माझे माहेर म्हणजे हजार लोकवस्तीचे एक टुमदार गाव. लहानपणी गाडी पाहून वाटायचे की आपणही गाडी चालवावी. मी मोपेड चालवायला शिकले तेच बेचाळिसाव्या वर्षी. कार शिकायचा योग जुळून आला तो वयाच्या पंचावान्नाव्या वर्षी कार घेतल्यावर. कार शिकण्याचा श्रीगणेशा केल्यावर अनेकांनी सांगायला सुरुवात केली की ‘कार चालवणे सोपे नाही’, ‘या वयात शिकता येणार नाही’, मग मनाशी निर्धार केला की कार चालवायला शिकायचेच. ट्रेनरकडून दोन आठवडय़ात कार चालवायला शिकून घेतले, पण खरी कसोटी लागली ती कार एकटे चालवण्यामध्ये. कधी ऑटो तर कधी गाय तर कधी सायकल माझ्या वाहन साधनेत व्यत्यय आणत. एकटे कार चालविताना भीती वाटायची, कुणी बाजूला असल्यावर मात्र आत्मविश्वासने कार चालवायचे. आमच्या यजमानांना रोज सोबत घेऊन कार चालवायला जायचे, पण ऑफिसच्या व्यापामुळे यांनापण वेळ मिळेनासा झाला आणि माझे कार चालविणे होईनासे झाले. माझे सासरे मला एक दिवशी म्हणाले की मी तुझ्यासोबत येईल तू कार चालवत जा. माझ्या सासाऱ्यांचे वय आहे पंच्याऐंशी वर्षे, या वयात ते मला कार चालावता यावी म्हणून प्रयत्न करीत आहेत हे पाहून मग नवीन उत्साहाने कार चालवणे सुरू केले आणि कार चालवण्यात लवकरच प्रभुत्व मिळविले. आता तर नातू आणि सुनेला घेऊन बेंगलोरमध्ये रोज गाडी घेऊन फेरफटका मारायला जाते. मी हेच सांगू इच्छिते की तीव्र इच्छाशक्ती व निर्धार असल्यास कोणतेही नवे कौशल्य शिकण्यास वयाची आडकठी नसते.
– अमिता नगरकर, अमरावती

ड्रायव्हिंग शिकणं हा एक भन्नाट अनुभव असतो. तुमचा ड्रायिव्हग शिकण्याचा अनुभव कसा होता, शिकल्यानंतर तुम्ही लाँग ड्राइव्हला कुठे गेलात, थोडक्यात तुमची ‘कार’कीर्द कशी घडली, याची माहिती तुम्ही ‘लोकसत्ता’कडे शेअर करायची.  मेल करा. ls.driveit@gmail.com