तुम्ही फक्त एवढंच करायचं..
तुमच्या बाइकविषयीच्या आठवणी आम्हाला कळवायच्या. त्या आम्ही शब्दबद्ध करून दर गुरुवारी ‘ड्राइव्ह इट’ पानावर प्रसिद्ध करू. सोबत तुमचा व बाइकचा फोटो असणे अत्यावश्यक. ‘मी बाइकवेडा’ या सदरासाठी असा उल्लेख जरूर करा. मग, चला उचला लेखणी आणि मारा किक.. आठवणींना..! शब्दमर्यादा : २०० शब्द. ई-पत्ता : vinay.upasani @expressindia.com
थरारक प्रवासाचा अनुभव
मी हार्डकोअर बाइकवेडा आहे. मी चक्क बाइक घेण्याच्या दोन वर्ष आधीच बाइक जॅकेट्स घेतली होती. आज तीन वर्ष झाली मला बाइक घेऊन. मी या तीन वर्षांत ३५ हजार किमीचा प्रवास केला आहे. माझ्या आठवणीतला एक प्रवास मला इथे शेअर करायला आवडेल. मी व माझ्या भावाने एके दिवशी अचानक गणपतीपुळ्याला जाण्याचे ठरवले. सकाळी सांगलीहून बाइकवरून निघालो ते थेट कोल्हापूरलाच जाऊन थांबलो. दिवस थंडीचे होते. मात्र, आम्हाला काही अंदाज आला नव्हता. त्यामुळे आम्ही काहीही तयारी न करताच निघालो होतो. कोल्हापूर सोडल्यानंतर मात्र आम्हाला आमची चूक कळली. रत्नागिरीपर्यंतचा प्रवास थंडीत कुडकुतच केला. कुठेशेकोटी दिसली की थांबायचो, मग पुढे जायचो. असे करत करत आम्ही दुपारी एक वाजता गणपतीपुळ्याला पोहोचलो.
गणपतीचे दर्शन घेऊन बीचवर मौजमजा करून आम्ही चारच्या सुमारास तिथून निघालो. प्रवासात घाट लागणार असल्याने नाणीज येथे मुक्काम करण्याचे आम्ही ठरवले. तिथून सकाळी मार्लेश्वरला जाण्याचे आमचे प्लॅनिंग होते. ११ वाजता मार्लेश्वरला पोहोचलो.
मार्लेश्वराचे दर्शन घेऊन सायंकाळी सहाच्या सुमारास पुन्हा सांगलीला परतलो. घरी न सांगता आणि कोणतेही प्लॅनिंग न करता आम्ही दोन दिवसांत ७०० किमीचा प्रवास बाइकवरून केला. त्यानंतरही आम्ही असेच लांबचे प्रवास अनेकदा केले. पण पहिल्या लाँग ड्राइव्हची मजा खूपच वेगळी होती.
देवेंद्र कोळेकर, सांगली.

बुलेट माझी लाडाची..
माझी ड्रीम बाइक म्हणजे ’बुलेट’ (रॉयल एन्फिल्ड ३५० सी सी). ती खऱ्या अर्थाने ड्रीम बाइक. कारण वयाच्या पन्नाशीपर्यंत मी स्वतची अशी कुठलीही बाइक घेतलेली नाही. तरीदेखील १९७७ पासून मी लुना चालवायला शिकलो. त्यावेळी जावा, राजदूत, आणि बुलेट या तीनच प्रकारच्या बाइक उपलब्ध होत्या.  लुना शिकल्यानंतर जावा व राजदूतही चालवू लागलो. बुलेट महागडी असल्यामुळे रस्त्यावर क्वचितच दिसायची, पण जेव्हा दिसायची तेव्हा डोळ्यांचे पारणे फिटायचे आणि कानांचे पडदे फाटायचे. काय तिचा रुबाब! जंगलात जसा सिंह तशी तिची ऐट! आवाज भारदस्त! तेव्हापासूनच ती मनात भरलेली. पण तिच्यावर बठक मारायला १९८७ सालापर्यंत वाट पहावी लागली. माझा मित्र अमोल पाटील याचे वडील फॉरेस्ट ऑफिसर होते व त्यांच्याकडे दोन बुलेट होत्या. आमची मत्री घट्ट असल्यामुळे मित्राला बुलेट माझ्या हातात देण्यास कधीच संकोच वाटला नाही.
१९८८ मध्ये लग्न झाले. माझे गाव धुळे व माझे सासर धुळ्यापासून ५४ किमी वरील साक्रीचे. घरी मोठय़ा भावाने बजाज एम८० घेतलेली. बायको माहेरी गेलेली, तिला घेण्यासाठी आई-वडिलांचा थोडासा विरोध पत्करून एम८० घेऊन गेलो. परतीच्या प्रवासात पाऊस सुरू झाल्यामुळे थोडा वेळ थांबलो. परत निघाल्यावर एका वळणावर कडुलिबांच्या झाडानजीक निसरडय़ा रस्त्यावरून घसरली मी व पत्नी जवळजवळ २०-२५ फूट फरफटत गेलो. पाठीमागून आलेल्या सरकारी जीपमध्ये आमच्याच भागात राहणाऱ्या माझ्या मित्राचा मोठा भाऊ होता. त्याने मला बघून गाडी थांबवली. एम-८० ची क्लचवायर तुटली होती .सायंकाळ असल्यामुळे अंधार वाढत होता. मित्राच्या भावाने पत्नीला जीपमधून घरापर्यंत पोहोचवले व मी गाडीचे काम करून हळूहळू घरी पोहोचलो. या अपघाताचा मी इतका धसका घेतला की मी आजही पावसात अथवा ओल्या रस्त्यावर हळुवारपणे गाडी चालवतो.
अरुण जाधव, बदलापूर