लोकप्रिय अभिनेता पंढरीनाथ कांबळे ऊर्फ पॅडी एका आगामी नाटक तसेच सिनेमात काम करणार असून ‘एक कटिंग’ नावाच्या चित्रपटाचे चित्रीकरण त्याने नुकतेच पूर्ण केले आहे. सध्या कॉमेडीची ‘बुलेट ट्रेन’ या स्टॅण्डअप कॉमेडी मालिकेतून तो प्रेक्षकांसमोर झळकत आहे.

दहा वर्षांपूर्वीचा काळ आठवला तर तेव्हा मी ‘हसा चकटफू’ वगैरे टीव्हीवर मालिका करीत होतो. तेव्हा ‘ऑल दी बेस्ट’ या नाटकाबरोबरच भरत जाधवचे ‘सही रे सही’ हे नाटक तुफान लोकप्रिय झाले होते. ‘सही रे सही’मुळे मिळालेल्या लोकप्रियतेनंतर लगेचच भरत जाधवने होंडा सिटी गाडी घेतली. तेव्हापासून भरत जाधव लोकांशी कसा बोलतो, कसा वागतो, त्याच्याकडे कोणती गाडी आहे, प्रेक्षक, सहकालाकार यांच्याशी बोलण्याची त्याची पद्धत, हे सारे काही मी फॉलो करीत आलो आहे. त्यामुळेच कदाचित भरतने पहिल्यांदा होंडा सिटी गाडी घेतली हे डोक्यात होते. म्हणून दीड-दोन वर्षांपूर्वी जेव्हा पैशांची तजवीज झाली तेव्हा मीसुद्धा होंडा सिटीची पांढरीशुभ्र गाडी घेतली. भरतला फॉलो करण्याबरोबरच ही गाडी उत्तम परफॉर्मन्स देते, तसेच ‘लेग स्पेस’ही भरपूर आहे असे फायदे आहेतच. गाडी बुक केल्यानंतर बायको आणि दोन्ही मुलींना मी सांगितले नव्हते. गाडीची डिलिव्हरी घेऊन थेट त्यांच्यासमोर उभा राहिलो आणि त्यांना सुखदाश्चर्याचा धक्का दिला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहूनच गाडीचे पैसे वसूल झाल्याचा निर्भेळ आनंद मलाही मिळाला. भरत जाधवने नंतर खूप निरनिराळ्या मॉडेलच्या गाडय़ा घेतल्या. त्याने अलीकडेच बीएमडब्ल्यू एक्स फाइव्ह ही गाडी घेतली तेव्हाही आम्हा मित्रांनी त्यातून फेरफटका मारून धमाल केली होती. भरतला फॉलो करीत असल्यामुळे माझी ड्रीम कारसुद्धा बीएमडब्ल्यूच्या एक्स सीरिजमधील गाडी हीच असेल.
संकलन – सुनील नांदगावकर
पंढरीनाथ कांबळे