जीप हा कारप्रेमींचा आवडता विषय. उघडय़ा जीपमधून बेदरकारपणे फिरण्याची मजा काही औरच असते. आता या जीपचा नवा अवतार दोन वर्षांनी भारतात अवतरणार आहे. जीपच्या निर्मात्या फियाट ख्रायस्लर ऑटोमोबाइल्सने भारतातील आपली गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय घेतला असून रांजणगाव येथील प्रकल्पात तब्बल एक हजार ७८२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या गुंतवणुकीच्या बळावर फियाट इंडिया येत्या दोन वर्षांत जीपचा नवा अवतार बाजारात आणणार आहे. हा नवा अवतार जीप रेनेगेडचा सुधारित अवतार असेल. तसेच ग्रँड शरोकी आणि जीप रँगलर हे दोन ब्रँडही पुढील वर्षी बाजारात उतरवण्याचा फियाटचा मानस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मिशिगन येथील फियाटच्या मुख्यालयात झालेल्या चच्रेनंतर ही घोषणा करण्यात आली. चच्रेत जीप ब्रँडचे अध्यक्ष व मुख्याधिकारी माइक मॅनले व कंपनीचे इतर अधिकारी सहभागी होते. अमेरिकेबाहेर असलेल्या फियाटच्या चार प्रकल्पांपकी रांजणगावचा प्रकल्प आहे. जीपचे उत्पादन सध्या इटली व ब्राझील येथे होते, तर चीनमध्येही जीपच्या उत्पादनाला सुरुवात करण्याचा फियाटचा मानस आहे.