मला ऑटो गीअरची गाडी घ्यायची आहे. बजेट आठ ते नऊ लाख रुपये असून डिझेलवर चालणारी गाडी घेण्याची इच्छा आहे. रोजचा माझा प्रवास ९० ते १०० किमी आहे. मात्र, तोही मुंबईतच. मारुती, होंडा, ह्य़ुंदाई, फोक्सवॅगन की अन्य कुठला पर्याय आहे? -मीलन तोपकर
टाटा झेस्ट एक्सएमए डिझेल ही ८.२ लाख रुपयांत मिळणारी गाडी तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकेल. ती इंधनस्नेही गाडी असून किमान २३ किमी प्रतिलिटर एवढा मायलेज देते. शिवाय अलीकडेच ती बाजारात आली आहे. मुंबईसारख्या शहरांतील रस्त्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. स्कोडा रॅपिड सी सेग्मेंटमधील १.५ टीडीांय डिझेल इंजिन आणि सेव्हन स्पीड ऑटोमॅटिक डीएसजी ट्रान्समिशन साडेनऊ लाख रुपये ऑनरोड प्राइस यांचाही विचार करायला हरकत नाही. शिवाय सर्व फीचर्स ऑटो ट्रान्समिशनचे असून डिझेल व्हर्जन गाडी आहे.

 माझ्याकडे स्विफ्ट एलडीआय आहे. गेल्या चार वर्षांपासून मी ही गाडी वापरतो आहे. माझ्या कुटुंबात आम्ही चारजण आहोत. शक्यतो मी एकटाच ड्राइव्ह करतो. मी ड्रायव्हर ठेवू शकत नाही की कोणाला मी माझी गाडी चालवू देत नाही. माझे बजेट आठ ते दहा लाख रुपये आहे. माझ्यासाठी कोणती गाडी अधिक योग्य ठरेल, जी मला ड्रायिव्हग कम्फर्टही देईल आणि मायलेज देऊन कमीत कमी मेन्टेनन्स जिला लागेल. – जगदीश आपटे
’ तुम्ही कार चालवता त्यामुळे तुम्हाला त्यातील खाचाखोचा माहीत आहेत. तुम्हाला डिझेलवर चालणारी गाडी घ्यायची असेल तर फोर्ड इकोस्पोर्ट टीडीसीआय ही तुम्हाला ऑफरोड, सिटी आणि हायवे या तीनही प्रकारांसाठी अगदी योग्य ठरेल. तिचा मायलेजही १७ किमी प्रतिलिटर आहे. तसेच ती तुमच्या बजेटमध्येही बसणारी आहे. तुम्हाला सेडान घ्यायची असेल तर फियाट लिनिया चांगली आहे, कारण तिचे १२४८ सीसीचे डिझेल इंजिन दमदार आहे.

नवीन ह्य़ुंडाई एक्ससेंट घ्यायचा माझा विचार आहे. कृपया तिच्याबद्दल मला तुमचे मत कळवा. तिचा मायलेज कसा आहे, ती परवडू शकते का? -सुमीत जमडे
ह्य़ुंडाई एक्ससेंट ही चांगली कार आहे आणि तिचा मायलेजही चांगला आहे, परंतु ती खूप कॉम्पॅक्ट असून आत जागा बऱ्यापकी कमी आहे. तुम्ही त्यापेक्षा फोर्ड क्लासिक किंवा स्विफ्ट डिझायर वा ह्य़ुंडाईची आय २० एलिट या गाडय़ांचा विचार करा. एक्ससेंटच्याच किमतीतल्या या गाडय़ा असून मागच्या सीटवर तीनजण आरामात बसू शकतात. तुम्ही एकटेच गाडी चालवणारे असाल आणि तुम्हाला चांगला मायलेज देणारी सेडानच हवी असेल व गाडीत जागाही प्रशस्त हवी असेल तर मग वरील गाडय़ा तुमच्यासाठी नाहीत. आय २० एलिटमध्ये सस्पेन्शन सिस्टीम चांगली असून १.२ व्हीटीव्हीटी इंजिन ताकदवान आहे.

या सदरासाठी तुमचे प्रश्न ls.driveit@gmail.com वर पाठवा.