dr09दुचाकीचा शिरकाव भारतात कसा झाला आणि ती देशात कशी लोकप्रिय ठरली, हे आपण मागच्या भागात पाहिले. स्कूटर इंडिया कंपनीचा विस्तार झाल्यानंतर काही नवीन कंपन्याही देशात पाय रोवू लागल्या. त्यात बजाज ऑटो आणि एलएमएल यांचा प्रामुख्याने समावेश होता. या दोन्ही कंपन्यांमुळे दुचाकीच्या बाजारात स्पर्धा निर्माण तर झालीच शिवाय ग्राहकांनाही उत्तम पर्याय उपलब्ध झाले. बजाजच्या चेतक स्कूटरने तर समस्त भारतीयांना वेडच लावले. राजदूत, बुलेट यांच्या खालोखाल चेतकचा खप होता. यावरूनच तिची लोकप्रियता लक्षात येते. शिवाय चेतक स्कूटर घ्यायची असेल तर खूप आधी बुकिंग करावे लागायचे, तेव्हा कुठे साधारण वर्ष-दोन वर्षांनी चेतक दारासमोर यायची. कोण अभिमान असायचा चेतकच्या स्वारांना. त्यामुळेच ती सर्वाधिक खपाची आणि सर्वाधिक लोकप्रिय दुचाकी ठरली. १९८०च्या सुमारास टीव्हीएस कंपनीचा उदय झाला. टीव्हीएसचे नामकरण कंपनीचे मालक टी. व्ही. सुंदरम अय्यंगार यांच्या नावावरूनच झाले. टीव्हीएसने ऑगस्ट, १९८०मध्ये मोपेड ही ५०सीसीची दुचाकी भारतीय बाजारपेठेत आणली. तिचेही ग्राहकांनी मनपूर्वक स्वागत केले. आपण मोपेड म्हणजे लुना समजतो. मात्र लुना हा कायनेटिकचा विशेष ब्रँड होता. कायनेटिकने सर्वप्रथम लुना लाँच केली होती. त्यानंतर कायनेटिकने होंडाबरोबर भागीदारी करत टू स्ट्रोक आणि फोर स्ट्रोक बाइक बाजारात आणून दुचाकी क्षेत्रात क्रांती घडवली.
मयुर भंडारी