गाडी दुरुस्त करून देणारे कळकट गॅरेज पाहण्याची सवय झालेले डोळे, संपूर्ण कार तयार करणाऱ्या कारखान्यातील चकचकीतपणा पाहून दिपतात. पांढऱ्याशुभ्र गणवेशातील कर्मचारी आणि ८० टक्के काम पार पाडणारी यंत्रे पाहिली की आंतरराष्ट्रीय कशाला म्हणतात हे नीटच समजते..
आताशा लहान मुलांच्या सहली जातात त्या थीम पार्क, वॉटर पार्कमध्ये.. पण पंचवीस तीस वर्षांपूर्वी किमान मुंबईतील शाळांमधील सहली निघत त्या नेहरू तारांगण, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान किंवा मग आरेच्या दुग्धालयात.. काचेच्या लहान बाटल्यांमधून दुधाचे पॅकिंग होणाऱ्या कारखान्याचा भलामोठा आकार पाहणे म्हणजे एकदम सॉलिडच वाटायचे.. त्या दुधाच्या काचेच्या बाटल्या इतिहासजमा झाल्या आणि सहलीही.. तर हे सर्व आता एकदम आठवण्याचे कारण म्हणजे होंडाचा कार बनवण्याचा कारखाना.
दुधाच्या कारखान्यात दूध, बाटली आणि बूच या तीन वस्तू एकत्र आणण्याच्या दृष्टीने नियोजन होते. त्याआधी बाटल्या विसळून घेणे, त्या र्निजतुक करणे, दुसरीकडे दूध पाश्चराइज्ड करणे वगरे क्रिया सुरू असत आणि मग दुधात पाचशे मिलिलीटर दूध भरून त्यावर बूच लावून त्या साठवणे.. आता हीच क्रिया होंडाच्या कारखान्यातही सुरू होती. फक्त बाटलीच्या जागी संपूर्ण कारचे उत्पादन करायचे आणि त्यासाठी किमान शंभर भाग एकत्र करायचे तर कारखान्याचा आकार आणि क्षमता गुणिले हजार होणे साहजिकच होते. दिल्ली विमानतळापासून साधारण पन्नास किलोमीटरवर राजस्थानमध्ये, तापुकारा येथील कारखान्याचा आवाका यावरून लक्षात आला असेल. होंडा सिटी, होंडा जॅझ, होंडा अमेझ, होंडा मोबिलिओ अशा गाडय़ांच्या निर्मितीसाठी होंडा कार्सने नोइडामधील कारखान्यानंतर तापुकारा येथे दीड वर्षांपूर्वी हा नवीन कारखाना सुरू केला. दर दोन मिनिटाला एक कार तयार होत असलेल्या या कारखान्यातील ८० टक्के काम यंत्र आणि रोबो करतात.
या कारखान्याचे ढोबळदृष्टय़ा पाच भाग आहेत. एकीकडे इंजिनाचे सुटे भाग तयार केले जातात. दुसऱ्या भागात गाडीच्या सुट्टय़ा पत्र्याच्या भागांची निर्मिती होते. तिसरीकडे सांगाडा आणि इंजिन जोडण्याचे काम होते, चौथ्या ठिकाणी रंग मारला जातो, त्यानंतर गाडीची कुशन, एअरबॅग्ज आणि इतर अ‍ॅक्सेसरीज लावून गाडी पूर्ण होते. आता हा प्रत्येक विभाग काहीशे फूट उंच आणि रुंद आणि खोलही होता. खोल असण्याचे कारण एका कारखान्यातून दुसऱ्या कारखान्यात वस्तू जाण्यासाठी असलेला भूमिगत मार्ग..
इंजिनचे सुटे भाग बनवण्याच्या कारखान्यात नेण्यात आले तेव्हा खरे तर आपल्या गॅरेजसदृश काही तरी नजरेस पडेल, असा अंदाज होता, पण होंडाने तो अंदाज साफ खोटा ठरवला. कळकटपणाचा लवलेशही नसलेल्या त्या चकाचक कारखान्यात होंडाच्या कर्मचाऱ्यांचे पांढरेशुभ्र गणवेश पाहून या सगळ्याला ‘आंतरराष्ट्रीय’ का म्हणतात, हे नीटच समजले. गाडीचा प्राण म्हणजे इंजिन. गाडीवरून कितीही चकाचक दिसत असली तरी तिची क्षमता आणि मायलेज ठरते ते इंजिनमुळे.. त्यामुळेच इंजिनासाठी वापरल्या जाणाऱ्या धातूचे प्रमाणीकरण, दांडय़ाचा आकार यावर बारीक लक्ष ठेवले जाते. अर्थातच रोबोकडून. एखाद्या मिलिमीटरचा फरक असलेला धातूचा दांडाही पटकन बाजूला करून पुन्हा वितळण्यासाठी पाठवला जातो. रोबोच्या दृष्टीतून तावूनसुलाखून निघालेल्या या दांडय़ांना त्यानंतर अक्षरक्ष: भट्टीत पेटवून साचातून विशिष्ट आकार दिला जातो. इंजिनचे असे विविध भाग मग एकत्र करून पुढच्या कारखान्यात पाठवले जातात. अर्थात तेही यांत्रिक पट्टीवरूनच.
दुसऱ्या भागात कारच्या सांगाडय़ाचे सुटे भाग बनत होते. गॅरेजमध्ये काही वेळेला दार काढलेल्या गाडय़ा दिसतात, त्याप्रमाणेच काहीचे दृश्य तिसऱ्या विभागात होते. मात्र सारे चकाचक. इंजिन नीट बसवले आहे का, स्क्रू योग्य जागी लागला आहे ना.. हे पाहत, गरज पडल्यास वेिल्डगने भाग जोडण्यासाठी, सांगाडे घेऊन येणाऱ्या पट्टीशेजारी कर्मचारी तनात होते. हेच कमी-अधिक फरकाने चौथ्या आणि पाचव्या भागात होते. यंत्राच्या पट्टीवरून कारचा एकेक भाग जोडला जात होता. प्रत्येक रोबो आणि कर्मचारी त्यांना नेमून दिलेले काम यंत्रवत सुरू ठेवत होते. या सर्व भागांत माणसांपेक्षाही मदार होती, ती यंत्र व रोबोवर. मात्र हे सर्व इथेच थांबत नाही. गाडी पूर्ण तयार झाली की जो सर्वात महत्त्वाचा भाग असतो, तिथे मात्र माणसाचीच मदत लागते. आणि ते म्हणजे टेस्ट ड्राइव्ह.. प्रत्येक दोन मिनिटाला धावपट्टीवरून खाली उतरणारी नवी कोरी गाडी चालवून पाहिली जाते. इंजिनचा आवाज, वळताना समस्या असे काही झाले नाही तर ठीकच.. पण तसे झाले नाही तर गाडी पुन्हा एकदा कारखान्यात रवाना होते..
या सगळ्यात एक गोष्ट मात्र अगदीच लक्षात राहिली. कारखान्यात अतिशय संरक्षित, स्वच्छ वातावरणात तयार झालेल्या, काही लाख रुपये किमतीच्या या गाडय़ा साठवून ठेवल्या जातात त्या मात्र उन्हात, उघडय़ावर. राजस्थानच्या पिवळ्या वाळुसदृश मातीचे थर आणि तळपता सूर्य यांच्या भट्टीत रचलेल्या त्या गाडय़ा पाहून काही क्षण हृदयात चर्र्र होते. आपल्या घरच्या स्वप्नवत कारची काळजी कशी घेतली जाते ते आठवून.. पण होंडाचे अधिकारी अगदी सहज सांगतात. काहीच होणार नाही त्यांना. बाहेर फिरण्यासाठीच तर निर्मिती झालीय त्यांची. कारखान्यातील चकचकीतपणातून राजस्थानच्या तापलेल्या मातीवर आलेल्या या गाडय़ा पाहिल्या की वस्तूंची नेमकी कुठे आणि किती काळजी घ्यावी यात आपल्या आणि होंडासारख्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या मानकांमध्ये किती फरक आहे, ते वेगळे सांगण्याची गरज पडत नाही.
महाराष्ट्र  क्रमांक १ वर..
देशात दिल्ली, नोएडा, गुडगाव या एनसीआर भागात सर्वच ब्रॅण्डच्या कारची विक्री सर्वाधिक होते. अर्थात हा भाग विविध राज्यांमध्ये विभागला आहे. राज्यानुसार सांगायचे तर महाराष्ट्र कारविक्रीत आघाडीवर आहे. मुंबईसोबतच पुणे, नाशिक, कोल्हापूर या भागातही कारविक्री मोठय़ा प्रमाणात होते. मोबाइलप्रमाणेच सतत नव्याच्या शोधात असलेली बाजारपेठ देशातील सर्व ब्रॅण्डच्या कारची एकूण विक्री गेल्या काही वर्षांत स्थिर आहे. ही बाजारपेठही हळूहळू तरुणांच्या हातात जात आहे. होंडा सिटी ही गाडी विकत घेणाऱ्यांचे सरासरी वय गेल्या पाच वर्षांत ३९ वरून ३४ वर आले आहे. या तरुणांना सतत काही नवीन हवे असते. त्यामुळे कारच्या सोयीसुविधा, आकर्षक लुक यांची मांडणी नवनव्या स्वरूपात द्यावी लागते.
ज्ञानेश्वर सेन,वरिष्ठ उपाध्यक्ष (विक्री आणि विपणन) होंडा कार्स इंडिया
– प्राजक्ता कासले
prajkta.kasale@expressindia.com