कार किंवा टू व्हीलरची देखभाल आणि स्वच्छता हा नेहमीच कटकटीचा मुद्दा असतो. मुंबईसारख्या शहरांमध्ये हवेतील प्रदूषण, आद्र्रता आणि धूळ हे घटक गाडी कुरूप करण्यात भर पाडतात, तर ग्रामीण भागात माती, धूळ, चिखल यामुळे गाडीचे रंगरूपच बिघडून जाते. विशेषत: महामार्गावरून प्रवास करताना अगदी छोटे छोटे धूलिकण गाडीला घट्ट चिकटून बसतात. वेळीच स्वच्छ न केल्यास या कणांचे हळूहळू थर साचत जातात आणि त्यामुळे गाडी केवळ अस्वच्छच होत नाही, तर तिचा रंग आणि चमकही उडू लागते. म्हणूनच गाडीची वेळोवेळी स्वच्छता करणे आवश्यक बनते. अर्थात याकरिता प्रत्येक वेळी गाडी सव्‍‌र्हिस सेंटरमध्ये घेऊन जाणे हे आर्थिकदृष्टय़ा आणि वेळेनुसारही परवडणारे नसते. त्यामुळे आठवडा-पंधरवडय़ातून एकदा घरीच गाडी स्वच्छ करणे कधीही चांगले.
मोटोमॅक्स कार शॅम्पू : गाडी पाण्याने किंवा घरगुती साबण पावडरचा वापर करून धुतल्यानंतरही अनेकदा त्यावरील पॅचेस किंवा स्ट्रेन्स राहतात. डिझेलचा वापर करून हे डाग काढता येतात. मात्र, त्यामुळे गाडीच्या रंगावर परिणाम होण्याची शक्यता असते. अशा वेळी कार श्ॉम्पू चांगला पर्याय ठरू शकतो. मोटोमॅक्सचा १० मिली शॅम्पू दोन ते तीन लिटर पाण्यात मिसळून हलवून त्याचा फेस तयार करा. हा फेस स्पंजच्या साह्य़ाने गाडीच्या बाह्य़ भागावर व्यवस्थितपणे पसरवा. डाग असतील तेथे व्यवस्थित घासा. त्यानंतर पाण्याने धुऊन काढा. मात्र गाडीच्या कोपऱ्यांमध्ये लागलेले ग्रीस किंवा तेल घालवण्यासाठी दोन-तीनदा अशी धुलाई करावी लागते. मोटोमॅक्सचा १०० मिलीचा कार शॅम्पू ५० रुपये किमतीत मिळतो. म्हणजेच एका धुलाईची किंमत पाच रुपये पडते.
पॉवरकट २००० : गाडीला घट्ट चिकटून बसलेले धूलिकण, छोटे ओरखडे, रंगदोष हटवण्यासाठी पॉवर कट २००० हे प्रीमियम फिनिश कम्पाऊंड अतिशय उपयुक्त ठरते. साधारणत: फेव्हिकॉलसारखे दिसणाऱ्या कम्पाऊंडचा वापर ज्या ठिकाणी घट्ट माती किंवा ओरखडे असतील त्यावर करावा. त्यापूर्वी तो भाग पाण्याने एकदा धुऊन घ्यावा. एका वेळी एकाच ठिकाणी थोडय़ा प्रमाणात हे लोशन लावावे. थोडय़ा वेळाने मऊशार तंतुविरहित कापडाच्या साह्य़ाने हलक्या हातानिशी हे लोशन पुसावे. त्यानंतर तो भाग पुन्हा स्वच्छ धुऊन काढावा. १०० ग्रॅमच्या डब्यामध्ये उपलब्ध असलेल्या या कम्पाऊंडची किंमत १०० रुपये आहे.