रस्त्यावरून एखादी अगदी हटके दिसणारी गाडी जाताना दिसली की भल्याभल्यांच्या माना गर्रकन वळतात. गाडीच्या लुकची झटक्यात मेंदूत नोंद होते.. आणि मग आपल्याकडे कधी येणार अशी कार, असं म्हणत सुस्कारे सोडले जातात. हेच तर वैशिष्टय़ असतं ना, कार मॉडिफिकेशनचं! कारप्रेमींसाठी ती मॉडिफाइड कार असते तर इतरेजनांसाठी ती काऽऽऽर असते..

नुसतं घर घेतलं आणि त्यात सजावट नाही केली तर घराला घरपण राहतं का, अर्थातच नाही.. आणि तसंही घरांचा आकार आटोपशीर असल्याने सजावटही अगदी मोजूनमापून (इंच इंच लढवून म्हटलं तरी काही हरकत नाही) करावी लागते. कमीत कमी जागेत अधिकाधिक सजावट कशी करता येईल, याकडे कल असतो. मग इंटेरिअर डेकोरेटरला बोलावले जाते, हॉलमधलं फíनचर कुठे आणि किती असावं, टीव्ही कुठे असावा, खिडक्यांना पडदे कुठले असावे, घराला रंग कोणता असावा इत्यादींचा अगदी बारकाईने विचार केला जातो. अखेर घर हे घर असतं. अगदी तस्संच कारचंही असतं. कार हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे ती चारचौघांत कशी उठून दिसेल वगरेचा विचार करून तिच्यात बदल केले जातात. यालाच म्हणतात कार मॉडिफिकेशन..
सेडान, हॅचबॅक, एसयूव्ही, एमयूव्ही, एमपीव्ही या प्रत्येक प्रकारच्या गाडीत कारनिर्मात्यांनी आवश्यक तेवढी स्पेस दिलेली असते. मात्र त्यातही बदल केले जाऊ शकतात. कमीत कमी जागेचा वापर करून गाडीच्या अंतर्गत सौंदर्यात आणि तिच्या आरामदायीपणात भर टाकता येऊ शकते.

कार मॉडिफिकेशनचे प्रकार
डॅशबोर्ड : गाडीच्या निर्मात्यांकडून डॅशबोर्डवर अगदी बेसिक सुविधा प्राप्त झालेल्या असतात, जसे की, म्युझिक सिस्टीम, एसी कंट्रोल, लाइट कंट्रोल, स्टीअिरग कंट्रोल इत्यादी. मात्र यातही पूर्ण बदल करता येऊ शकतो. जसे की, डिझाइन बदलता येते, फीचर्स बदलता येतात, टच स्क्रीन, जीपीएस, फीदर टच लाइट आणि ग्लो बटन्स, सीट हिटर्स, इंजिन स्टार्ट आणि स्टॉप बटण, इलेक्ट्रिकल बूट ओपनर, इलेक्ट्रिकल मिर्स इत्यादी सुविधा डॅशबोर्डवर अ‍ॅड करता येऊ शकतात. तसेच स्टीअिरग टिल्ट मेकॅनिझम, लेदर डॅशबोर्ड, लेदर गीअरनॉब यांचीही भर घालता येऊ शकते.

स्पेस :
टोयोटा इनोव्हा किंवा मिहद्रा एक्सयूव्ही ५०० या गाडय़ांमध्ये सहा आसने असतात. मात्र रिक्लायनरच्या साह्याने या गाडय़ांना टू सीटर लिमोझिनसारखा आकार देता येऊ शकतो. त्यामुळे आतामध्ये भरपूर लेग स्पेस तर मिळेलच, शिवाय छोटेखानी फ्रिज बसवता येऊ शकेल तसेच व्हिडीओ आणि म्युझिक सिस्टीमचे सर्व नियंत्रण एका पॅनेलवर जोडता येऊ शकेल.

बदलणारे बारूप
गाडीच्या मेकओव्हर प्रक्रियेत गाडीचे पुढील व मागील बाह्यरूप बदलते. दारांची रचना बदलता येऊ शकते. सर्व बॉडी पॅनेल्सना डिझाइन करता येऊ शकते. गाडीचे बाह्यरूप एवढे पालटते की ती मूळची कोणती गाडी होती हे सहसा ओळखता येत नाही. दोन सायलेन्सर, लोगो, रिअर कॅमेरा, प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, डिश टीव्ही बॉक्स किंवा क्लोज्ड बॉक्स कॅरियर, ऑटोमॅटिक एक्स्पांिडग आणि स्लायिडग फूट रेस्ट्स, मागील दारावर स्टेपनी स्पेअर व्हील, सेक्युरिटी सिस्टीम, जादा एलईडी लाइट्स, क्रोम फिनिश बॉर्डर, टिल्टेड ग्लास इत्याही बाह्यरूपात बदल करता येऊ शकतात.

अडचण काय..
अडचण काहीच नाही. मॉडिफाइड कार लोकांचे लक्ष मात्र वेधून घेतात. ट्रॅफिक असो वा मोकळा रस्ता, अशा प्रकारच्या गाडय़ा पाहणे प्रत्येकाला आवडते, त्यामुळे माना वळवून मॉडिफाइड कारकडे पाहिले जाते, त्यामुळे चालकाचे लक्ष विचलित होऊ शकते.

सीट्स :
गाडीतील आसनव्यवस्था आरामदायी असावी, अशी की पोटातलं पाणीही हलायला नको, असं प्रत्येकालाच वाटतं. त्यासाठी मग अधिक कुशन असलेल्या सीट्सची गरज असते. मॉडिफाइड कारमध्ये आसनं अधिक आरामदायी बनवण्यासाठी रिक्लायनर वापरलं जातं, तसेच लेदर सीट्स, हँड रेस्ट्स आणि त्यावर कंट्रोल पॅनेल बसवले जाते. सीट हिटर आणि कूलरची व्यवस्थाही यात केली जाते. त्यामुळे गाडीचा अंतर्गत लुक पूर्णत: बदलून जातो. सीट्सच्या हेडरेस्ट्सवर मागील बाजूस सात इंचाचे स्क्रीन्स लावता येऊ शकतात, जेणेकरून मागे बसलेल्यांना त्यांच्या आवडीचे कार्यक्रम प्रवासात बघता येऊ शकतात. तसेच गाडीत बसणाऱ्यांच्या उंचीनुसार कमी-जास्त होऊ शकणाऱ्या सीट असतात. रिक्लायनर मोटर पॉवर्ड असतात.
मेन्टेनन्सचं काय..
साध्या गाडीनुसारच मॉडिफाइड कारचा मेन्टेनन्स असतो. त्यासाठी विशेष असा खर्च नाही. मात्र गाडी चालकाला गाडी हाताळताना अनेक व्यवधानं पाळावी लागतात. कोणत्याही भागाची दुरुस्ती करायची असेल तर कार डिझाइन केलेल्या कंपनीकडेच जावे लागते.
कार मॉडिफाय करणाऱ्यांसाठी सल्ला..
कार मॉडिफिकेशन ही एक कला आहे. जे आपल्या कारवर निरतिशय प्रेम करतात त्यांच्यासाठीच ही कला आपली सेवा देऊ करते. त्यामुळे आपल्या गाडीतील प्रत्येक जागेचा वापर व्हावा, तिच्या सौंदर्यात भर पडावी, ती आणखी उपयुक्त व्हावी असे वाटणाऱ्यांनीच कार मॉडिफाय करून घ्यावी. तसेच गरज असेल तरच गाडी मॉडिफाय करावी.
कोण करतं कार मॉडिफिकेशन
दिलीप छाब्रिया यांची डीसी कार डिझाइन कंपनीने केलेल्या गाडय़ा इनोव्हा आणि एक्सयूव्ही ५००
समीर ओक ls.driveit@gmail.com