तुमच्या बाइकविषयीच्या आठवणी आम्हाला कळवायच्या. त्या आम्ही शब्दबद्ध करून ‘ड्राइव्ह इट’ पानावर प्रसिद्ध करू. सोबत तुमचा व बाइकचा फोटो असणे अत्यावश्यक. ‘मी बाइकवेडा’ या सदरासाठी असा उल्लेख जरूर करा. मग, चला उचला लेखणी आणि मारा किक.. आठवणींना..! शब्दमर्यादा : २०० शब्द. ई-पत्ता : vinay.upasani @expressindia.com
२६ जुलैची ती आठवण
मी पहिली बाइक वयाच्या अठराव्या वर्षी म्हणजेच २००४ साली घेतली. बाइक घेण्याआधी मॉडेल ठरवताना बराच विचार करून अखेरीस त्या वेळी अत्यंत लोकप्रिय ठरलेली बजाज पल्सर ही १५० सीसीची बाइक घेतली.
गाडीची डिलिव्हरी मिळेपर्यंत माझी उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती. बाइक चालवायला मी आधी शिकलो नव्हतो. स्वत:ची नवीन बाइक घेतल्यानंतर एक-दोन दिवसांतच चालवायला शिकलो. मी नव्याकोऱ्या बाइकवर बसून शिकायला धडपडतोय हे पाहून कॉलनीतल्या एका सद्गृहस्थाने आपणहून मला मार्गदर्शन केले. २६ जुलै २००५च्या भयानक दिवशी मी कांदिवली येथून अंधेरीकडे बाइकनेच येत होतो. रस्त्यावर प्रचंड पाणी होते. त्याही परिस्थितीत मी माझी बाइक पुढे रेटत होतो. अनेकांनी बाइक सोडून पायी चालण्याचा सल्ला दिला, मात्र नव्या बाइकवरील प्रेमामुळे मी ती सोडली नाही. त्यामुळे दररोजचा माझा अर्धा तासाचा प्रवास चक्क आठ तासांचा झाला. (नंतर पेपरात वाचले की, लोकांच्या बाइक पाण्याबरोबर कुठच्या कुठे वाहून गेल्या, तेव्हा मी घेतलेला निर्णय योग्यच होता याचे समाधान वाटले.) तीन फूट पाण्यातून मी बाइक चालवली, विशेष म्हणजे बाइकनेही मला साथ दिली. जोगेश्वरीपासून पाणी जास्तच वाढल्याने अखेरीस मी खाली उतरून हाताने गाडी ढकलत रात्री एक वाजता घरी पोहोचलो. गेल्या दहा वर्षांत मी सुमारे ८० हजार किमीपर्यंतचा प्रवास बाइकवरून केला आहे. पुण्याच्या आसपासचे किल्ले, ट्रेकिंग स्पॉट्स व कोकणातील काही ठिकाणे मी पालथी घातली आहेत बाइकवरून. एकदा चिपळूणहून मुंबईला येत असताना किरकोळ अपघात झाला, मात्र त्यात विशेष अशी दुखापत नाही झाली. तेव्हाही मी नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमांवर मलमपट्टी करून तसाच बाइकने घरी आलो. सर्वानी माझ्या धाडसाचे कौतुक केले. बाइक प्रवासात अनुभवता येणारे स्वातंत्र्य काही औरच असते. शिवाय प्रवासखर्चही फारसा येत नाही. कितीही ट्रॅफिक जाम असला तरी बाइक आरामात पुढे रेटता येते. त्यामुळेच वडिलांनी कार घेतल्यानंतरही माझे बाइकवेड जराही कमी झालेले नाही.
– श्रेयस पटवर्धन,  कांदिवली, मुंबई

बुलेट डॉक्टर
बाइक चालवणे हा माझा सर्वात आवडता विरंगुळा. वयाच्या १६व्या वर्षांपासून मी बाइक चालवतो आहे. वडिलांच्या एम८० वरून मी बाइक चालवायला शिकलो. माझ्याकडे आता क्लासिक बुलेट आहे. आतापर्यंत सर्व प्रकारच्या दुचाकी वापरून झाल्या आहेत; पण बुलेट हीच माझी ड्रीम बाइक होती, आहे आणि राहील, कारण बुलेट ही प्रत्येकाचीच पॅशन असते. मी डॉक्टर असूनही मला बुलेट चालवायला आवडते. खरे म्हणजे डॉक्टरकीच्या व्यवसायाला बुलेट तशी शोभत नाही, परंतु आदत से मजबूर हूँ, कितीही प्रयत्न केला तरी मला माझ्या बुलेटचा मोह काही सोडता येत नाही. दवाखान्यात जाण्याच्या आधी मी किमान अर्धा तास तरी माझ्या लाडक्या बुलेटसाठी काढतो. तिची सेवा करतो. तिला खूप जपतो. माझ्याकडे येणाऱ्या पेशंटची जितकी मी काळजी घेतो तितकीच काळजी मी माझ्या बुलेटचीही घेतो. तिचे काही दुखलेखुपले तर लगेचच तज्ज्ञाला दाखवून तिच्यावर उपचार करून घेतो, मात्र सुदैवाने तिला अ‍ॅडमिट करायची वेळ अद्याप आलेली नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मी जेव्हा बुलेटवरून राइड करायला बाहेर पडतो, त्या वेळी बुलेटचे फायरिंग ऐकून लोक माना वळवून मागे पाहतात, तेव्हा मला खूप अभिमान वाटतो. मलाही लोक लाडाने बुलेट डॉक्टर अशी हाक मारतात.
– डॉ. सुहास काडे, मु. पो. वैराग, ता. बार्शी