बीजिंगमध्ये यंदाच्या वर्षी सुरवातीलाच प्रदूषणामुळे काळे धुके पडले व तेथे अनेक लोक आजारी पडले. आता आपण जरी मुंबईचे शांघाय वगैरे करायचे स्वप्न पाहत असलो तरी बीजिंगच्या महापौरांनी मात्र या शहराचा विस्तार आता थांबवण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. वाहने ही प्रदूषणात मोठी भर घालत असल्याने तिथे आता पेट्रोल, डिझेलच्या वाहनांपेक्षा विजेवरील वाहनांना महत्त्व दिले जाईल असे जाहीर करण्यात आले. आपल्याकडे मात्र विजेवरील वाहनांना तेवढे महत्त्व नाही. काही काळ बॅटरीवरच्या दुचाकी आल्या व नंतर पुन्हा गायब झाल्या, त्यांना फारशा सवलती नसल्याने आता उद्योजक त्यापासून दुरावले आहेत. जीनिव्हा येथे झालेल्या मोटार मेळ्यात विजेवरील मोटारींची उपस्थिती मर्यादित होती. विजेवरील गाडय़ांना फारशी मागणी नाही ही वस्तुस्थिती यावेळी मान्य करण्यात आली. ला फेरारी व व्हेनेरो या सुपरकार गटातील मोटारी मात्र डौलात सादर झाल्या.
ऐंशीव्या जीनिव्हा मोटार मेळ्यात विजेवरील गाडय़ांचे एकही नवीन मॉडेल सादर करण्यात आले नाही. तिथे उपस्थित असलेल्या कार कंपन्यांच्या धुरीणांनीही विजेवरील मोटारींबाबत काहीच वक्तव्य केले नाही. विजेवर चालणाऱ्या मोटारींवरचा विश्वास २०१०च्या पॅरिस मोटार मेळ्यानंतर कमी होत गेला. तोपर्यंत तो शिखरावर होता. क्लेमेंट डय़ुपाँट,
बीआयपीई विश्लेषक
फ्रान्सची कार उत्पादक कंपनी रेनॉ विजेवरील मोटारींच्या बाजारपेठेत आघाडीवर असून त्यांनी आताच्या मेळ्यात विजेवरील मोटारींचे बुकिंग खुले केले आहे. २०२० पर्यंत मोटारींच्या विक्रीत विजेवरील मोटारींचा दहा टक्के वाटा अपेक्षित आहे. फ्रान्सची पीएसए कंपनीही विजेवरील मोटारींच्या उत्पादन क्षेत्रात उतरली आहे. जपानच्या निस्सानने लीफ गाडीचे नवे मॉडेल सादर केले आहे.
विजेवरील मोटारींच्या बाबतीत तीन समस्या आहेत एक म्हणजे त्यांच्या किंमती, दुसरे त्यांचे मायलेज (कापत असलेले अंतर) व तिसरी म्हणजे पायाभूत सुविधा. फ्रान्सची पीएसए कंपनी आमच्याकडून विजेवरच्या मोटारी घेत होती पण गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांनी आवक थांबवली कारण त्यांना अगोदरच्याच मोटारी विकता आल्या नाहीत.
जपानच्या मित्सुबिशी कंपनीचे अध्यक्ष ओसामू मासुको
 निस्सान कंपनीने युरोपात विजेवर चालणाऱ्या ९ हजार लीफ गाडय़ा विकण्याचे उद्दिष्ट ठेवले पण ते पूर्ण झाले नाही. त्यामुळे त्यांनी जीनिव्हातील मेळ्यात कमी किंमतीत नवीन मॉडेल सादर केले आहे.
 शेव्हर्ले कंपनीने व्होल्ट इलेक्ट्रीक कार आधीच सादर केली आहे, आता ते स्पार्क ही छोटी गाडी सादर करीत आहेत.
 सध्याचा जमाना हा संमिश्र मोटारींचा आहे त्यात इंधन व वीज अशा दोन्ही सुविधा असतात. पर्यावरणस्नेही, कमी इंधन लागणाऱ्या , हरित तंत्रज्ञानाचा वापर असलेल्या गाडय़ा या मेळ्यात सादर करण्यात आल्या
 संमिश्र मोटारीत जपानच्या टोयोटाने वीज व गॅसोलिन असे दोन्ही पर्याय असलेली मोटार सादर केली.
 पीएसए कंपनीने हायब्रिड एअर टेक्नॉलाजीचा वापर केला असून त्यात पेट्रोल व संप्रेषित हवा यांचा वापर केलेला आहे.