वाढता वाढत चाललेली महागाई.. घसरता घसरत चाललेला रुपया.. वाढता वाढत चाललेले इंधनाचे दर.. घसरता घसरत चाललेली मागणी.. मारुतीच्या शेपटाप्रमाणे हे सर्व लांबवताही येईल. मात्र, तूर्तास एवढे पुरेसे आहे. कारण वाहननिर्मिती क्षेत्राबाबत एवढेच म्हणणे इष्ट ठरणार आहे.. गेल्या नऊ महिन्यांपासून या उद्योगाला लागलेल्या घरघरीला इंधन दरवाढीच्या निर्णयाची फोडणी बसली आहे. सुखकर्ता.. विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाला अवघा एक आठवडा राहिला असतानाच वाहननिर्मिती उद्योगाला ही विघ्नवार्ता ऐकावी लागली आहे. मात्र, वाईटातूनही चांगलं काही शोधण्याची आपली संस्कृती आहे..
गेल्या वर्षांपासून सुरू असलेला मंदीचा फेरा वाहननिर्मिती उद्योगाला आता पूर्णत: विळखा घालून बसू लागला आहे. कारण वाहनांची विक्री रोडावल्याचे सर्वच निर्मात्यांनी मान्य केल्याचे अलीकडेच झालेल्या एका पाहणीत दिसून आले आहे. उद्योग तगवण्यासाठी अनेकानेक खटपटी सुरूही आहेत. मात्र, भोवतालची परिस्थिती म्हणावी तशी अनुकूल नाहीच. रुपयाच्या घसरणीमुळे वाहननिर्मात्या कंपन्यांना नाइलाजास्तव का होईना, पण किमती वाढवाव्या लागत आहेत. या सर्व प्रकारात बिचारा ग्राहकराजा मात्र चांगलाच भरडला जात आहे. नवीन गाडी घेण्यासाठी खिशाचा सल्ला घ्यावा तर खिसा नको म्हणतो.. मग यातून दुसरा पर्याय खुला होतो तो म्हणजे सेकण्ड हॅण्ड गाडी घेण्याचा.. चक्क याच मार्केटला सध्या चलतीचे दिवस आले आहेत.. होय, यूज्ड कार्स/प्री ओन्ड कार्सची विक्री जोमाने सुरू असल्याचे एका सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. वाईटातून चांगले काही निष्पन्न होते असे म्हणतात ते हेच असावे बहुधा..
जुन्या कार्सचे डीलर्सच ग्राहकांमधील हा बदल मान्य करतात. सरासरी २५ ते ५० हजार किमी चालवलेली किंवा तीन वर्षे वापरलेली मोटार खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे हे डीलर्स मान्य करतात. एखाद्या कंपनीची तीन वर्षांपूर्वीची गाडी आणि अलीकडेच बाजारात आलेली त्याच गाडीची सुधारित आवृत्ती यांत फारसा फरक नसतो. त्यामुळेच ग्राहक नव्या-जुन्या कारच्या तुलनेत जुन्या कारलाच पसंती देतात. जुन्या कारला चांगली मागणी असल्याने त्यांच्या गुणवत्तेत नव्याप्रमाणेच कशी भर पडेल याची काळजी या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी घेतात. शिवाय सर्वच ब्रॅण्डच्या जुन्या गाडय़ा हल्ली बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांनाही विविध पर्याय उपलब्ध असतात. तसेच नव्याच्या तुलनेत गाडीची किंमतही बऱ्यापकी कमी असते. शिवाय गाडीच्या अंतर्गत रचनेत हवे तसे बदलही करून घेता येतात.

इंधन दरवाढीचा सध्या वेग पाहता आणखी काही महिन्यांनी/वर्षांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत तोळामासाचा फरक राहणार आहे. मात्र, सध्या तरी डिझेलच्या किमती पेट्रोलच्या मानाने कमीच आहेत. त्यामुळेच यूज्ड/प्री ओन्ड कार्सच्या मागणीत डिझेल मॉडेल्सना जास्त मागणी आहे. त्यामुळे स्विफ्ट डिझेल, डिझायर डिझेल, टोयोटा इनोव्हा आणि फॉच्र्युनर यांना सर्वाधिक रिसेल व्हॅल्यू आहे. तर शहरी भागांत स्विफ्ट, आय १०, आय २०, फिगो आणि वॅगन आर या हॅचबॅक प्रकारातील गाडय़ांना
सर्वाधिक रिसेल
व्हॅल्यू आहे.