नांदेड-पुणे प्रवासाचा अनुभव

मला लहानपणापासूनच प्रवासाची आवड होती. माझ्याकडे आधी प्लेजर गाडी होती. ती माझ्यापेक्षा जास्त प्रसिद्ध होती नांदेडात. या गाडीवर मी संपूर्ण नांदेड जिल्ह्य़ात भटकंती केली. त्यानंतर शिक्षणानिमित्त मी लोणावळ्याला आलो. मात्र मला येथे माझ्या बाइकविना अगदीच कंटाळा येऊ लागला. मग मी कॉलेजच बदलून टाकले आणि पुण्यातील कॉलेजात प्रवेश घेतला. आता कॉलेजला जायचे म्हणजे गाडी लागणारच आणि पुण्यासारख्या ठिकाणी दुचाकी गाडी ही हवीच. तसे मी घरच्यांना पटवून दिले आणि भावाची आपाचे आरटीआर १६० ही गाडी घेऊन जाण्याची वडिलांकडे परवानगी मागितली. त्यांनी परवानगी दिली. परंतु अडचणींचा डोंगर काही सरेना. त्या गाडीचे आरसी बुकच भावाने हरवल्याने गाडी रेल्वेने पुण्याला नेणे जमणार नव्हते. त्यामुळे मन खट्टू झाले. परंतु काही दिवसांनी कॉलेजला आठवडाभराची सुटी होती. म्हणून नांदेडला गेलो. जाताना गाडी घेऊनच जायची असा निश्चय केला. मात्र घरच्यांना सांगायची हिंमतच होईना. सुटी संपायला एक दिवस बाकी असताना आईला मी गाडीवर पुण्याला जाणार असल्याचे भीतभीतच सांगितले. माझ्या आईला हसूच फुटले. तिला वाटले मी जोक करतोय. मात्र मी गांभीर्याने सांगितल्यानंतर ती रागावली. खूप समजावल्यानंतर तिने परवानगी दिली, परंतु एका अटीवर, ती म्हणजे दर तासाला फोन करायचा. दुसरा दिवस उजाडला. नांदेड ते पुणे हा तब्बल ४५० किमीचा प्रवास करायचा होता मला. माझ्याही मनात थोडी भीती होती. परंतु मनाचा हिय्या करून निघालो. आयुष्यात प्रथमच एवढा मोठा प्रवास करत होतो. आतापर्यंत मला नांदेड ते लातूर एवढाच (१२० किमी) काय तो मोठा प्रवास माहीत होता. त्यामुळे त्यापुढील रस्ता माहीत असण्याचे काहीच कारण नव्हते. तरीही मी निघालो. मोबाइलवर जीपीएसद्वारे सर्व रस्त्यांची माहिती करून घेतली. नांदेड-गंगाखेड-बीड-पाथर्डी-नगर-पुणे असा प्रवास करायचा ठरवले होते. दर तासाने आईला फोन करत होतो. गंगाखेडला येईपर्यंत अंग दुखायला लागले. उगाच एवढी मोठी रिस्क घेतल्याचे वाटायला लागले. मात्र आता परत माघारी फिरणे नव्हते. बीडला आल्यावर आईने दिलेला जेवणाचा डबा फस्त केला. थोडी विश्रांती घेऊन पुन्हा निघालो. थांबत, विश्रांती घेत तब्बल दहा तासांनंतर मी पुण्यात प्रवेश केला आणि हायसे वाटले. खूप आनंद झाला. या प्रवासाने मला आत्मविश्वास दिला. पुण्यात नंतर मी भरपूर बाइक फिरवली. नंतर तीनदा पुणे-नांदेड-पुणे असा बाइकवरचा प्रवास केला. तसेच पुणे-राहुरी, पुणे-लोणावळा, पुणे-मुंबई असाही प्रवास केला. आता पुन्हा दिवाळीत घरी जायचे आहे.. बाइकवरूनच!
– नीलेश क्षेत्री, नांदेड

यमदूत आरडी!
जॅकी श्रॉफ अभिनीत हीरो चित्रपट पाहिल्यानंतर मला बाइकचे वेड लागले. या चित्रपटात जॅकीदादाने वापरलेल्या यामाहा आरडी३५० या गाडीचा तर मी दिवाना झालो. घेईन तर हीच गाडी हा पणच मी केला आणि तो प्रत्यक्षात आणलाही. मी अजूनही माझी ही आवडती गाडी चालवतो. माझ्या या आरडीवरून मी आतापर्यंत भरपूर प्रवास केला आहे. या बाइकच्या जन्माची कथा मोठी रंजक आहे. ती मला येथे शेअर कराविशी वाटते. यामाहाने १९७२ मध्ये दोन जुळे सिलिंडर व टू स्ट्रोकच्या या गाडीचे उत्पादन केले. जन्मत:च ही बाइक वेगवान होती. त्यामुळे पाचशे-सहाशे सीसीच्या बाइकही तिच्यापुढे फिक्या वाटायच्या. मात्र प्रदूषणासंदर्भातील काटेकोर नियमांमुळे अमेरिकेत तिला बंदी आली. त्यानंतर मग एस्कॉर्ट्स इंडियाने या गाडीच्या मशीनची खरेदी करून १९८४ मध्ये ती भारतीय बाजारपेठेत आणली. राजदूत, जावा, यझदी आणि बुलेटच्या त्या जमान्यात आरडीचे आगमन म्हणजे बाइकवेडय़ांच्या क्षेत्रात तहलका होता. बुलेटचा त्या वेळी दबदबा होता. तिच्या इंजिनाची क्षमता होती १८ बीएचपी. मात्र आरडीच्या इंजिनाची क्षमता तिच्यापेक्षा जास्त म्हणजे ३०.५ बीएचपी होती. त्यामुळे साहजिकच बाइकप्रेमींची पहिली पसंती आरडीलाच मिळायला लागली. तिचा वेग एवढा होता की तिच्यावर नियंत्रण कसे मिळवावे याचा पत्ता नवख्याला लागायचाच नाही. त्यामुळे तिचे अनेकदा अपघातही होऊ लागले आणि आरडीला मग यमदूत आरडी असे म्हटले जाऊ लागले. गाडी दिमाखदार होती. मात्र तिला इंधन खूप लागायचे. त्यामुळे तिचा विक्रीचा आलेख घसरू लागला व १९९१ मध्ये आरडीची विक्री भारतात पूर्णपणे बंद झाली. मात्र अजूनही मी ही गाडी वापरतो, कारण ती माझे पहिले प्रेम आहे. – अविनाश देशमुख, डोंबिवली.