वाढत्या स्पध्रेत टिकून राहायचे असेल तर अधिकाधिक चांगले उत्पादन ग्राहकांसमोर ठेवावे लागते. टाटा मोटर्सनी तेच केले आहे. त्यांच्या नॅनो, झेस्ट आणि स्टॉर्म या तिन्ही सेगमेंटमधील गाडय़ांना त्यांनी आता अधिक आकर्षक केले आहे. शिवाय त्यातील फीचर्सही नव्याने सादर केली आहेत. थोडक्यात या तिन्ही रिफाइन्ड गाडय़ा टाटांनी आणल्या आहेत..

झेस्ट

टाटांच्या झेस्टने लाँचिंगपासूनच कारप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण केली. ही एक अत्यंत उपयुक्त अशी सेडान कार आहे. हिचा मायलेज १६ किमी प्रतिलिटर एवढा असून सस्पेन्शनही खूप चांगले आहे. टचस्क्रीन फीचर्स सर्वोत्तम आहेत. गाडीची वातानुकूलन यंत्रणा एवढी उत्तम आहे की, तुम्हाला आत बसल्यावर एखाद्या पंचतारांकित स्यूटमध्ये बसल्याचाच भास होतो.

झेस्टची दारे रुंद आणि मोठी आहेत. त्यामुळे आपसुकच कारची उंची आणि आतील आसनव्यवस्था प्रशस्त झाली आहे. टाटांच्या इतर अनेक गाडय़ांप्रमाणेच झेस्टचे केबिनही प्रशस्त आहे. कारचा डॅशबोर्ड चित्ताकर्षक आहे. यामध्ये काळा आणि बेइज या रंगांचे मिश्रण वापरण्यात आले आहे. तसेच चंदेरी रंगाची किनारही त्याला देण्यात आली आहे. डॅशबोर्डची रचना युजर फ्रेण्डली असून आत बसणाऱ्याला अगदी सहजगत्या ती हाताळता येऊ शकेल, अशी तिची रचना करण्यात आली आहे. टाटांनी गाडीच्या अंतरंगाबरोबरच बाह्यरूपावरही चांगलेच लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. अंतरंगात अनेक छोटेछोटे बदल केल्याचे आढळून येते.

झेस्टच्या स्टीअिरग व्हीलला तीन स्पोक देण्यात आले आहेत. लहान परंतु आकर्षक असे हे स्टीअिरग हातात पकडून गाडीचे सारथ्य करायला आनंद वाटतो. हॉर्नपॅडवरच गाडीतील इन्फोटेन्मेंट सिस्टीम आणि दूरध्वनी यंत्रणा यांचे नियंत्रण देण्यात आले आहे. चालकाच्या उंचीनुसार तसेच त्याच्या सोयीनुसार स्टीअिरगंची उंची कमी-जास्त करण्याची सुविधाही देण्यात आली आहे.

गाडीची पुढील आसने मऊ आणि आरामदायी आहेत. पुढे केवळ दोनच जण बसू शकतील, अशी व्यवस्था आहे. एखाद्या आरामखुर्चीसारखी वाटू शकेल, अशीच या आसनाची रचना आहे. मागील बाजूच्या आसनांचीही हीच रचना आहे. कपहोल्डर्स किंवा इतर वस्तू ठेवण्यासाठीच्या सुविधा मात्र तितक्याशा उल्लेखनीय नाहीत. तुम्हाला तुमचा स्मार्टफोन हँडब्रेकच्या नजीक देण्यात आलेल्या खोबणीतच ठेवता येऊ शकणार आहे. झेस्टमध्ये आठ स्पीकर्स आहेत. चार पुढील बाजूस तर मागील बाजूला चार.

गाडीचा मायलेज चांगला आहे. शिवाय हिचे इंजिन स्मूद आहे. गाडी कितीही वेगात असली तरी इंजिन आवाज करत नाही. त्यामुळे गाडीच्या इंजिनाच्या आवाजाची तक्रार करण्यास जागा नाही. इको आणि स्पोर्ट ड्रायिव्हग मोड्समध्ये झेस्ट चार ते सहा सेकंदांत शून्य ते १०० किमी प्रतिलिटर एवढा उच्चतम वेगमर्यादा गाठू शकते. मात्र, हे पेट्रोल व्हर्जनमध्येच शक्य आहे.

कमतरतेचा उल्लेख करायचा झाल्यास गाडीत स्टोअरेज स्पेस खूप कमी आहे. दारांना अरुंद पॉकेट्स असल्याने त्यात अर्धा लिटर पाण्याची बाटलीच बसू शकते. पुढील आसनाच्या खाली एक स्टोअरेज ड्रॉवर मात्र देण्यात आला आहे. बाकी बूट स्पेस चांगली आहे. गाडीची किंमत सात लाखांच्या आसपास आहे.

झेस्ट का घ्यावी..

रिफाइन्ड इंजिन आणि तीन ड्रायिव्हग मोड्सची सुविधा असल्याने हेवी बॉडी, आरामदायी व प्रशस्त आसनव्यवस्था, पाच जणांसाठी अगदी उपयुक्त, लगेज स्पेसही भरपूर, सस्पेन्शन स्मूद आहे. स्टीअिरग व्हील आणि टचस्क्रीन सुविधा उत्तम. ग्राउंड क्लिअरन्स खूप चांगला आहे. मारुती डिझायरपेक्षा या गाडीची किंमत एक लाखाहून कमी आहे.

नॅनो

नॅनोचे नवे रूपडे लोभस आहे. इंधनटाकीची क्षमता वाढल्याने हिचा मायलेजही वाढला आहे. टाटा मोटर्सनी नॅनोच्या ग्राहकांकडून आलेल्या सूचनाबरहुकूम नॅनोत बदल करून नवीकोरी नॅनो बाजारात आणली आहे. जनरेशननेक्स्ट असलेली ही नॅनो ऑटोमेटेड ट्रान्समिशनमध्येही उपलब्ध आहे. जुन्या नॅनोमध्ये चारच गिअर होते. मात्र, नव्या रूपात तिला पाच गिअर देण्यात आले आहेत. नवी नॅनो महामार्गावर सुसाट धावताना दिसते. तसेच तिच्या इंजिनाचा आवाजही येत नाही. मात्र, इंजिन आधीप्रमाणेच मागील बाजूस बूट स्पेसच्या खाली आहे. बूट स्पेसही नव्या नॅनोमध्ये वाढवण्यात आली आहे. गाडी तुम्ही स्पोर्ट्स मोडमध्ये टाकल्यास गिअर झपाटय़ाने बदलत जातात. मात्र, इतर वेळी ही प्रक्रिया थोडी हळुवार असल्याचे जाणवते. एकंदरच नवी नॅनो चालवण्याचा अनुभव सुखद होता. नॅनोच्या अंतरंगातही लक्षणीय बदल करण्यात आला आहे. चार जण आरामात प्रवास करू शकतील अशी आसनव्यवस्था देण्यात आली आहे. तसेच ब्लूटूथ इनेबल्ड फोनची व्यवस्था आहे आणि म्यूझिक सिस्टीमही आहे. नॅनो थोडी मोठी झाल्यासारखी वाटते. समंजस वाटते. नॅनोचा हा नवा अवतार खूप छान आहे.

नवी नॅनो का घ्यावी..

सगळ्यात स्वस्त अशी ऑटोमेटेड ट्रान्समिशन कार आहे. तसंच चौघांच्या छोटय़ा कुटुंबासाठी नवी नॅनो अगदी सुयोग्य आहे. जुन्या नॅनोमध्ये राहिलेल्या त्रुटी नव्या नॅनोत काढून टाकण्यात आल्या आहेत. पॉवर स्टीअिरग आहे. दुसऱ्या वाहनाला सहजगत्या मागे टाकू शकते. तसेच वजनाने हलकी आणि ड्राइव्ह करायला अगदी सोपी आहे. ब्रेक सिस्टीमही बदलण्यात आली आहे. ग्राउंड क्लिअरन्सही उत्तम आहे. शहर आणि महामार्गावर चालवण्यास उपयुक्त आहे. नव्या नॅनोची किंमत दोन लाख 69 हजार ते दोन लाख 89 हजार रुपये आहे.

 

सफारी स्टॉर्म

नवी स्टॉर्म का घ्यावी

*नव्या टाटा सफारी स्टॉर्मची वैशिष्टय़े खालीलप्रमाणे आहेत..

*नवीन मल्टिफंक्शिनग स्टीअिरग

*सुखद प्रवासाच्या अनुभूतीसाठी स्टॉर्मच्या स्टीअिरगला ऑडिओ कंट्रोल तसेच डॅशबोर्डवरील इतर सर्व प्रणालींचे नियंत्रण देण्यात आले आहे.

*इन्फोटेन्मेंट सिस्टीम

*वेगावर आधारलेला आवाज नियंत्रक, ब्लूटूथ आणि हँड्स फ्री इत्यादी सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच डॅशबोर्डलाही नवा लुक देण्यात आला आहे.

*सर्वात सुंदर एसयूव्ही

*दूरच्या प्रवासासाठी सफारी स्टॉर्म ही सर्वात उपयुक्त अशी एसयूव्ही आहे. नव्या रूपात तर हिचा रुबाब अधिकच सुंदर भासतो. भारदस्त अशी ही एसयूव्ही १३ किमी  प्रतिलिटर एवढा जबरदस्त मायलेज देते.

*चार बाय चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. मायलेज चांगला आहे. नव्या रूपात अधिक आकर्षक दिसते. हिची केबिन व्होल्वोसारखी भासते. दूरच्या प्रवासातही  आरामाची अनुभूती देते. रस्ता सोडून चालत नाही. स्पीड ब्रेकर्सवर उधळतही नाही. एकूणच चांगली गाडी आहे. नव्या टाटा सफारी स्टॉर्मची किंमत १० ते १४ लाखांच्या  दरम्यान आहे.

ls.driveit@gmail.com