03 March 2021

News Flash

माझी ‘कार’कीर्द..

गेल्या वर्षी मुलगा आणि सून यांची ट्रान्स्फर पुण्यात झाल्यामुळे आम्ही तात्पुरते पुण्यात स्थायिक झालो. रोज सकाळी मॉर्निगवॉकला जाताना वेगवेगळ्या मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या गाडय़ा बघितल्या की

| July 31, 2015 04:09 am

गेल्या वर्षी मुलगा आणि सून यांची ट्रान्स्फर पुण्यात झाल्यामुळे आम्ही तात्पुरते पुण्यात स्थायिक झालो. रोज सकाळी मॉर्निगवॉकला जाताना वेगवेगळ्या मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या गाडय़ा बघितल्या की माझ्यातील कार ड्रायव्हिंगची इच्छा तीव्र होई. मग काय? जवळच्याच ‘हिंदवी’मध्ये जाऊन चौकशी केली की, मला साधी सायकल, स्कूटरसुद्धा चालवता येत नाही, मला ड्रायव्हिंगमधले अइउऊ सुद्धा माहीत नाही. मी फोर व्हीलर शिकू शकते का? शकेन का? अभयने माझ्यातले भय पहिल्याच दिवशी काढून टाकले. ‘अवश्य शिकू शकता.’
दुसऱ्या दिवशीपासून माझी कार शाळा सुरू झाली. दिलेल्या सूचना अगदी एकाग्र चित्ताने मी ऐकत असे व आचरणात आणत असे. वर्गातल्या विद्यार्थ्यांप्रमाणे एकदम चूपचाप विद्यार्थी मी झाले होते. नंतर नंतर या विद्यार्थ्यांच्या बॅचचा विश्वास दृढावल्यावर गाडीत म्युझिकच्या साथीने ड्रायव्हिंग सुरू झाले. पहिल्याच दिवशी मी ड्रायव्हिंगला बसल्यावर माझे अत्यंत आवडते गाणे ‘पल पल दिल के पास’ लागल्यावर मी एकदम खूश. पण!!
माझा एक वीकपॉईन्ट आहे की मी काम करू लागले की एकाग्र होते व मी बोलत नाही. मी जर बडबड सुरू केली की माझे कामावरचे लक्ष उडते, अर्थात कॉन्स्न्ट्रेशन होत नाही. छान ड्रायव्हिंग येऊ लागलेली मी बडबड सुरू झाल्यावर चुका करू लागले आणि माझा एकाग्रपणा ढळला. शाळा सुटल्यावर माझे सर म्हणाले, ‘मॅडम, आज काय झालं? लक्ष कुठे होतं? काय गडबड केली? मला अगदी अस्वस्थ वाटू लागले. आपलं लक्ष कुठय? गाण्याकडे? मी मनाला विचारलं, तुला गाणं ऐकायचयं की ड्रायव्हिंग शिकायचंय? घरी आल्यावर रोजची प्रगती मुलाला- कौस्तुभला सांगत असे. आजचा पराक्रम त्याला सांगितला तर तो हसायलाच लागला. तो म्हणाला, ‘आई तू आता तुझ्या शाळेत नाहीस. एकदम चूपचाप बसून ड्रायव्हिंग करायचे नसते, मस्तपैकी गाणी ऐकत, गप्पा मारत पण लक्षपूर्वक ड्रायव्हिंग करण्यातच खरी मजा आहे. तू फक्त गाण्याकडे लक्ष दिलेस आणि गडबड केलीस.’ दुसऱ्या दिवशी माझ्या ड्रायव्हिंगच्या सरांनीसुद्धा मला हेच सांगितलं. मग काय, आम्हा सर्व विद्यार्थ्यांची व सरांची छान गट्टीच जमली. माझ्या वर्गात (कारमध्ये) बहुतेक जण मोठय़ा वयात गाडी शिकणारेच असत. आम्हा समवयस्कांच्या आणि माझा मानसपुत्र ‘सर’, आमच्या गाणी ऐकत, गप्पा मारत, पुस्तक सिनेमा यावर चर्चा करत, माझे ड्रायव्हिंग सुरू झाले. (मानसपुत्र हे कौस्तुभने दिलेले खास नाव).
बघता बघता महिना झाला. परीक्षा जवळ आली, पण मला ही शाळा कधी संपूच नये असं वाटत होतं. आणि झालं तसच पहिल्याच वेळेला दांडी गुल! परीक्षकांनी १ ते ५ गीअर टाका सांगितल्यावर मी आज्ञा शिरसावंद्य पाळली व आयुष्यात प्रथमचो शिक्का लागला. माझी मलाच लाज वाटली. सरांना तोंड दाखवू नये असं वाटलं. धरणी पोटात घेईल तर बरे असे झाले होते.
पण नाही. पाण्यात पडल्यावर पैलतीर गाठायचाच, मधेच गटांगळ्या खायच्या नाहीत, प्रवाहाबरोबर वाहत जायचे नाही, असं शाळेत मुलांना सांगणारी मी रात्रभर विचार केला व पुन्हा दुसऱ्या दिवशी (शाळेत) ड्रायव्हिंग स्कूलमध्ये दाखल. आमच्या सरांनी या रिपीटरचे स्वागतच केले. पुन्हा एक महिना वाढवून घेतला आणि आदल्या दिवशी काय चुका केल्या ते आज करून दाखवा मॅडम असे सांगितल्यावर गाडी स्टार्ट केली. काल अंगात आलेल्या गाडीच्या आज मात्र अंगात आले नाही. ती एकदम सुतासारखी सरळ छान स्टार्ट झाली आणि सर्व माझं गुडगर्लसारखं ऐकत होती. आता तर कधी व्ॉगन आर तर कधी सॅन्ट्रोवर जोरात प्रॅक्टिस सुरू.
आता पुन्हा परीक्षेचा दिवस जवळ आला तसं घरच्या गाडीवर आई आपण प्रॅक्टिस करू या. झालं रोज रात्री कौस्तुभबरोबर व्ॉगन आरवर सराव सुरू. पण काय कोण जाणे, मला खूप भीती वाटायची, खूप दडपण यायचं आणि दिवसा आत्मविश्वासाने गाडी चालवणारी मी रात्री एकदम शून्य. माझ्या मनानं घेतलं की दुपारी मी चुका केल्या तरी शेजारी असणाऱ्याच्या हातात ते कंट्रोल करणं शक्य होतं. पण घरच्या गाडीवर कौस्तुभवर खूपच जबाबदारी. सतत त्याला उजवा हात हॅन्डब्रेकवर. त्यात रात्री १०.३०, ११.०० वाजता समोरच्या गाडय़ांचे दिवे-हेड लाइटस्च्या प्रकाशाने मी गोंधळून जायची आणि घरच्या गुरूचा ओरडा खायची.
परत परीक्षेचा दिवस आला. फळड ला जाताना आता तर चक्क हेडमास्तरांनी (बाबांनीच) विचारलं मॅडम कोणती गाडी देऊ? कोणती नेताय? व्ॉगन आर की सॅन्ट्रो? आता मात्र पूर्ण विश्वासाने सांगितलं कोणतीही चालेल आणि सॅन्ट्रो घेतली. पहिलाच नं. माझा. या वेळेला गाडीने गुडगर्लसारखं सगळं ऐकलं व छान वळणं, बोगदा, गीअर सर्व टप्पे सफाईदारपणे पार करत झाली परीक्षा. आणि मग काय ढं२२ी.ि माझा आनंद गगनात मावेनासा झाला. दुसऱ्याच दिवशी गुरुपौर्णिमा होती. इतकी वर्षे विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा स्वीकारणारी मी आज शिष्य होते. आज मी माझ्या गुरूंना शुभेच्छा दिल्या, तो आनंद, ते समाधान वेगळंच होतं.
एकदा पास झाल्यावर मात्र गाडी चालवण्याचा योग काही फारसा आला नाही. पण मॉर्निग वॉकला सकाळी घरातून बाहेर पडल्यावर आपल्या गाडीला- व्ॉगन आरला गोंजारून हात फिरवून मी तिला मनातल्या मनात माझी इच्छा बोलत असे. मग माझ्या मनात पुन्हा विचार येई की मी खरंच परीक्षार्थी की विद्यार्थी? आता मला पर्समध्ये नुसतं शोभेसाठी ड्रायव्हिंग लायसन्स ठेवायचीसुद्धा हिंमत करावी लागते.
बघू या कधी योग येतो ते!
– मीना श्रीराम वैद्य,पुणे.

ड्रायिव्हग शिकणं हा एक भन्नाट अनुभव असतो. तुमचा ड्रायिव्हग शिकण्याचा अनुभव कसा होता, शिकल्यानंतर तुम्ही लाँग ड्राइव्हला कुठे गेलात, थोडक्यात तुमची ‘कार’कीर्द कशी घडली, याची माहिती तुम्ही ‘लोकसत्ता’कडे शेअर करायची. मेल करा. ls.driveit @gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2015 4:09 am

Web Title: car experience
Next Stories
1 मारुती सुझुकीची वॅगन
2 बोल्ड नव्हे स्मूथ.. टाटा बोल्ट
3 कलाcar : नॅनो कारशी नाते
Just Now!
X