19 September 2020

News Flash

मी बाइकवेडा.. स्टर्जिस रॅलीतला बाइकवेडा

तुमच्या बाइकविषयीच्या आठवणी आम्हाला कळवायच्या. त्या आम्ही शब्दबद्ध करून ‘ड्राइव्ह इट’ पानावर प्रसिद्ध करू. सोबत तुमचा व बाइकचा फोटो असणे अत्यावश्यक.

| June 19, 2014 09:36 am

तुमच्या बाइकविषयीच्या आठवणी आम्हाला कळवायच्या. त्या आम्ही शब्दबद्ध करून ‘ड्राइव्ह इट’ पानावर प्रसिद्ध करू. सोबत तुमचा व बाइकचा फोटो असणे अत्यावश्यक. ‘मी बाइकवेडा’ या सदरासाठी असा उल्लेख जरूर करा. मग, चला उचला लेखणी आणि मारा किक.. आठवणींना..! शब्दमर्यादा : २०० शब्द. ई-पत्ता : vinay.upasani @expressindia.com

मागच्या वर्षी जुलैची गोष्ट. अर्धागिनी माहेरी भारतात गेलेली. त्यामुळे माझ्यासारख्या बाइकवेडय़ाला रान मोकळे होते. माझी सुझुकी वोलुशिया ८०५ या सुपरबाइकने भन्नाट फिरण्याचे प्लॅनिंग मी मनोमन आखले होते. भारतात जाणाऱ्या विमानात बायकोला बसवले आणि अमेरिकेतल्या ‘स्टर्जिस रॅली’ या सगळ्यात मोठय़ा बाइक रॅलीसाठी नाव नोंदणी केली. साऊथ डाकोटातील हे एक गाव असून या ठिकाणी दरवर्षी ही बाइक रॅली भरवली जाते आणि बाइकवेडय़ांसाठी ती पर्वणीच असते. त्यामुळे मीही या रॅलीत उत्साहाने सहभागी झालो. रॅलीचा टप्पा लांबच लांब असल्याने मी माझ्या गाडीला क्रूझ कंट्रोल बसवून घेतला. या कंट्रोलमुळे गाडी स्थिर वेगात दौडत राहते. हातांना हँडल धरण्याचा जास्त त्रास नको म्हणून रिस्ट सपोर्टही बसवून घेतला. जुलैची अखेर आणि ऑगस्टची सुरुवात म्हणजे अमेरिकेतला आल्हाददायक ऋतू. अगदी प्रसन्न हवामान असते आणि जोडीला स्वच्छ सूर्यप्रकाश. १५ दिवसांच्या या रॅलीत मी साडेसहा हजार किमी अंतर कापले. माऊंट इव्हान्सवरचा १४ हजार २६५ फुटांवरचा प्रवास तर अगदी रोमांचकारीच. आपण अगदी स्वर्गातच आहोत, असे वाटते. माझी ही रॅली अगदी निवांत आणि सुखात सुरू असतानाच माझ्यावर संकट ओढवले. म्हणजे नेहमी बाइकवेडय़ांच्या वाटय़ाला येते तेच.. बाइकमधले पेट्रोल संपणे! अगदी निर्मनुष्य असलेल्या हमरस्त्यावर मी माझ्या सुपरबाइकसह हताशपणे उभा होतो. गाडय़ा भरधाव वेगाने धावत होत्या. पण थांबून कोणी विचारत नव्हते. आता आपली रॅली येथेच संपणार असे वाटत असतानाच अचानक खांद्यावर एकाचा हात पडला. ‘आय हॅव गॅस फॉर यू’ असे धीराचे बोल कानी पडले. माझ्याच वयाचा तो एक टेम्पोचालक होता. माझी अवस्था पाहून त्याने कुठेतरी आडोशाला गाडी लावली आणि पेट्रोलचा कॅन घेऊन आला माझ्याजवळ. अख्खा कॅन माझ्या गाडीत रिता करून त्याने मला रॅलीसाठी ‘बेस्ट लक’ दिले.. मी अवाक झालो..
– श्रीराम कर्पुर,
सिनसिनाटी (अमेरिका)

काली…
एमबीए करत असताना १५ ऑगस्ट २०११रोजी झेंडावंदनानंतर नरिमन पॉइंटला फिरताना बुलेटची फायिरग ऐकली. हिल्टन हॉटेलसमोरच्या मोकळ्या परिसरात सर्व बुलेटस्वार विश्रांतीसाठी थांबले होते. गणवेशातील त्या सर्वाचा रुबाब आणि बुलेटची धडधड पाहून मलाही वाटले की आपणही त्यांच्यात सामील व्हावे. या विचारातूनच मी डिसेंबरमध्ये रॉयल एन्फिल्ड थंडरबर्ड बुक केली. तिच्या चकचकीत काळ्या डिझाइनने मला भुरळ घातली होती. बस्स.. हीच ती.. हिच्यावर स्वार होऊन वा-याशी स्पर्धा करायची एवढंच मी ठरवलं. मला गाडी येते की नाही याचाही विचार नव्हता केला त्यावेळी मी. पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर थंडरबर्ड आली माझ्या दारात. पण मनात धाकधूक निर्माण झाली. पहिले सहा महिने तर तिला स्पर्श करायलाही धजावले नाही माझे मन. ती चालवणे तर दूरचीच गोष्ट. दरम्यानच्या काळात एकदाच तिला मेन स्टँडवरून खाली उतरवायचा प्रयत्न केला. मात्र, हा माझा प्रयत्न अक्षरश अपयशी ठरला. अखेरीस एमबीए पूर्ण होण्याच्या आधी थंडरबर्ड चालवायचीच असा निर्धारच केला मनाशी. कारण सर्वजण टोमणे मारायला लागले होते. चालवता येत नाही तर घेतली कशाला इ. इ. शिवाजी पार्कातल्या मोकळ्या मदानावर रात्री माझी सरावमोहीम सुरू झाली. थंडरबर्ड चालवताना उडणारी भंबेरी पाहायला मदानावर फार कमी लोक उपस्थित असायचे, एवढंच समाधान. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट.. अखेरीस महिनाभराच्या सरावानंतर मी थंडरबर्ड चालवायला लागले. आत्मविश्वास वाढला. कॉलेजलाही घेऊन जायला लागले. गेल्यावर्षी तर थेट गोव्यापर्यंत मजल मारली थंडरबर्डवरून. यंदाच्या वर्षी गुढीपाडव्याला नववर्ष स्वागतयात्रेतही झोकात सामील झाले मी माझ्या थंडरबर्डवरून. माझ्या थंडरबर्डचे नाव मी लाडाने काली असे ठेवले आहे. काली म्हणजे शक्तीचे रूप.. तिने माझे आयुष्यच बदलून टाकले आहे. एक खास ओळखही दिली आहे मला माझ्या कालीने..
– अश्विनी मराठे,
मुंबई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2014 9:36 am

Web Title: bike ride moments
Next Stories
1 कोणती कार घेऊ?
2 सुरक्षित ड्रायव्हिंगला प्रोत्साहन देण्यासाठी ‘ऑटोकार इंडिया’द्वारे अनोखी स्पर्धा!
3 अमेझिंग!
Just Now!
X