रस्त्यावर लांबून एखादी गाडी येताना दिसली की, ते कोणत्या कंपनीचं कोणतं मॉडेल आहे, हे ओळखण्याची चढाओढ कारवेडय़ांमध्ये असते. मात्र सध्या रस्त्यावरील अनेक गाडय़ा एकमेकींसारख्या दिसतात. त्यामुळे अगदी हाडाच्या कारवेडय़ांनाही काही काळ गोंधळायला होतं. अशाच काही चारचाकी ‘सीता और गीता’बद्दल..

शेव्हरोले बीट आणि मारुती रिट्झ
या दोन्ही गाडय़ांचा आकार साधारणपणे सारखाच आहे. त्यामुळे बघणाऱ्याला या दोन्ही गाडय़ा लांबून ओळखता येत नाहीत. अत्यंत आकर्षक बांधणी, बॉनेटला दिलेला बेडकासारखा किंवा एखाद्या किडय़ासारखा आकार, हेड लाइट्सची रचना या सर्वच बाबतीत या दोन्ही गाडय़ा एकमेकींसारख्याच दिसतात, पण परफॉरमन्सचा विचार करायला गेलं, तर दोन्ही गाडय़ांमध्ये थोडासा फरक आहे. सर्वात मोठा आणि मुख्य फरक म्हणजे मारुती सुझुकी रिट्झचं इंजिन शेव्हरोले बीटपेक्षा जास्त शक्तिशाली आहे. रिट्झला १.३ लिटर डिझेल इंजिन आहे, तर शेव्हरोले बीटला १ लिटर डिझेल इंजिन बसवण्यात आलं आहे. त्यामुळे शेव्हरोले बीट एक लिटर डिझेलमध्ये २२ ते २५ किलोमीटर चालते. त्या तुलनेत रिट्झ १८.५ ते २३ किलोमीटरचं मायलेज देते. हा फरक वगळता दोन्ही गाडय़ांची अंतर्गत रचना, सजावट यांत फार फरक नाही. दोन्ही गाडय़ांमध्ये पॉवर स्टेअरिंग, पॉवर विंडोज, वातानुकूलन यंत्रणा आहे. तसेच दोन्ही गाडय़ांमध्ये लेदर सीट्स नाहीत.

रेनाँ पल्स आणि निसान मायक्रा
रेनाँ आणि निसान या दोन्ही कंपन्यांच्या भारतातील गाडय़ा या चेन्नईजवळील मॅन्युफॅक्चरिंग प्लाण्टमध्ये एकाच फ्लोअरवर बनवल्या जात होत्या. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांच्या अनेक गाडय़ांचा तोंडवळा एकमेकींशी खूपच जुळतो. एकाच शाखेच्या दोन घराण्यांमधील लोकांचा तोंडवळा जुळावा एवढा तो जुळतो! या दोन्ही कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत आपल्या हॅचबॅक गाडय़ा उतरवत दिमाखात एण्ट्री घेतली. मात्र या दोन्ही गाडय़ांना फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. या दोन्ही गाडय़ा म्हणजे रेनाँ पल्स आणि निसान मायक्रा! या दोन्ही गाडय़ांची बांधणी हुबेहूब एकमेकींसारखीच आहे. मोजमापाच्या भाषेत सांगायचं तर, रेनाँ पल्सची लांबी निसान मायक्रापेक्षा फक्त २० मिमीने कमी आहे. दोन्ही गाडय़ांची रुंदी सारखीच असून उंचीत फक्त पाच मिमीचा फरक आहे. कंपनीचा लोगो काढून टाकल्यास या दोन्ही गाडय़ांमध्ये काहीच फरक दिसत नाही. पण या दोन्ही गाडय़ा बाजारपेठेवर मात्र प्रभाव पाडू शकल्या नाहीत.

रेनाँ डस्टर आणि निसान टेरेनो
फ्रेंच कंपनी रेनाँला भारतीय बाजारपेठेत स्थिरावण्यासाठी खरीखुरी मदत करणारी गाडी म्हणजे रेनाँ डस्टर! या गाडीने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली. सध्या ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये टोयोटा इनोव्हा आणि फोर्ड इकोस्पोर्ट या गाडय़ांखालोखाल डस्टरला मागणी आहे. आकर्षक लूकच्या जोरावर या गाडीने अनेक कंपन्यांचे मार्केट खाल्ले. या गाडीची यशोगाथा बघून निसाननेही असंच डिझाइन असलेली टेरेनो ही गाडी बाजारात उतरवली. निसानच्या या गाडीलाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. टेरेनो बाजारात उतरवताना निसानने या गाडीला डस्टरपेक्षा थोडासा रफ लूक देण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो काही प्रमाणात यशस्वीही झाला आहे. डस्टरच्या तुलनेत टेरेनोची लांबी १६ मिमीने जास्त असली, तरी डस्टर टेरेनोपेक्षा २४ मिमीने उंच आहे, पण टेरेनो थोडीशी बसकी असल्यामुळे या गाडीला अधिकच डॅशिंग लूक मिळाला आहे. हा एवढा छोटासा फरक सोडला, तर गाडीच्या इतर बांधणीत आणि अंतरंगात अक्षरश: काहीच फरक नाही. दोन्ही गाडय़ांचा मायलेज, इंजिनची शक्ती या दोन्ही गोष्टी सारख्या आहेत. फक्त दोन्ही गाडय़ांच्या किमतीत तब्बल पाऊण लाखाचा फरक आहे. रेनाँची डस्टर ही निसान टेरेनोपेक्षा पाऊण लाखाने स्वस्त आहे.

स्कोडा फॅबिया आणि मारुती स्विफ्ट
मूळ झेक रिपब्लिक म्हणजे पूर्वीच्या झेकोस्लोव्हाकिया या देशातील स्कोडा ही कंपनी सध्या फोक्सवॅगन या जर्मन ऑटोमोबाइल कंपनीच्या आधिपत्याखाली आहे. या कंपनीने भारतातील हॅचबॅक गाडय़ांची बाजारपेठ काबीज करण्यासाठी आपली फॅबिया ही गाडी बाजारात आणली. या गाडीचा लूक मारुती सुझुकीच्या स्विफ्ट या नव्या गाडीशी मिळताजुळता असल्याने या दोन्ही गाडय़ांमध्ये स्पर्धा होणे स्वाभाविक होते. या गाडय़ांची मोजमापे बघितली असता स्विफ्ट ही गाडी काहीशी मोठी आहे, असं म्हणावं लागेल, पण दोन्ही गाडय़ा बऱ्याचशा एकमेकींसारख्याच दिसतात. विशेषत: दोन्ही गाडय़ांचा मागचा भाग हा एकाच साच्यातून काढल्यासारखा वाटतो, पण स्कोडासारख्या कंपनीच्या या गाडीचे इंजिन मात्र स्विफ्टपेक्षा फार शक्तिशाली नव्हते. तसेच मायलेजच्या बाबतीतही मारुती स्विफ्ट या गाडीपेक्षा वरचढ आहे; पण या दोन गाडय़ांच्या सारख्याच लूकमुळे स्कोडा फॅबियाला चांगलाच फायदा झाला. या गाडय़ांच्या अंतर्गत रचनेच्या बाबतीत स्कोडाने स्विफ्टवर बाजी मारली, हेदेखील तेवढंच खरं!

मारुती सुझुकी स्विफ्ट आणि स्विफ्ट डिझायर
एखादी गाडी हॅचबॅक प्रकारात ग्राहकांच्या पसंतीला उतरली की, त्याच गाडीचा आकार वाढवून ती तशीच्या तशी सेडान प्रकारात आणण्याची क्लृप्ती मारुतीने वापरली आणि स्विफ्ट या आपल्या गाडीचा आकार वाढवून स्विफ्ट डिझायर ही सेडान गाडी बाजारात आणली. या दोन्ही गाडय़ांमध्ये हॅचबॅक आणि सेडान यांच्याशिवाय तांत्रिकदृष्टय़ा काहीच फरक नाही.

टाटा इंडिका आणि टाटा इंडिगो
टाटा मोटर्सच्या गाडय़ांबाबत ऑटोमोबाइल क्षेत्रात एक मजेशीर गोष्ट बोलली जाते. या कंपनीच्या गाडय़ांच्या बॉनेटजवळचा आकार सारखाच असतो. जी काही करामत होते ती गाडीच्या मागच्या भागात! यातील मजेचा भाग बाजूला सोडला तर टाटा कंपनीच्या सर्वात गाजलेल्या इंडिका आणि इंडिगो या गाडय़ांबाबत ही गोष्ट पक्की लागू होते. टाटा इंडिका ही हॅचबॅक गाडी भारतातील ग्राहकांच्या चांगलीच पसंतीला उतरली. तर हीच गाडी मागच्या बाजूने थोडीशी खेचून तयार केलेल्या इंडिगोनेही चांगला जम बसवला. या दोन्ही गाडय़ांच्या इंजिनापासून ते अंतर्गत सजावटीपर्यंत सर्व काही सारखंच आहे. फक्त इंडिगोची बूट स्पेस इंडिकापेक्षा जास्त आहे एवढाच फरक!

या भिन्न कंपन्यांच्या गाडय़ांबरोबरच एकाच कंपनीच्या दोन वेगवेगळ्या प्रकारांतील गाडय़ाही एकमेकींसारख्याच दिसण्याची अनेक उदाहरणे आहेत.