News Flash

मी बाइकवेडा..

इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असतानाच मला बाइकचा नाद लागला. मला होंडाची सीबीआर २५०आर ही बाइक खूप आवडायची; पण खूप महाग असल्याने बाबांनी सपशेल नकार दिला; परंतु

| September 4, 2014 08:05 am

तुमच्या बाइकविषयीच्या आठवणी आम्हाला कळवायच्या. त्या आम्ही शब्दबद्ध करून ‘ड्राइव्ह इट’ पानावर प्रसिद्ध करू. सोबत तुमचा व बाइकचा फोटो असणे अत्यावश्यक. ‘मी बाइकवेडा’ या सदरासाठी असा उल्लेख जरूर करा. मग, चला उचला लेखणी आणि मारा किक.. आठवणींना..!
शब्दमर्यादा : २०० शब्द.
ई-पत्ता : vinay.upasani @expressindia.com


रॉयल रोडकिंग
इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असतानाच मला बाइकचा नाद लागला. मला होंडाची सीबीआर २५०आर ही बाइक खूप आवडायची; पण खूप महाग असल्याने बाबांनी सपशेल नकार दिला; परंतु मला माझे बाइकवेड स्वस्थ बसू देईना. इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण करून नोकरी लागल्यावर पहिल्यांदा बाइकच घ्यायची, हा निश्चय मी केला. यथावकाश शिक्षण पूर्ण होऊन नोकरीला लागलो. बाबांनीही मग आढेवेढे न घेता बाइक घ्यायला परवानगी दिली. माझा जिवलग मित्र भूपिंदरशी गाडी घेण्याविषयी चर्चा केली. त्याने मला बुलेट घेण्याचा सल्ला दिला, मात्र माझ्या डोक्यात सीबीआरनेच घर केले होते. त्यामुळे मी त्याला विरोध केला, मात्र त्याने बुलेटची टेस्ट ड्राइव्ह घे आणि नंतर ठरव, असा सल्ला दिला. अखेरीस हो नाही करता मी त्याचा सल्ला मानला. बुलेटची टेस्ट ड्राइव्ह घेतली आणि तिच्या प्रेमातच पडलो. सीबीआरचे खूळ जाऊन आता बुलेटच घ्यायची, असा निर्धार मी केला. घरच्यांनाही पटवून दिले. थंडरबर्ड ३५० ही बुलेट बुक केली, मात्र तिला सहा महिने वेटिंग होते. सहा महिन्यांनी गाडी घ्यायला गेलो तर शोरूमवाल्यांनी सांगितले की, कंपनीने जुन्या मॉडेलचे उत्पादन बंद केले आहे. परिणामी नवीन मॉडेलसाठी आणखी सहा महिने थांबावे लागेल. माझ्या पायाखालची वाळूच सरकली. अखेरीस वडिलांनी शोरूमवाल्यांना खडसावले. त्यांनी मग नवीन मॉडेलची गाडी आल्यानंतर लगेचच गाडी देण्याची तयारी दर्शवली. अखेरीस नोव्हेंबर २०१२ मध्ये माझा वेटिंग पीरियड संपला. माझी आवडती बुलेट घरी आली. आईने तिला आरती ओवाळली. दृष्टही काढली. मी रुबाबात गाडीवर स्वार झालो आणि आनंदाने चित्कारत चक्कर मारून आलो. त्या दिवशी मला झोपही लागली नाही, एवढा आनंद झाला होता. तो दिवस मी माझ्या बुलेटचा वाढदिवस म्हणून साजरा करतो. माझी बुलेट हर्ली डेव्हिडसनपेक्षा काही कमी नाही. मी व भूपिंदर माझ्या बुलेटवरून लोणावळा, गोवा, कोकण, कोल्हापूर, सोलापूर, तुळजापूर, नाशिक, महाबळेश्वर आदी ठिकाणांवर फिरून आलो आहोत. मी केवळ माझ्या बुलेटवर प्रेमच करतो असे नाही, तर तिची यथायोग्य काळजीही घेतो. त्यामुळेच आजही दोन वर्षांनंतर ती कोरी करकरीत असल्यासारखीच दिसते. – स्वप्निल पाटील, बेलापूर

तरीही मी बाइकवेडा
माझे वडील वामन ऊर्फ काका दाणी हे फलटण तालुक्यातील साखरवाडी येथे सर्कल इनचार्ज होते. त्यांची ‘एरियल’ ही फटफटी होती. फलटणमध्ये तेव्हा फक्त तीन-चारच फटफटय़ा होत्या. त्या काळात ते लिटरमध्ये नव्हे तर ‘गॅलन’मध्ये पेट्रोल भरत असत. त्यांच्या मागे बसून मी १९५५पासून म्हणजेच वयाच्या बाराव्या वर्षांपासून साखरवाडी ते फलटण हा सुमारे २२ किमीचा प्रवास करत असे. मला या प्रवासात निसर्गरम्य वातावरण व एरियलचे फायिरग यांची भुरळ पडत असे. फटफटी शिकायची हे तेव्हापासून माझे स्वप्न होते. एरियल फार जड होती. तिला शॉक अ‍ॅब्सॉर्बर्सआणि साइड स्टँड नव्हते. याच एरियलवरून मी व माझा भाऊ विजय फलटण ते सज्जनगड व परत असा १८० किमीचा प्रवास करून आलो व धक्के खाऊन खाऊन आठ दिवस आजारी पडलो. तरीही हा प्रवास मला आजही आनंद देतो आहे. १४-१५व्या वर्षी मित्राच्या जावा फटफटीवर मी गाडी चालवायला शिकलो. १९६२मध्ये माझ्या वडिलांनी ८००० रुपयांत नवी कोरी बुलेट घेतली. सातारा जिल्ह्य़ात तेव्हा मोजक्याच लोकांकडे बुलेट होत्या. लग्नानंतर पत्नीबरोबर याच बुलेटवर बसून पुणे, महाबळेश्वर, सज्जनगड प्रवासाचा आनंद मी कितीतरी वेळा लुटला. काही कारणाने आमची लाडकी बुलेट आम्हाला विकावी लागली. १९९५साली मी सीडी १०० ही हीरो होंडा घेतली. आजही वयाच्या ७१व्या वर्षी मी ही गाडी वापरत आहे. हीरो होंडा व मी तंदुरुस्त असल्याने माझे बाइकवेड जपले गेले आहे. घर ते शेत व शेत ते घर अशी रोजची बाइक सवारी सुरू आहे.
पुण्यात गेल्यावरही मी मुलाच्या स्प्लेंडर गाडीवर पुण्यात बायकोला घेऊन फिरतो. माझे हे बाइकवेड माझा अभिमान आहे. वय ११ ते ७१ असा माझा आणि फटफटी, मोटारसायकल, मोबाइक ते बाइक असा बाइकच्या नावाचाही प्रवास मी अनुभवला आहे.
– विलास वामन दाणी, फलटण (सातारा)


माझी एम फिफ्टी
६ डिसेंबर १९७४ रोजी मी पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत सहाय्यक ग्रंथपाल म्हणून रुजू झालो. माझे घर वीर सावरकर नगर येथे तर कार्यालय डॉ. होमी भाभा रस्त्यावर. माझ्या घरापासून १४ किलोमीटर अंतरावर. बस सोयीची नसल्याने मी सायकलने जाण्याचे निश्चित केले. कार्यालयाची वेळ होती ९ ते ५.३० असल्याने मला घरातून आठ वाजताच निघावे लागायचे. माझा मार्ग होता घरापासून लक्ष्मीनारायण चौक, सारसबाग, टिळक रस्ता, संभाजी पुलावरून नामदार गोखले रस्त्याने म्हसोबा गेटमाग्रे गणेशिखड रस्ता पुढे विद्यापीठ चौकात डावीकडे डॉ. होमी भाभा रस्त्याने माझे कार्यालय. हळूहळू वेळेचे गणित जमले. त्या वेळी रस्त्यावर आता इतकी वर्दळ नव्हती. कार्यालयात बठे काम नव्हते. सतत फिरावे लागे. सहज म्हणून मी पॅडोमीटर लावून आपली कार्यालयात किती चाल होते याचा अंदाज घेतला तर तो जवळपास आठ ते दहा किलोमीटर इतकी चाल रोज होत होती. सायकल प्रवास २८ किलोमीटर होत होता. आता मला स्वयंचलित वाहन असावे असे वाटू लागले. १९८३-८४च्या सुमारास बजाजने एम फिफ्टी ही गाडी बाजारात आणली. त्याची अगाऊ मागणी नोंद झाली. वाहनासाठी दोन/तीन र्वष प्रतीक्षा करावी लागणार होती. मी अगाऊ नोंदणी केली नव्हती. संचालकांच्या खास हिश्श्यातून गाडी मिळू शकते असे समजले. त्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू झाले. आमचे एक कौटुंबिक स्नेही प्रभाकर गुप्ते यांचा बजाज कुटुंबीयांशी अगदी जवळचा संबंध असल्याचे समजल्याने मी गुप्तेजींना माझी अडचण सांगितली. त्यांनी मला बजाज यांच्या नावे एक विनंती अर्ज देण्यास सांगितले. मी तसा अर्ज करून श्री. गुप्तेजींकडे दिला. त्यांनी तो आपल्या शिफारशीसह बजाज कंपनीत दिला. काही दिवसांनी मला बजाज कंपनीकडून राहुल बजाज यांच्या खास कोटय़ातून आपणास एक बजाज एम फिफ्टी देण्यात आली असल्याचे पत्र आले. ते पत्र आणि सहा हजार ६६५ रुपयांचा धनादेश घेऊन मी वाकडवाडी येथील बजाज शोरूममध्ये गेलो. बाकीची पूर्तता करून वाहन नोंदणी झाल्यावर माझी बजाज एम फिफ्टी – एमजीडी २७० ही गाडी एप्रिल, १९८४ ला रामनवमीच्या मुहूर्तावर घरी आली. आता घरातून साडेआठ वाजता निघालो की नऊपूर्वी मी कार्यालयात पोहोचत होतो. रोज जाणे असल्याने कार्यालयातील एक सहकारी माझ्याबरोबर येत होता. डबल सीटने रोजचा प्रवास बिनतक्रार होत होता. १९८४ ते ३० एप्रिल २००३ या माझ्या निवृत्तीच्या दिवसापर्यंत वीस वर्षांच्या माझ्या प्रवासात माझ्या एम फिफ्टीने कधीच त्रास दिला नाही. निवृत्तीनंतरच्या अकरा वर्षांत मी माझी कामे माझ्या एम फिफ्टीवरूनच करतो. याच गाडीवरून आम्ही पुणे बोरघाट, पेण, पाली गणपती, अलिबाग, मुरुड जंजिरा अशी दोन दिवसांची सहल केली. डबलसीट असूनही वाटेत कोणताही त्रास झाला नाही. गाडी जुनी झाली ती आता बदला असा प्रेमळ सल्ला मिळतो त्यास मी माझे जुन्या गाडीचे अर्थशास्त्र समजावून सांगतो. अखेर जुने ते सोनेच.
– विजय देवधर, पुणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2014 8:05 am

Web Title: i am crazy for bike 11
Next Stories
1 कारनामा
2 जुने, पण पण पारखून घेतल्यावर सोने!
3 मी बाइकवेडा..
Just Now!
X