13 December 2017

News Flash

झूम.. झूम..महिन्द्र क्वॉन्टो : दणकट सौंदर्याची एसयूव्ही

बहुपयोगी वाहनांच्या प्रकारांमध्ये भारतीय बाजारपेठेत दिवसेंदिवस भर पडत आहे. विशेष करून महिन्द्राच्या स्कॉर्पिओ, झायलो,

रवींद्र बिवलकर, ravindrabiwalkar@gmail.com | Updated: November 8, 2012 1:36 AM

बहुपयोगी वाहनांच्या प्रकारांमध्ये भारतीय बाजारपेठेत दिवसेंदिवस भर पडत आहे. विशेष करून महिन्द्राच्या स्कॉर्पिओ, झायलो, झूव्ह अशा बहुपयोगी डिझेल मोटारींमध्ये आता भर पडली आहे ती  कॉम्पॅक्ट एसयूव्ही या सदरातील क्वॉन्टो या मोटारीची. वास्तविक एसयूव्ही म्हटल्यानंतर झटकन गतिमान होण्याचा गुण आणि रफ अ‍ॅण्ड टफ असण्याचा गुण हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. अशा प्रकाराच्या वाहनांमध्ये असणाऱ्या विशेष करून एसयूव्ही या सदरातील मोटारीमध्ये सेदान मोटारींसारखा आरामदायीपणा मात्र तुलनेत कमी असतो. याचे कारण या मोटारींच्या हार्ड सस्पेंशनमुळे असलेला दणकटपणा आरामदायीपणा मात्र देऊ शकत नाही. स्कॉर्पिओ, झायलो, इनोव्हा, टव्हेरा यामध्ये मिळणारा मोटारीसारखा कम्फर्ट-आराम यामध्ये मात्र एसयूव्हीमध्ये मिळेलच असे नाही. महिन्द्राच्या क्वॉन्टोबाबत असाच अनुभव येतो. कारण क्वॉन्टो मिनि झायलो म्हणून ओळखली जात असली तरी झायलोसारखा आरामदायी बैठकीचा आनंद यात मिळत नाही.  एक चांगली बहुपयोगी मोटार म्हणून पाहावे इतकेच. झायलोमध्ये मिळणारा आराम क्वॉन्टोमध्ये मिळेल ही अपेक्षा ठेवता येत नाही.
झटकन गतिमान होण्याचा गुण देण्याचा प्रयत्न क्वॉन्टोमध्ये करण्यात आला आहे, १५०० सीसीचे एमसीआर १०० हे (ट्िवन स्टेज टबरे) इंजिन असणारी ही मोटार ताकदवान आहे, पण तरीही गतिमानता पकडण्यात असणारी स्कॉर्पिओसारखी नाही. एक्स्लरेशन दिल्यानंतर गती घेतली जाते, पण काही क्षण ती गती स्थिरावली जाते व नंतर गती वाढली जाते. अशा प्रकारात चढावावर मोटार असताना कदाचित ती मोटार लोअर गीअरवरच ताकदीने चढू शकेल. क्वॉन्टोच्या बाबतीत हा अनुभव येतो. विशेष करून वातानुकूलित यंत्रणा चालू असताना सर्वसाधारण सपाट रस्त्यावरही असा अनुभव येतो. संयत ताकद अशा प्रकारात असल्याने स्पोर्टी या सदरात ही विराजमान झाली आहे असेही म्हणणे अस्वाभाविक आहे. आरामदायीपणे चालविणे, उत्कृष्ट नियंत्रणात चालविता येणे, वळणांवर झोत न जाणे व गतीमध्ये कमतरता न येता वळणे हे मात्र सहजसाध्य असलेली क्वॉन्टो, शांत डोक्याने, उतावळेपणा न ठेवता वाहन चालविण्यासाठी व दणकटपणा असलेल्या सस्पेंशनचे भान राखून कुटुंबाला घेऊन लांबवर नेण्यासाठी उपलब्ध किमतीमधील चांगली एसयूव्ही म्हणता येईल. वेग पकडल्यानंतर नियंत्रणासाठी तशी सहजसाध्यता क्वॉन्टोमध्ये देण्यात आली आहे. १५ सीसी इंजिन क्षमता असूनही तीन सिलेंडर असणारे इंजिन हेच गतिमानता अशा प्रकारे कमी होण्याचे कारण आहे, का याचा शोध घ्यावा लागेल.
अंतर्गत जागेतील मोकळेपणा, चांगले इंटेरिअर, प्रभावी वातानुकूलित यंत्रणा, चांगले मायलेज आणि दणकटपणा हे क्वॉन्टोचे गुण ठरतील. आसन व्यवस्थेत दुसऱ्या रांगेमागे असणाऱ्या समोरासमोरच्या दोन आसनांची मात्र स्थिती काहीशी चोरटेपणाची आहे. तिसऱ्या रांगेऐवजी समोरासमोर असणारी ही दोन आसनांची वास्तविक गरज होती का, याचा विचार पडतो. साडेपाच फुटांच्या मध्यमबांध्याच्या व्यक्तीला या आसनांवर बसून आरामसोडा, पण नीटपणे बसणे शक्य नाही. लांबवरच्या प्रवासासाठी ही आसने तद्दन निरुपयोगी म्हणावी लागतील. क्वॉन्टो ही चार मीटर लांबी असलेली मोटार एसयूव्ही सदरातील असून कॉम्पॅक्ट एसयूव्ही म्हणून आणली आहे. ते पाहाता तिच्याबाबतीत असणाऱ्या अपेक्षा काही प्रमाणात बाजूला ठेवाव्या लागतात. मागील आसनांचे निरुपयोगीपण जाणवते. तेथे केवळ सामान ठेवण्यासाठीच जागा उपयुक्त आहे असे म्हणावेसे वाटते. त्यापेक्षा दुसऱ्या रांगेतील आसनांना अधिक आरामदायीपणा देण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. दुसऱ्या रांगेतील आसनांचा आकार वाढविणे, पाठ टेकविण्याची जागा मागे सरकता येण्याची व्यवस्था करण्याने ती आसने अधिक आरामदायी करता आली असती. एकंदर रफटफ प्रवासासाठी, सामानही भरपूर वाहून नेता येईल व ताकदपूर्ण अशी दणकट सौंदर्याचे वाहन असेच क्वॉन्टोबाबत म्हणता येईल.
क्वॉन्टोचे बाहेरचे रूप दणकट सौंदर्य म्हणावे लागेल. काहीसे झायलोसारखे दिसणे असले तरी बरीचशी मोठय़ा हॅचबॅकप्रमाणे नजाकत असलेले रूप लाभले असून रुंदीला झायलोपेक्षा थोडी कमी असल्याने आत दुसऱ्या रांगेमध्ये तीन माणसे तशी सहजपणे व आरामात मावू शकतात. ग्राऊंड क्लीअरन्स चांगला असून आत चढउतार करताना मात्र त्रास होत नाही. टर्निग रेडिअसही कमी जागेत मोटार वळविण्यास उपयुक्त ठरणारा आहे. सी२, सी४, सी६ व सी८  या चार श्रेणींमधील क्वॉन्टो फेअरी ब्लॅक, जावा ब्राऊन, मिस्ट सिल्व्हर, टोरेडॉर रेड, रॉकी बैज व डायमंड व्हाइट या रंगसंगतीत उपलब्ध आहे. सी२ हे प्राथमिक मॉडेल असून सी६ हे सर्वात वरच्या श्रेणीतील मॉडेल आहे.

तांत्रिक वैशिष्टय़े
इंजिन – एम सीआर १०० कॉमन रेल, १४९३ सीसी, ३ सिलेंडर.
कमाल ताकद – ७५.५  किलोव्ॉट (१०० बीएचपी) -३७५० आरपीएम
कमाल टर्क – २४० एनएम- १६००-२८०० आरपीएम.
ट्रान्समिशन – ५ स्पीड, ५ एमटी ३२० इन्डायरेक्ट शिफ्ट
ब्रेक्स – फ्रंट – डिस्क, रेअर – ड्रम
फ्रंट सस्पेंशन – फ्रंट – इंडिपेन्डंटडबल विशबोन, कॉइल स्प्रिंग अँटिरोलबारसह, रेअर -फाइव्ह बार लिंक, कॉइल स्प्रिंग्ज
टर्निग रेडिअस – ५.४ मीटर्स
ग्राऊंड क्लिअरन्स – १८० एमएम
आसनक्षमता – पहिली रांग २, दुसरी रांग ३ व मागील भागात समोरासमोर २ (एकूण ७)
इंधनटाकी क्षमता – ५५ लीटर डिझेल.
मूल्य : प्राथमिक सी २ या मॉडेलला ५ लाख ८२ हजार रुपये, सी ४ – ६ लाख ३५ हजार रुपये, सी ६ – ६ लाख ८६ हजार रुपये, सी ८ – ७ लाख ३६ हजार रुपये  (एक्स शोरूम ठाणे- जकात, विक्रीकर, अतिरिक्त साधनांची किंमत वेगळी)

First Published on November 8, 2012 1:36 am

Web Title: mahendra quanto beauty of strong suv