मी बाइकवेडा..
तुम्ही फक्त एवढंच करा..
तुमच्या बाइकविषयीच्या आठवणी आम्हाला कळवा. त्या आम्ही शब्दबद्ध करून दर गुरुवारी ‘ड्राइव्ह इट’ पानावर प्रसिद्ध करू. सोबत तुमचा व बाइकचा फोटो असणे अत्यावश्यक. ‘मी बाइकवेडा’ या सदरासाठी असा उल्लेख जरूर करा. मग, चला उचला लेखणी आणि मारा किक.. आठवणींना..!
शब्दमर्यादा : २०० शब्द.
ई-पत्ता : vinay.upasani @expressindia.com
लाँग ड्राइव्हचं वेड
माझ्याकडे मार्च, २०१० पासून होंडा युनिकॉर्न आहे. या बाइकवरून मी खूप प्रवास केला आहे. मात्र, लग्न झाल्यानंतर सपत्नीक लाँग ड्राइव्हला जाण्याच्या नादात आम्ही चक्क रत्नागिरीला गेलो, ती आठवण अविस्मरणीय आहे. लग्नानंतरची पहिली दिवाळी होती. आम्हाला रत्नागिरीला जायचे होते. आम्ही दोघांनी ठरवलं की बाइकवरूनच जायचं. मात्र, घरच्यांना सांगायचं नाही हेही ठरवलं. हो-नाही करता १३ ऑक्टोबर २०११ रोजी आम्ही रत्नागिरीला जाण्याचे निश्चित केले. घरी सांगितले की कोकण रेल्वेने चाललोय. पहाटे प्रभादेवीतून निघालो. सकाळी साडेसातपर्यंत वडखळ नाक्याला पोहोचलो. चहा-नाश्ता घेऊन रिफ्रेश झालो. पुढचा पल्ला पोलादपूपर्यंतचा ठरवला. मध्येच घरच्यांचे फोन यायचे. तारांबळ उडायची. मग गाडीला बाजूला आडोशाला घेऊन थांबायचो. उगाच अमूक स्टेशन सोडलं तमूक स्टेशनाजवळ गाडी आली वगैरे सांगून घरच्यांना फसवायचो. मजा वाटायची. सकाळी दहा-साडेदहापर्यंतचा प्रवास चांगला झाला. नंतर मात्र ऑक्टोबर हिटचे परिणाम जाणवू लागले. कडक उन्हामुळे त्रास होऊ लागला. पोलादपूरनंतर कशेडी घाट चढून चिपळूण गाठायला दुपार झाली. तिथे थांबलो थोडावेळ. पुन्हा मग संगमेश्वरचा खडबडीत रस्ता सुरू झाला आणि पाठीची पुरती वाट लागली. कधी एकदा हातखंबा येतंय असे झाले. हातखंबा गाठल्यानंतर मात्र अंगात वारे भरले. सुसाट गाडी नेली रत्नागिरी गाठत सायंकाळी सहा वाजता पोहोचलो. ३७८ किमीचा हा प्रवास १३ तासांत पार केला. घरी गेल्यानंतर बोलणी बसली. मात्र, एक पराक्रम केल्याचे समाधान आम्हा दोघांच्या चेहऱ्यावर होते. घाटात मोबाइलवर शूटिंग केले होतेच. घरच्यांना ते दाखवत व दिवाळीचा फराळ करत आम्ही आमचा प्रवास सुफळ संपूर्ण केला.