवरून निघून २० तारखेला आम्ही चंदिगढला पोहोचलो. २१ जुलपासून माझ्या ड्रीम टूरची सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी स्वारघाट-िपजोर, सतलजवरचे प्रचंड भाक्रा-नानगल धरण यामाग्रे ३२५ किमीचा प्रवास करून मनालीला पोहोचलो. उत्साह असल्याने थकवा जाणवला नाही. दुसऱ्या दिवशी तांडी-रोहतांग पास, कोकिला-पांग येथे १५ हजार ८२० फूट उंचीचा टप्पा गाठला. त्यानंतर पांग ते लेह हा २०० किमीचा प्रवास करून १७ हजार ६८० फूट उंचीवर आम्ही आलो. खार्दुगला पास येथे १८ हजार ३८० फुटांवर पोहोचल्यानंतर ऊर अभिमानाने दाटून आला. बायपास सर्जरी झालेली असूनही मी एवढा मोठा पल्ला गाठल्याने मला अत्यानंद झाला. हा क्षण साजरा करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. या संपूर्ण प्रवासात मला माझ्या अ‍ॅव्हेंजर बाइकने खूप मोलाची साथ दिली.
– प्रमोद थिटे, डोंबिवली

पुसद ते नागपूर
dr07बाइक चालवायची मला भारी हौस. आठव्या वर्गात असतानाच मला हा छंद लागला. मात्र, लहान असल्याने माझ्या घरचे माझ्या हातात बाइक द्यायचे नाहीत. मग घरचे कधी बाहेर गेले की मी बाइकला हात लावायचो. ती चालवण्याचा प्रयत्नही करून पाहिला. चक्क सायकल चालवतात तशी बाइकही चालवून पाहिली. गाडी ढकलत ढकलत नेत मी संपूर्ण कॉलनीत फिरायचो. नंतर मग मित्रांच्या सोबतीने मोकळ्या मदानात फिरवून पाहिली. मात्र, गाडी येत नव्हती. हळूहळू मनाचा हिय्या करून गाडी शिकलो. तोपर्यंत मी बारावीला पोहोचलो होतो. लायसन्स हाती आल्यानंतर मग मी गाडी बिनधास्तपणे फिरवायला लागलो. याच वर्षी जानेवारी महिन्यात मला शिक्षणासाठी नागपूरला जाण्याचा योग आला. प्रथम विचार केला की बसने जावे. पण मग एकदा बाइकने जायला काय हरकत आहे, असा विचार केला. पुसद ते नागपूर फार नाही अवघे २९० किमीचे अंतर आहे. म्हटलं सहज पार करून जाऊ. घरच्यांनी सुरुवातीला खळखळ केली. मात्र, नंतर त्यांनी परवानगी दिलीच. मग ठरल्याप्रमाणे सकाळी सहा वाजता मी माझी बजाज प्लॅटिना बाहेर काढली. देवाचे नाव घेतले आणि किक् मारली. पुसद ते नागपूर हा प्रवास मी प्रथमच करणार होतो. त्यामुळे थोडी धाकधूक होती. मात्र, मग मित्र व घरच्यांनी धीर दिला. मीही निघालो मग. हळूहळू मनावरचे दडपण कमी कमी होत गेले व मला धीर यायला लागला. तसतसा माझा आत्मविश्वास वाढू लागला. पुसद-नागपूर हे अंतर मी साडेसहा तासांत पार करून दुपारी एकच्या सुमारास नागपुरात पोहोचलोही. आनंद गगनात मावेनासा झाला होता. घरच्यांना आनंदवार्ता कळवली. आता तर मी या मार्गावरचा एक्स्पर्ट झालो आहे. सुटय़ांमध्ये नागपूर-पुसद हा प्रवास ठरूनच गेला आहे. आतापर्यंत सात-आठ वेळा मी या मार्गावरून प्रवास केला आहे. प्रवास करताना मात्र मी वाहतुकीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळतो. शिवाय सुरक्षेची सर्व साधनेही वापरतो. हेल्मेट बाइकस्वारांसाठी खूप महत्त्वाचे आहे, ते प्रत्येकाने वापरायलाच हवे.
– चंद्रशेखर वानखेडे, पुसद

सहा देशांची सफर
गेल्याच वर्षी मी व माझा सहकारी आम्ही दोघांनी पश्चिम अमेरिका बाइकवरून पालथी घातली. परतीच्या प्रवासात आम्ही पूर्व युरोपात फिरायचा बेत आखला. त्यानुसार मग प्रवासाचे नियोजन केले. नेटवरून अ‍ॅडिओक्रॅटिक मोटारबाइक टूर्सची माहिती काढली. त्यांच्याचकडून बीएमडब्ल्यूची १२०० सीसीची बाइक बुक केली. प्रतिदिन १२० युरो असे भाडे ठरले. तसेच गाडीवर जीपीएस सिस्टीमही होती त्यामुळे रस्ते चुकायची संधी नव्हती. एकूण सहा देशांत मुक्कामासाठी आम्ही इंटरनेटवरूनच हॉटेले बुक केली. स्लॉव्हेनिया, ऑस्ट्रिया, हंगेरी, स्लोव्हाकिया, पोलंड व झेक रिपब्लिक या सहाही देशांचा व्हिसा मिळवला व प्रवासाला सुरुवात केली. शक्यतो खेडय़ांमधून फिरायचे असे आम्ही ठरवले होते. जीपीएसमुळे रस्ते चुकत नव्हतो. आमचा प्रवास सुखाचा सुरू होता. फक्त एकदा बुडापेस्टमध्ये जंगी मॅरेथॉन चालू होती त्यामुळे सर्व रस्त्यांची वाहतूक दुसरीकडे वळवण्यात आली होती. त्यामुळे आमचा गोंधळ उडाला. शहराच्या बाहेर पडताना गोल गोल फिरत राहावे लागले. अखेरीस स्थानिक वाहतूक पोलिसांनी आमची सोडवणूक करून योग्य मार्गाला लावले. आम्ही एकूण ३१०० किमीचा प्रवास केला. मी व माझा सहकारी आम्ही दोघेही आलटून पालटून गाडी चालवायचो. हायवेवर आमचा वेग १२० ते १८० किमी प्रतितास असा होता. तर खेडेगावांत हाच वेग ३० किमी प्रतितास होता. रस्ते वळणावळणाचे असल्याने वेग कमी करावा लागायचा. प्रत्येक देशाचा अनुभव मात्र वेगवेगळा असायचा. रोज किमान २५० ते ५०० किमी प्रवास आम्ही करायचो. अखेरच्या दिवशी बाइक परत देताना आम्ही जर्मनीमाग्रे आलो. जाताना येथील वर्णभेदाबद्दल ऐकले होते, मात्र आम्हाला असा अनुभव कुठेही आला नाही. उलटपक्षी सर्व ठिकाणी आमचे प्रेमाने स्वागत व्हायचे.
– अजित खानविलकर, अलिबाग

मी बाइकवेडा..
तुमच्या बाइकविषयीच्या आठवणी आम्हाला कळवायच्या. त्या आम्ही शब्दबद्ध करून ‘ड्राइव्ह इट’ पानावर प्रसिद्ध करू. सोबत तुमचा व बाइकचा फोटो असणे अत्यावश्यक. ‘मी बाइकवेडा’ या सदरासाठी असा उल्लेख जरूर करा. मग, चला उचला लेखणी आणि मारा किक.. आठवणींना..!
शब्दमर्यादा : २०० शब्द.
ई-पत्ता : vinay.upasani @expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2014 2:56 am

Web Title: bike crazy
Next Stories
1 कोणती कार घेऊ?
2 कारनामा
3 पेट्रोल कारच बरी
Just Now!
X