संपूर्ण भारतीय बनावटीची आणि मध्यमवर्गीयांना परवडेल अशा दृष्टीने आरेखन केलेली टाटा मोटर्सची नॅनो ही गाजली ती तिच्या अवघ्या एक लाख रुपये इतक्या किमतीमुळे. रतन टाटा यांचे स्वप्न असणारी मध्यमवर्गीयांसाठीची नॅनो असेच समीकरण बनले. भारतातील सर्वसामान्यांना मोटार वापरता येईल अशी कमी किमतीची मोटार उपलब्ध करून देण्याचे हे स्वप्न टाटा मोटर्सने प्रत्यक्षात उतरविले होते. जगातही त्याबाबत उत्सुकता होती. अशी ही नॅनो काळाप्रमाणे आता नव्या स्वरूपातील सुधारणांसह भारतीय बाजारपेठेत दाखल झाली आहे. सुरुवातीच्या काळातील नॅनो व आताची नवीन नॅनो यात काही दर्शनी आकर्षकता तयार करण्यात आली असून, प्राथमिक नॅनोपेक्षा यामध्ये काही बाबी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. टाटा मोटर्सने ही नवीन नॅनो ‘लोकसत्ता’ला खास टेस्ट ड्राइव्हसाठी दिली. मुंबई व परिसरात या नॅनोची टेस्ट ड्राइव्ह घेण्यात आली. पावसाळ्याच्या मोसमात, खड्डय़ांच्या रस्त्यात, वाहतुकीच्या वर्दळीत व कोंडीमध्येही नॅनोने आपले शहरी वाहतुकीसाठीचे गुण स्पष्ट केले.
नवीन नॅनोमध्ये ब्ल्यूटूथसह अ‍ॅम्फीस्ट्रीम म्युझिक सिस्टीमसह चार स्पीकर्स ही कनेक्टिव्हिटी सुविधा देण्यात आली असून, वातानुकूलित यंत्रणा हीदेखील प्रभावी करण्यात आली आहे. अंतर्गत सौंदर्यपूर्ण सुविधायुक्त असणारी नॅनो पूर्वीपेक्षा अधिक सजविण्यात आली आहे. अंतर्गत रचनेमध्ये रंगसंगती, छोटय़ा वस्तू ठेवण्यासाठीही दरवाजांमध्ये कप्पे करण्यात आले आहेत. डॅशबोर्डमध्ये पुढील बाजूला तयार केलेला कप्पा व त्यावरील झाकण, त्याच्या बाजूला दिलेला लूक हा सौंदर्यपूर्ण आणि चांगल्या दर्जाचा आहे. अंतर्गत रचनेत वापरण्यात आलेले प्लॅस्टिक किमतीच्या तुलनेत खूप चांगले आहे, असे म्हणावे लागेल. त्याचप्रमाणे आसनांसाठी वापरण्यात आलेले कापड हेदेखील उच्च दर्जाचे व टिकावू आहे. अंतर्गत रचना ही पूर्वीच्या नॅनोसारखी असली तरी या बदलांमुळे व रंगसंगतींमुळे नॅनो नवीन सुविधांनी अद्ययावत केली आहे.
वास्तविक केवळ शहरातील वाहतुकीसाठी नॅनो खूप स्वस्त आणि आरामदायी म्हणायला हरकत नाही. मुंबई शहराचा विस्तार जसा रुंदावला आहे तसाच नॅनोचा प्रवासही, कारण मुंबई शहर म्हटले की आता विस्तारलेला मुंबईचा परिसर येतो. त्यामुळे रोजच्या वापरामध्ये पनवेलपर्यंत किंवा कल्याणपर्यंत ये-जा करणाऱ्यालाही नॅनो वापरताना ती छोटेखानी आहे म्हणून त्रास होईल, रस्ते खराब आहेत म्हणून त्रास होईल असे वाटण्याचे कारण नाही. आतील व्यक्तींसाठी असणारी ऐसपैस जागा, आरामदायी आसन रचना आणि नव्या सुविधांमुळे नॅनोतून प्रवास करणे कंटाळवाणे नक्की होणार नाही. सर्वसाधारण हॅचबॅक मोटारींमधून जातानाही त्रास होतो, तो त्यांच्या बसक्या रचनेमुळे. पण नॅनो छोटी असली तरी तिच्यामध्ये बसताना आपण जमिनीलगत बसलो आहोत, असे वाटत नाही, कारण ग्राउंड क्लीअरन्सही नॅनोला चांगला असल्याने चाकांच्या छोटेपणाचा विचार केला तरी कमाल १८० मिमी इतका ग्राउंड क्लीअरन्स एक माणूस बसल्यानंतर असतो. आत चार माणसे बसल्यानंतर थोडा ग्राउंड क्लीअरन्स साहजिकच कमी होतो पण तो १७० मिमी इतका राहतो. म्हणजे ग्राउंड क्लीअरन्स चांगला मिळतो. किंबहुना यामुळे रस्त्यावरील खड्डय़ांमधून जाताना सर्वसाधारण खड्डय़ांमध्ये नॅनो आकाराने लहान असल्याने व जर वेग अधिक असेल तर धक्का बसण्याचे प्रमाण अधिक असू शकते. चांगल्या रस्त्यावर ताशी तब्बल ८०-९० किलोमीटर इतका वेग पकडणारी नॅनो वेग घेण्यात कमी नाही. किंबहुना चढावाच्या चांगल्या रस्त्यातही लोअर गीअरवर वेग पकडण्याची ताकद नॅनोमध्ये आहे.
मुळात नॅनो ही शहरी रस्त्यांवर खूप उपयुक्त व किफायतशीर ठरली आहे. केवळ अन्य मोटारींसारखी दिसायला मोठी नाही, लहान असल्याने तिची इंजिनाची ताकद केवळ ६२४ सीसी असली तरी कमी नक्कीच नाही. अतिवेगवान व अधिक सीसीच्या मोटारींशी तुलना करणे चुकीचे आहे. पण तरीही तुलना करायची झाली तरी इंजिनाची कागदावरील कमी ताकद ही प्रत्यक्षात वाहन चालविताना व नॅनोची किंमत या तुलनेत नक्कीच कमी नाही. सर्वसामान्यांना कधी तरी वा वर्षांतून दोन-तीन वेळा ‘तब्येतीने’ बाहेरगावी जाण्यासाठीही नॅनो तयारीची आहे. पुढील बाजूने कमी जागा असणे म्हणजे बॉनेट कमी असणे, इंजिन पुढे नसणे, छोटेखानी असणे या बाबी सुरक्षिततेच्या दृष्टीने धोक्याच्या मानल्या जातात. परंतु मुळात तुम्ही मोटार नीटपणे चालविली तर त्या फार असुरक्षित ठरणार नाहीत. सुरक्षिततेच्या चाचण्यांमधूनही नॅनो उत्तीर्ण झालेली आहे, हे विसरता कामा नये. भारतीय बनावटीची असल्याने भारतीय रस्ते, वाहतूक यांचा विचार करून ती बनविलेली आहे. अत्युच्च सुरक्षा म्हणून अन्य मोटारींच्या तुलनेत नॅनोचे अपघात मोठय़ा प्रमाणात झाल्याचे दिसत नाही. तसेच रस्त्यावर वेगाने धावतानाही नॅनोची रस्त्यावरील पकड चांगली आहे. आज शहरांबाहेरही दररोज सुमारे २०० किलोमीटर इतका प्रवास करणारे नॅनोचे मालक-चालक दिसून येतात. केवळ सायलेन्सरमध्ये आवाज मोटारसायकलसारखा येतो, असे सांगणाऱ्यांसाठी मात्र ही मोटार नक्की नाही, कारण त्यांच्या मोटारीविषयीच्या अपेक्षाच वेगळ्या आहेत, असे म्हणावे लागते.
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे साधन म्हणजे मोटार. यादृष्टीने नॅनो उपयुक्त वाहन आहे हे नक्की. ताशी ४५ ते ५५ इतका किमान वेग ठेवून आवश्यक देखभालीसह जर नॅनो सर्वसाधारण रस्त्यांवर चालविली तर ती नक्कीच दीर्घकालीन उपयोगी ठरू शकेल. किफायती वाहनही ठरू शकेल. वास्तविक पॉश मोटारींची तुलना न करता वाहतुकीचे साधन म्हणून विचार केला तरी नॅनोने लोकांच्या दृष्टीने मोठी उपयुक्तता सिद्ध केलेली आहे. नवीन नॅनोमधील अंतर्गत सुविधासज्जता पाहिली तर उपयुक्ततेबरोबरच आकर्षकपणा, सौंदर्यदृष्टी व आरामदायी रचना या गुणांमध्ये सरस ठरू शकेल.

तांत्रिक वैशिष्टय़े
लांबी/रुंदी/उंची/व्हीलबेस/ ग्राऊंड क्लीअरन्स (सर्व एमएममध्ये) – ३०९९/१४९५/१६१३/२२३०/१८०
इंधन टाकी क्षमता – १५ लिटर
इंजिन – ४ स्ट्रोक, वॉटरकूल्ड, मल्टिपॉइंट फ्युएल इंजेक्शन सिस्टीम, एसओएचसी, २ व्हॉल्व, सिलेंडर, ६२४ सीसी
कमाल ताकद – ३८ पीएस ५५०० – किंवा + २५० आरपीएम
कमाल टॉर्क – ५१ एनएम ४०००  – किंवा + ५०० आरपीएम
व्हील्स – ४ बी बाय १२ इंची, स्टीलच्या बनावटीचे
सस्पेंशन – फ्रंट- इंडिपेंडंट, लोअर विशबोन, मॅकफर्सन स्टर्ट टाइप अँटी रोल बारसह/ रेअर – इंडिपेंडंट, सेमी ट्रेलिंग आर्म कॉइल स्प्रिंगसह व हायड्रॉलिक शॉक अ‍ॅब्सॉर्बर्ससह
स्टिअरिंग – मेकॅनिकल रॅक अ‍ॅण्ड पिनिअन स्टिअरिंग गीअर स्टिअरिंग कॉलमसह.
ब्रेक्स – फ्रंट व रेअर ड्रम ब्रेक. / पार्किंग ब्रेक्स – केबलद्वारा संचालित आणि मेकॅनिकल प्रणालीवर आधारित मागील चाकांवर नियंत्रण ठेवणारे, लीव्हर पद्धतीचा ब्रेक.
रंगसंगती – डॅझल ब्लू, पपया ऑरेंज, रॉयल गोल्ड, मोजिटो ग्रीन, मेटोर सिल्व्हर, पर्ल लाइट
किंमत – दीड लाख रुपयांपासून (एक्स शोरूम मूल्य नवी दिल्ली- अन्य कर, अतिरिक्त सामग्री, विमा, नोंदणी वेगळे)

नॅनो एलएक्स (उच्च श्रेणी),  नॅनो सीएक्स (मध्यम श्रेणी) व नॅनो स्टॅण्डर्ड अशा तीन श्रेणींमध्ये नॅनो उपलब्ध असून, प्रत्येक श्रेणीची वेगवेगळी वैशिष्टय़े कमी-अधिक प्रमाणात देण्यात आली आहेत.
प्रत्येक श्रेणीसाठी चार वर्षांची किंवा ६० हजार किलोमीटर (यामध्ये जे लवकर असेल ते) इतकी वॉरंटी आहे.
नॅनो लवकरच सीएनजी या इंधन प्रकारातही उपलब्ध करण्यात येणार आहे. वैयक्तिक आवडीवर आधारित अशी पर्सनलायझेशन किट स्वरूपाची योजनाही उपलब्ध. त्यात तुमच्या मोटारीला तुम्ही अधिक आकर्षक बनवू शकता.
कमाल मायलेज २५.४ किलोमीटर प्रति लिटर
वातानुकूलित यंत्रणा अधिक प्रभावी
अंतर्गत रचनेत सेंट्रल कॉन्सोलमुळे कॉकपिटसारखी आकर्षक रचना
ग्लोव्ह बॉक्स
चावीशिवाय प्रवेश देणारा रिमोट कंट्रोल