हो-नाही करता करता अचानक माझा निर्णय झाला आणि आमची होंडा एव्हिएटर बाइक घरी आली. ती आली तो दिवस होता डिसेंबर, २०१३ मधला. घरातील सर्वाच्या मदतीसाठी धावणारी ही बाइक मला खूप मोठा आधार वाटते. माझ्या वयस्कर आई-वडिलांना तिच्यावर बसवून नेताना मला माझ्या बाइकचा मोठा अभिमान वाटतो. कित्येक वेळेला तर कामाच्या ठिकाणी जाण्यास उशीर होतो आहे असे वाटले तर क्षणाचाही विलंब न करता बाइक बाहेर काढायची आणि ईप्सित स्थळी वेळेत पोहोचायचे हे माझ्या बाइकने मला शिकवले. खरेच कामाच्या नादात घराकडे दुर्लक्ष व्हायचे आणि थकवाही यायचा. पण सुट्टीच्या दिवशी घरची सर्व कामे पूर्ण करायला नेहमीच मला माझ्या बाइकची खूप मदत होते. थँक्स एव्हिएटर.
सचिन मिसाळ,  ठाणे

आणि मी बाइक शिकलो
खरे तर वाऱ्याशी स्पर्धा करण्याचा नाद हा जन्मत:च होता, पण शिक्षणाच्या ओघात त्याचा कधी विसर पडला ते कळलेच नाही, कारण जसे कळायला लागले तसा मी हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी गेलो होतो. नवोदयाचे हॉस्टेल एवढे बंदिस्त होते की, तेथे बाइकच काय, पण साधी सायकल चालवायला परवानगी नव्हती. त्यामुळे बारावीपर्यंत तरी काही मला बाइक चालवायचे जमले नाही. त्यानंतर इंजिनीअिरगला प्रवेश घेतल्यावर उमगले की, आपल्याला तर बाइकही चालवता येत नाही. मग काय घरी भावाची सीबीझेड होतीच. सुट्टय़ांमध्ये घरी गेल्यावर अगोदर बाइक घेऊन टाकी फुल्ल केली व नंतर मित्राला घेऊन सरळ हायवेवर आलो. तोपर्यंत तोच चालवत होता, मग मी हातामध्ये घेतली, पण क्लच सोडण्याचे आणि अ‍ॅक्सिलेटर वाढवण्याचे सूत्र काही जमत नव्हते. शेवटी ते जमवले. बाइक मध्येच बंद पडण्याचे प्रकार तर होतेच सोबतीला, पण आमचा दर दिवसाचा हाच कार्यक्रम असल्यामुळे त्याच्यावरही मात केली आणि मी एकदाचा बाइक चालवायला शिकलो, पण तरीही आत्मविश्वास काही येत नव्हता. मग एकदा एकटय़ानेच बाइक काढली व हायवेवर आलो. त्या वेळेस मनातील सुप्त इच्छा पुन्हा जागृत झाली ‘वाऱ्यावर मात करण्याची’, त्यामुळे बाइक एकदम फूल स्पीडमध्ये घेतली, मग समजले ‘आता आपण बाइक चालवायला शिकलो.’
भारत घोडके, परभणी</strong>

मी.. फुलपाखरू
मला लहानपणापासूनच गाडी चालवण्याचे वेड होते. माझ्या या वेडाला वडिलांनीच दिशा दिली. त्यांनी मला प्रत्येक दुचाकीवर बसवून ती कशी हाताळावी याचे प्रशिक्षण दिले. लग्नानंतर यजमानांनीही माझ्या बाइकवेडाला प्रोत्साहनच दिले. आमच्या सासरच्या गावात महिलांनी बाइक चालवणे म्हणजे जगावेगळेच काम करणे असा समज. मात्र, यजमानांनी माझ्या हौसेखातर गाडी घेऊन दिली. मीही दिमाखात गाडी चालवायचे गावात. स्पिरिट ही आमची पहिली बाइक. पाच वष्रे वापरून झाल्यानंतर आम्ही होंडा अ‍ॅक्टिव्हा घेतली. यजमानांची स्प्लेंडरही मी चालवायचे. बाइक चालवताना मात्र संयम पाळण्याचा नियम मी पाळला. मोकळ्या रस्त्यांवर वेग आणि ट्रॅफिकमध्ये हळू हा नियम काटेकोरपणे पाळते. शिक्षिका असल्याने ही शिस्त मी पाळते. मुलांना गाडीवरून शाळेत सोडणे, बाहेरची कामे तसेच कार्यालयात जाण्यासाठी मी अ‍ॅक्टिव्हा वापरू लागले. सहा महिन्यांपूर्वीच माझा अपघात झाला. गाडीसमोर कुत्र्याचं पिल्लू आल्याने त्याला वाचवण्याच्या नादात मीच गाडीसकट पडले. महिनाभर गाडीला हात लावला नाही. मात्र, नंतर पुन्हा व्यवस्थित चालवायला लागले. एक सुप्त इच्छा होती कधीपासून, बुलेट चालवायची. अलीकडेच ती पूर्ण झाली. माझ्या मित्राने बुलेट घेतल्याचे कळले. सुटीनिमित्ताने माहेरी आले आणि मित्राकडे बुलेट चालवायला देण्याचा हट्ट धरला. त्यानेही आढेवेढे न घेता दिली. मस्त रपेट मारून आले बुलेटवरून. मन प्रसन्न झाले. अशा अनेक गाडय़ांची मी राइड घेतली आहे, स्वच्छंद फुलपाखरासारखी.
– अर्चना संदेश कांबळे, सांगोला, जि. सोलापूर

वर्ल्ड रेकॉर्ड
माझे गाव सांगली जिल्ह्य़ातील शिराळा तालुका म्हणजे डोंगराळ भाग. त्यामुळे या ठिकाणचे रस्ते तसे खडकाळ आणि ओबडधोबड. याच रस्त्यांवर मी बाइक चालवायला शिकलो. लायसन्स मिळण्याइतपत मोठा होताच मला बाबांनी स्प्लेंडर एनएक्सजी ही बाइक गिफ्ट दिली. मग काय माझ्या आनंदाला पारावारच उरला नाही. दर रविवारी मित्रांसोबत बाइक टूर निघायच्या. कधी पन्हाळा, तर कधी बर्कीचा धबधबा, अशी धमाल होती. एमबीएची डिग्री हातात पडल्यानंतर नोकरीची शोधाशोध सुरू झाली. आठवडय़ातून तीन-चार मुलाखतींना जाण्याचा योग हमखास यायचा. एसटी बसने जायचा कंटाळा यायचा. बाइक घेऊन मुलाखतीला जाता आले तर किती मजा येईल, असा विचार मनात डोकवायचा; परंतु  घरच्यांनी त्यास मनाई केली होती, मात्र एकदा घरचे गेले होते गावी. त्याच वेळी नेमका मला पुण्याला मुलाखतीचा कॉल आला. मनाचा हिय्या करून बाइकनेच पुणे गाठायचे ठरवले. एका मित्राला मनवले, मागे बसण्यासाठी. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता मुलाखत होती. आम्ही दोघेही पहाटे अडीच वाजताच निघालो पुण्याच्या दिशेने. सकाळी सात वाजता शिवाजीनगर गाठले. दहा वाजता मुलाखत दिली आणि सायंकाळी पुन्हा गावी परत आलो. दिवसभरात आम्ही ५०० किमीचा प्रवास केला होता. माझ्यासाठी तो वर्ल्ड रेकॉर्डच होता.
-राहुल गायकवाड, शिराळा

तुमच्या बाइकविषयीच्या आठवणी आम्हाला कळवायच्या. त्या आम्ही शब्दबद्ध करून ‘ड्राइव्ह इट’ पानावर प्रसिद्ध करू. सोबत तुमचा व बाइकचा फोटो असणे अत्यावश्यक. ‘मी बाइकवेडा’ या सदरासाठी असा उल्लेख जरूर करा. मग, चला उचला लेखणी आणि मारा किक.. आठवणींना..! शब्दमर्यादा : २०० शब्द. ई-पत्ता
: vinay.upasani @expressindia.com