मोटारीचा रंग हा आकर्षणाचा विषय आहे. मोटार घेताना रंग कोणता याची चर्चा व निरीक्षण करून इतकेच नव्हे तर प्रेमाच्या माणसाला विचारूनही तो निश्चित केला जातो. रंगाला जरासा ओरखडा आला तरी मोटारमालकाचा जीव वरखाली होतो. रंगाचे हे माहात्म्य मोटारीला केवळ बाह्य़ांगाच्या आकर्षणासाठी नव्हे तर तिच्या पत्र्याच्या संरक्षणासाठीही उपयुक्त असते. रंगकामामध्ये केली जाणारी प्रक्रिया, त्यासाठी रंगाच्या आतील थराला असलेले महत्त्वही लक्षात घेतले जाते. अनेक काळ रंग टिकला जातो, असाच हा रंग निवडावा हे मात्र नक्की. गाडीचा रंग हा म्हणूनच गाडी घेतानाच नक्की करायला हवा. त्यासाठी तुम्ही राहता त्या ठिकाणी असलेल्या वातावरणाचाही विचार काही लोक आवर्जून करतात. त्यानुसार फिक्कट रंग की गडद रंग मोटारीला असावा तेही ठरवितात. काही असले तरी रंगाला असलेले आकर्षक महत्त्व मोटारीला उठावदारपणा आणते. मोटारीच्या बाह्य़ांगाला कलात्मकतेने बनविले जाते, आरेखित केले जाते. त्यामुळे त्या मोटारीचा पाहताक्षणी येणारा ‘फिल’ पाहून रंग त्या रूपाला साजेल असा हवा. मोटारी उत्पादक कंपन्याही त्याचा विचार करून त्या त्या मॉडेलला रंगसंगती ठरवीत असतात.
कमनीयता लाभलेल्या रूपातील मोटारीला काळाकभिन्न रंग नको, त्यापेक्षा तो लाल, निळा, क्रीम अशा रंगछटांमध्ये हवा, असे वाटणे साहजिकच आहे. हे जे दिसणे असते तेच महत्त्वाचे, मोटारीच्या त्या रूपाला निरखून पाहताना तुम्हाला जे वाटते, जो फिल येतो त्यावर त्या मोटारीला सुमो पहिलवानाचे रूप आहे, असे वाटावे किंवा कमनीय देह लाभलेल्या सुंदरीप्रमाणे वाटावे किंवा तिचे समोरून दिसणारे रूप पाहून ती मॅच्युअर व्यक्तिमत्त्वाची वाटावी किंवा गतिमान वेगाने जाणाऱ्या एखाद्या प्राणी वा पक्ष्याप्रमाणे तिचे फिलिंग यावे हे जर लक्षात आले तर त्या मोटारीला रंग कोणता साजेल तेही पटकन कळते. थोडक्यात मोटारीबद्दल तुमच्या भावना या आरेखनातून ठरतात, त्याचाच रंग हा एक भाग आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये रंगाबाबत खूप काळजी घेतली गेली, त्यामुळेच रंगांच्या अनेक प्रकारच्या छटांचा वापर केला गेला. अन्यथा भारतातील मोटारी एके काळी ठराविक रंगांमधील दिसत होत्या. अर्थात मोटार उत्पादक कंपन्याही हाताच्या बोटावर मोजता येतील, इतक्या असल्याने रंगातील वैविध्यता दिसत नव्हती. आज अनेक मोटार उत्पादक कंपन्यांची भारतीय बाजारपेठेतील उपस्थिती लक्षणीय आहे. त्यामुळेच रंगांबाबत चोखंदळपणाही ग्राहकांना आकर्षित करून घेण्यासाठी दाखविला जात आहे. सरडा जसा रंग बदलू शकतो, तसा गाडीचा रंग सहजपणे बदलता येईल का, यावरही संशोधन सुरू आहे, अर्थात ते किती महाग असेल ते वेगळे. रंगाच्या ऐवजी मोटारीवर रंगीत स्टिकर्स लावण्यात येतात व त्या मूळ रंगाला साजेसे हे स्टिकर्स गाडीची शोभा वाढवितात. चित्रांच्या स्टिकर्सपासून ते रंगाच्या वैविध्यपूर्ण छटा गाडीला बहाल करण्यासाठी या स्टिकर्सचा उपयोग सर्रास केला जातो.
साधा रंग आणि मेटॅलिक रंग या दोन प्रकारातील रंगांमुळे मोटारीला एक वेगळीच रंगत येते. मेटॅलिक रंगामुळे एक प्रकारची चमचम त्या मोटारीच्या रंगामधून मिळू शकते व त्यामुळे रंगाची संगतही अधिक प्रभावशाली वाटते. प्लेन प्रकारातील रंगाला अधिक नवेपणा वा ताजेपणा वाटण्यासाठी सातत्याने देखभाल व पॉलिश करावे लागत असल्याने काहीशी मेहनत घ्यावी लागते. त्या तुलनेत मेटॅलिक रंगाची मोटार काहीशी धूळ असली तरी त्यावर मऊ कापडाच्या तुकडय़ाचा हात फिरविल्यास रंग खुलण्यास पुरेसा होतो. अर्थात पॉलिशमुळे मिळणारी चमकदमक औरच असते व मोटारीच्या सौंदर्याला खुलविणारी असते. याशिवाय टपाला वेगळा रंग, बॉडीला वेगळा रंग असा डय़ुएल टोनचा रंग देण्याचाही कल दिसून येतो. एकंदर हा फिलही वेगळा आहे हे लक्षात येते.
रंग हा मोटारीला देखणेपणा प्राप्त करून देतो. रंगातून मोटारीच्या एका वैशिष्टय़ाला पैलूच दिसून येत असतो. मानसशास्त्रीय दृष्टीने रंगाबाबत प्रत्येक माणसानुसार फरक पडतो व तो गाडी घेतानाही आढळून येतो. आपला रांगडेपणा, मृदूपणा, हळुवारपणा, सौंदर्यासक्ती, शांतपणा, कठोरपणा, शिस्तप्रियता अशा अनेक गुणांमधून घडलेला माणूस मोटार घेताना जो रंग निवडतो, तो आपल्या स्वभावाच्या छटेनुसार व उपयुक्ततेनुसार निवडत असतो. अर्थात हे सारे रंगांचे भावरूप मोटारीच्या देखणेपणाचे व त्या मोटारीच्या देहबोलीचे दर्शन घडवीत असतात. त्या त्या मोटारीच्या मॉडेलनुसार उत्पादक कंपनीकडून रंगसंगती निश्चित करताना प्रचलित आवडीनिवडींचा जसा विचार होतो तसाच त्या मॉडेलची देहबोलीही विचारात घेतली जाते, हे स्पष्ट दिसून येते. रंगावर आलेला ओरखडा पाहूनही अनेकांना वाईट वाटते व ते त्यावर काही उपाय करतात तर काही चक्कदुर्लक्ष करतात, हा जसा मोटारमालकाच्या मनाचा भावुकपणा व व्यवहारी वृत्तीचा भाग असतो, तशीच रंगानुसार त्या त्या रंगाची रंगवृत्ती मोटारीला एक वेगळा लूक देणारी ठरते, हे मात्र नक्की!