ड्रायिव्हग हा अनेकांच्या आवडीचा विषय. स्वतची कार घेऊन लाँग ड्राइव्हला जाण्याचा आनंद तर विरळाच. कार चालवताना अनेक व्यवधाने पाळावी लागतात. या व्यवधानांमध्येच कारच्या महत्त्वाच्या भागांची किमान जुजबी ओळख असण्याचाही समावेश आहे. काहींना ही ओळख असते तर काहीजण अनुभवातून शिकतात. चालत्या गाडीने रस्त्यात अचानक असहकार पुकारला की मग याचे महत्त्व पटते. गाडीच्या महत्त्वाच्या भागांची माहिती या सदरातून ओळख करून देणारा हा कारनामा.
ड्रायिव्हग सीटवर बसल्यानंतर चावी फिरवली की प्रथम गाडी सुरू होते. क्लच दाबून गीअर टाकला आणि थोडे अ‍ॅॅक्सिलेटर दाबले की गाडी वेग घेते. गाडी सुरू होण्याच्या या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका अर्थातच इंजिन बजावते. बरेचदा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र, गाडी थोडी जरी बिघडली की आपल्याला प्रथम आठवण होते ती या इंजिनाचीच.
पेट्रोल आणि डिझेल या दोन प्रकारच्या इंधनावर मुख्यत गाडी चालते. या इंधनानुसारच इंजिनाची रचना असते. यालाच इंटर्नल कॉम्बश्चन इंजिन (किंवा आयसी इंजिन) असे म्हटले जाते. आयसी इंजिनाचा आकार क्युबिक सेंटिमीटरमध्ये (सीसी) मोजला जातो. यातच इंधनाचे ज्वलन होऊन उर्जा निर्माण होते आणि या ऊर्जेमुळेच गाडीला वेग येतो. इंजिनाचे काम कसे चालते, त्यात काय बिघाड होऊ शकतो, त्यावर प्राथमिक उपचार कोणते, याविषयी तपशीलवार माहिती आपण या सदरात घेणार आहोत. त्याचबरोबर गाडीच्या इतरही भागांविषयी टप्प्याटप्प्याने ओळख करून घेऊ. तूर्तास एवढेच.