मी तशी मध्यमवर्गीय, वनविभागात नोकरी करणारी, आयुष्यात कधी कार घेईन असे वाटलेही नव्हते. अनेकजण हौस-मौज म्हणून गाडी घेतात. मात्र, माझी कथा वेगळी आहे. माझा मुलगा दृष्टिहीन आहे. जरासा स्थूलही आहे. लहान असताना काही वाटायचे नाही. मात्र, जसजसे त्याचे वय वाढू लागले तसतशा अनंत अडचणी समोर येऊ लागल्या. दृष्टिहीन असल्याने त्याला शाळेत नेणे-आणणे, गायनाच्या क्लासला घेऊन जाणे, पोहण्यासाठी घेऊन जाणे वगैरे कामे दुचाकीवरून करताना माझी दमछाक व्हायची. त्याला गाडीवर मागे बसवून सगळीकडे घेऊन जाणे तारेवरची कसरत होऊ लागली. त्यात मला स्पाँडेलायटिसचा त्रास व्हायला लागला. मात्र, पुत्रप्रेमापुढे सर्व विसरायचे. मात्र, दुखणे वाढल्यानंतर वयाच्या ४५व्या वर्षी मी कार घेण्याचा निर्णय घेतला. पदरचे पैसे खर्च करून ह्य़ुंदाई आय१० ही कार घेतली. कार चालवायला जमेल का, असा प्रश्न पडायचा. मात्र, मुलासाठी सर्व करायचे या जिद्दीने मी कार चालवायला शिकण्याचा निर्धार केला. नागपुरातल्या रस्त्यांवर कार चालवण्याचे प्रशिक्षण घेणे सुरुवातीला खूप भीतीदायक वाटायचे. मात्र, सरावानंतर शिकलेच गाडी. मुलाला बाजूला बसवून त्याला वेगवेगळ्या ठिकाणी सोडणे-आणणे ही कामे मी लिलया पार पाडू लागले. जगात काय चालू आहे, हे कळत असलेला परंतु ते पाहू शकत नसलेल्या माझ्या मुलाला निदान मी आरामदायी प्रवासाचे सुख देऊ शकले याचे समाधाना वाटले. कार चालवणे हे प्रतिष्ठेचे किंवा छंदाचे लक्षण आहे हे मानणारा मोठा वर्ग समाजात आहे. मात्र माझ्यासाठी हे काम मुलाला समाधान मिळवून देण्यापुरता मयादित राहिलेले आहे.
जयश्री राजेंद्र चिमूरकर, नागपूर

बाइक ब्रदर्स
आम्ही, म्हणजे मी आणि श्रीपाद, दोघेही जन्मतच बाइक ब्रदर्स आहोत. बाइक कशी चालवायची, तिच्यातील तांत्रिक बाबी काय, कोणती बाइक किती सीसीची इत्यादीचे आम्हाला कोणीही प्रशिक्षण दिले नाही. तरीही आम्ही सातवीत असतानाच बाइक चालवायला शिकलो, तिच्यातील सर्व खाचाखोचा आम्हाला नकळत्या वयातच कळायला लागल्या. माझा मोठा भाऊ श्रीपाद आता बंगलोरमध्ये राहतो. त्याच्याकडे केटीएम डय़ूक बाइक आहे आणि त्यांचा बाइक रायडर्सचा क्लब आहे बंगलोरमध्ये. कर्नाटकातील सर्व प्रमुख स्थळे त्याने बाइकवरच पालथी घातली आहेत. त्याने अगदी अलीकडेच गोकर्ण ते तटवर्ती कर्नाटक असा ११०० किमीचा प्रवास बाइकवरच केला. अर्थात त्यात त्याला त्यांच्या क्लबच्या मित्रांची साथ लाभली. त्याने आयबीडब्ल्यू, वायआरसी बायकर्स आदी बाइक रॅलींमध्ये भागही घेतला आहे. मीही माझ्या मोठय़ा भावाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो. माझ्याकडे यामाहा आर१५ ही बाइक असून आम्हीही मित्र परिवार बाइकवरून छोटय़ा-मोठय़ा ट्रिप काढत असतो. विशेषत पावसाळ्यात तर आम्ही आमच्या बाइकवर मोठमोठय़ा टूर आयोजित करतो. मात्र, तेही सुरक्षेची सर्व खबरदारी घेऊनच. वाशिमसारख्या ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था असूनही आम्ही या टूर आयोजित करून रोड सेफ्टी अवेअरनेस कार्यक्रम आयोजित करत असतो. आम्ही दोघे भाऊ बाइक ड्राइव्ह करताना सुरक्षेचे सर्व नियम पाळतो. हेल्मेट, ग्लोव्हज आणि रायडिंग जॅकेट सर्व परिधान करून मगच बाइकवरून बाहेर पडतो. त्यामुळेच आमचे आईवडील आम्हाला मोठमोठय़ा टूरवर जाण्यासाठी परवानगी देतात. आमच्या क्षेत्रातील बाइकप्रेमींना प्रोत्साहित करण्यासाठीच हा आमचा पत्रप्रपंच. त्यासाठी आम्हाला मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद..
-वल्लभ अरविंद देशमुख, वाशिम

तुमच्या बाइकविषयीच्या आठवणी आम्हाला कळवायच्या. त्या आम्ही शब्दबद्ध करून ‘ड्राइव्ह इट’ पानावर प्रसिद्ध करू. सोबत तुमचा व बाइकचा फोटो असणे अत्यावश्यक. ‘मी बाइकवेडा’ या सदरासाठी असा उल्लेख जरूर करा. मग, चला उचला लेखणी आणि मारा किक.. आठवणींना..! शब्दमर्यादा : २०० शब्द.
ई-पत्ता : vinay.upasani @expressindia.com