छोटय़ा पडद्यावरील दूर्वा या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेद्वारे पदार्पण करणारी अभिनेत्री ऋता दुरगुले हिला दूर्वा या भूमिकेमुळे खूप लोकप्रियता मिळाली आहे. मास मीडियामधून अॅडव्हर्टायझिंगमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर लगेचच ही मालिका तिला मिळाली.
दूर्वा या मध्यवर्ती भूमिकेसाठी माझी निवड झाल्यानंतर आणि ही भूमिका साकारत असल्यापासून प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. पहिलीच भूमिका साकारत असल्यामुळे त्याचे अप्रूपही वाटते. आता दररोज १२-१३ तास आमच्या मालिकेतील प्रमुख कलावंतांची टीम चित्रीकरणात व्यस्त असते. खूप शिकायला मिळते आहे. अभिनयाच्या आवडीबरोबरच मला कॉलेजमध्ये असल्यापासूनच ड्रायव्हिंगची प्रचंड आवड आहे. बाबांकडे एस्टीम गाडी होती तेव्हा त्या गाडीवरच ड्रायव्हिंग शिकून घेतले. दूर्वा ही भूमिका स्वीकारल्यापासून तरी माझ्या पैशाने अद्याप गाडी घेतलेली नाही. परंतु, अलिकडेच बाबांनी लाल रंगाची आय-ट्वेंटी कार घेतली. माझी उंची कमी असल्याने ही कार माझ्यासाठी परफेक्ट आहे असे ड्रायव्हिंग करताना जाणवले. या गाडीचे इंटिरिअरही उत्तम आहे, आरामदायी गाडी आहे. अर्थातच ड्रायव्हिंगचे वेड प्रचंड असल्यामुळे मला नवीन नवीन छोटय़ा-मोठय़ा आकारातील गाडी चालवायला नक्कीच आवडेल. ड्रीम कार म्हणून विचाराल बीएमडब्ल्यू हे एकच उत्तर मी देईन. त्यातही शुभ्रधवल किंवा पूर्ण काळ्या रंगाची बीएमडब्ल्यू मग त्यातले मॉडेल कोणतेही असेल तरी मला घ्यायला आवडेल. दूर्वा या भूमिकेने माझ्या कारकिर्दीची आता कुठे सुरुवात झाली आहे. मालिकेच्या चित्रीकरणात दररोज १३-१४ तास काम असते आणि ही पूर्ण लांबीची मालिकेतील मध्यवर्ती भूमिका आणि तीसुद्धा पदार्पणातच मोठी भूमिका मिळाल्यामुळे सध्या तरी कामाच्या अनेक ऑफर्स येत असल्या तरी मी या मालिकेसाठी पूर्ण वेळ काम करण्यात गुंतले आहे आणि म्हणून मी सध्या तरी अन्य भूमिकांच्या ऑफर्स स्वीकारत नाहीये. परंतु, अभिनयामध्ये फक्त मालिकांपुरतेच मर्यादित न राहता नाटक, सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांतील आव्हानात्मक भूमिका स्वीकारायला मला नक्कीच आवडतील. केव्हा तरी शक्य होईल तेव्हा माझ्या पैशातून बीएमडब्ल्यूची शुभ्रधवल किंवा काळ्या रंगाची गाडी मी नक्की घेईन. शुभ्रधवल किंवा काळा या दोन रंगांमध्येच ‘क्लास’ असतो असे माझे स्पष्ट मत आहे. त्यामुळे गाडी म्हटली की या दोन रंगांच्या व्यतिरिक्त अन्य रंगाची वापरू नये. त्यातूनही शुभ्रधवल बीएमडब्ल्यूची ऐट, शान काही निराळीच असते ना!
शब्दांकन :
सुनील नांदगावकर