वाहननिर्मिती उद्योगाची एक खासियत आहे. दर दोन-चार महिन्यांनी जगाच्या कुठल्या ना कुठल्या देशात/प्रांतात नवनवीन गाडय़ांचे प्रदर्शन या उद्योगाकडून मांडले जात असते. तर यंदाच्या वर्षांची सुरुवात डेट्रॉइट मोटार शोने झाली. जग व्यापून टाकणाऱ्या जगड्व्याळ मोटार कंपन्यांचे (पक्षी: फोर्ड, जनरल मोटर्स, क्रायस्लर इ. इ.) माहेरघर म्हणून डेट्रॉइटची ओळख आहे. म्हणूनच या शहरापासूनच यंदाच्या वर्षांच्या ऑटो शोजचा नारळ फुटला. मात्र, आज आठ महिन्यांनी जी डेट्रॉइट शहराची अवस्था आहे तीच वाहननिर्मिती उद्योगाची आहे. म्हणजे डेट्रॉइटला गेल्याच महिन्यात दिवाळखोर घोषित करण्यात आले आणि आज जगभरातील वाहननिर्मिती उद्योग आíथक मंदीच्या गत्रेत गटांगळ्या खाताना दिसतो आहे. युरोपातील अनेक देशांमध्ये आलेली मंदीची लाट आणि पूर्वेकडील देशांमध्ये घटलेली मागणी यामुळे वाहननिर्मिती उद्योगाला घरघर लागलेली आहे. ही घरघर काही केल्या कमी होण्याची चिन्हे नाहीत. तरीही आज ना उद्या चांगले दिवस येतीलच या आशेवर आतापर्यंत तीन ऑटो शोज आयोजित करण्यात आले. त्यातील दोन अमेरिकेत (न्यूयॉर्क आणि शिकागो) तर एक जीनिव्हात आयोजित करण्यात आला, तर आगामी तीन महिन्यांत जर्मनी (फ्रँकफर्ट), जपान (टोकियो) आणि अमेरिका (लॉस एंजेलिस) या ठिकाणी तीन ऑटो शोज आयोजित करण्यात आले आहेत.
ऑटो शोजचे आíथक गणित
नवनवीन गाडय़ांची निर्मिती ही अखंड प्रक्रिया आहे. एकाच गाडीचे व्हेरिएंट्स ही त्यातली उपप्रक्रिया. या सर्व प्रक्रियेला खप/खरेदी/विक्री यांचे इंधन मिळावे यासाठी एकाच छताखाली अनेकानेक गाडय़ांचे प्रदर्शन मांडले जाते. त्यातून जी विक्री होईल त्याचा फायदा अंतिमत: वाहननिर्मिती उद्योगालाच होत असतो. याच प्रदर्शनांमध्ये विविध कंपन्यांत करारमदार होतात. लाखो-कोटींची उलाढाल होते आणि त्यातून उद्योगाला चालना मिळत असते. त्यामुळेच ऑटो शोजचे आयोजन करण्यात येत असते. मालाला उठाव मिळण्यासाठी सर्वानी एकत्रित येऊन ग्राहकांना आकर्षति करण्याचे हे बाजारतंत्र आहे. त्यात वावगे काहीच नाही. या शोजना केवळ चारचाकी गाडय़ाच असतात असे नाही. तर नामवंत दुचाकीनिर्मिती कंपन्याही या शोजमध्ये भाग घेण्यात अग्रणी असतात.
भारतात पुढच्या वर्षी
जी बाब जागतिक स्तरावरची तीच बाब देशांतर्गतही. म्हणजे देशातील वाहननिर्मिती उद्योगही गटांगळ्या खात आहे. महिन्यागणिक नवनवीन गाडय़ा लाँच होताहेत. आता तर सणासुदीचा हंगाम कॅश करण्यासाठी ऑटो कंपन्यांकडून आकर्षक योजनांची ग्राहकांवर बरसातही होत आहे. मात्र, त्याच वेळी रिकॉिलग, उत्पादन जास्त आणि मागणी कमी परिणामी मारुती, मिहद्रा, बजाज, टाटा यांसारख्या कंपन्यांनी काही दिवस उत्पादन बंद ठेवण्याचा घेतलेला निर्णय, विविध पातळ्यांवर असलेला सरकारी धोरणलकवा या सर्व दुष्टचक्रात देशांतर्गत वाहननिर्मिती उद्योग अडकला आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर पुढील वर्षी दिल्लीत ऑटो एक्स्पो (५ ते ९ फेब्रुवारी, २०१४) आयोजित केला जात आहे. दिल्लीतील प्रगती मदानावर दर वर्षी होणारा ऑटो एक्स्पो खरे तर वाहननिर्मिती उद्योगासाठी प्राणवायू असतो. गेल्या २८ वर्षांपासून हा ऑटो एक्स्पोचा सिलसिला सुरू आहे. मात्र, यंदाचे वर्ष वेगळे ठरणार आहे. कारण वरील सर्व अडचणींचा सामना वाहननिर्मिती उद्योग करत असूनही ऑटो एक्स्पोची तयारी अगदी जोमात सुरू आहे. ४० ऑटोमेकर्स या प्रदर्शनाला उपस्थिती लावणार आहेत. त्यामुळेच यंदा या प्रदर्शनाचे ठिकाण प्रगती मदानावर न ठेवता उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोइडा या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे या प्रदर्शनात अमेरिकेची तिसरी सर्वात मोठी कारकंपनी क्रायस्लर, इसुझु मोटर्स आणि ह्य़ोसंग पहिल्यांदाच सहभागी होणार आहेत. या एक्स्पोला कसा प्रतिसाद मिळतो यावर पुढील वर्षी वाहननिर्मिती क्षेत्राचे भविष्य अवलंबून असेल.
नवनिर्माण
भारतीय बाजारपेठेचा आकार लक्षात घेऊन प्रथमच भारतात येत असलेल्या क्रायस्लरने दिल्लीच्या ऑटो एक्स्पोमध्ये जीप आणि रँगलर यांचे लाँचिंग करण्याचा निर्धार केला आहे, तर एसयूव्हीच्या निर्मितीत तज्ज्ञ असलेली चिनी कंपनी ग्रेट वॉल मोटर्स हॅवेल एच५ या एसयूव्हीचे लाँचिंग करण्यासाठी दिल्ली ऑटो एक्स्पोचा मुहूर्त निवडला आहे. जपानी कंपनी इसुझू मोटर्सही नवीन काही तरी घेऊन येणार आहे, तर कालपरवाच ‘मुँहदिखाई’ झालेली निस्सानची डॅटसन याच प्रदर्शनात रीतसर लाँच होणार आहे. तर सुपरबाइक्सच्या निर्मितीत अग्रेसर असलेली ह्य़ोसंगही दक्षिण कोरियाई कंपनीही नवीन मॉडेल याच प्रदर्शनात लाँच करणार आहे.
एसयूव्हींची चलती
सध्याचा मार्केट ट्रेण्ड पाहता एसयूव्ही, कॉम्पॅक्ट एसयूव्ही गाडय़ांना जास्त मागणी आहे. यंदाच्या वर्षांत त्यांचाच खप अधिक प्रमाणात झाल्याचे बाजारपंडितांचे निरीक्षण आहे. त्यामुळे दिल्लीच्या ऑटो एक्स्पोमध्ये एसयूव्हींचेच जास्त प्रमाणात लाँचिंग होताना दिसेल, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. मात्र, एसयूव्हींची चलती असली तरी एन्ट्री लेव्हल कार्स, हॅचबॅक्स आणि सेडान्सनाही तेवढीच मागणी असल्याने एक्स्पोमध्ये त्यांचीही चलती असेल, असा होरा विश्लेषक नोंदवतात. आशियातल्या या सर्वात मोठय़ा समजल्या जाणाऱ्या ऑटो एक्स्पोला किमान १५ लाख कारप्रेमी भेट देतील अशी आयोजकांना आशा आहे. त्यामुळेच सध्या जरी वाहननिर्मिती उद्योग कठीण अवस्थेतून जात असला तरी ‘हेही दिवस जातील’ या आशेवर हा उद्योग भविष्यावर आशा ठेवून आहे..!

कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी जगण्याची उमेद काही कोणी सोडत नाही. ‘हेही दिवस जातील,’ असे म्हणत विविध संकटांनी ग्रासलेला, रोजच्या विवंचनांनी त्रस्त झालेला सामान्य माणूस आपले जीवनगाणे गातच असतो. जी बाब सामान्यांची तीच बाब उद्योगांची. उद्योगजगतावरही सध्या तीच वेळ आली आहे. आíथक मंदीच्या सावटाखाली असलेल्या उद्योगांना या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी खरे तर ‘बेल आऊट पॅकेज’ची गरज आहे. मात्र, धोरणलकवा झालेल्या सरकारला त्याचे काहीही सोयरसुतक नाही. वाहननिर्मिती उद्योगाबाबत असे म्हणायला वाव आहे, कारण सलग आठ महिन्यांपासून या उद्योगाचे चाक आíथक मंदीच्या गत्रेत रुतत चालले आहे. तरीही ‘हेही दिवस जातील’ या आशेवर जगत हा उद्योग तेजीचा महामार्ग शोधत आहे..

संसदेत आग्रह :
संसदेच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल पटेल यांनी वाहननिर्मिती क्षेत्राला ‘बेलआऊट’ पॅकेज देण्याचे सूतोवाच केले आहे. या क्षेत्राची परिस्थिती सध्या चिंताजनक असून त्यासाठी ठोस कार्यक्रम हाती घेण्याची गरज असल्याचे पटेल यांनी संसदेत स्पष्ट केले.  आपल्या मंत्रालयाने याविषयी अर्थमंत्रालयाकडे पाठपुरावा केला असला तरी सध्या वित्तीय तुटीच्या वाढीमुळे या क्षेत्राला बेलआऊट पॅकेज देणे कठीण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.