विजेवर चालणाऱ्या मोटारींचा जमाना भारतात येण्यास आता कदाचित फार काळ राहिलेला नाही; किंबहुना आज ज्या पद्धतीने विजेच्या पुरवठय़ामध्ये जो त्रास, टंचाई व कमतरता अनेक भागांत दिसून येत आहे, ती कशी राहणार नाही, यासाठी प्रयत्न नक्कीच चालू झालेले आहेत. मुळात ऊर्जा किती प्रकारे निर्माण करता येते, ही बाब खूप पुढे गेलेली आहे. विद्युतनिर्मिती केंद्रांमध्ये भारतात ज्या घटकांवर ही वीज निर्माण केली जाते ते घटक म्हणजे जलविद्युत, पवनऊर्जा, कोळशावरील आधारित विद्युतनिर्मिती केंद्रे अशा केंद्रामध्ये आज जैतापूरसारख्या नव्या आण्विक वीजनिर्मितीची केंद्रे निर्माण करण्यासाठी जोराने प्रयत्न चालू आहेत. राजकीय स्तरावर तर ही बाब मानापमानासारखी चाललेली आहे. काही असले तरी वीजनिर्मिती ही वाढत्या विकासाला उपयुक्त आहे. माणसाची बदललेली जीवनशैलीही या विजेची भुकेली आहे. त्यातच मोटारीला लागणाऱ्या डिझेल, पेट्रोल, एलपीडी व सीएनजी या इंधन प्रकारांवर होणारा खर्च, त्याची दिवसागणिक होणारी मूल्यवृद्धी यामुळे विजेवर चालणाऱ्या मोटारी आज युरोपात जरी मोठय़ा प्रमाणात दिसत असल्या तरी ही भारतीय रस्त्यांवरील वाहनांच्या इंधनाची भविष्यातील गरज ठरणार आहे, हे नक्की. ती बाब किती परवडणारी आहे, ते मात्र काळ ठरवेल, कारण बाजारावर आधारित असलेली ही एकूणच जागतिक स्थिती पाहिली तर विजेचे दरही वाढत्या ग्राहकांनुसार, उपभोग्यतेच्या प्रमाणानुसार वाढतील वा वाढविले जातील हे नक्की.
युरोपात विजेवर चालणाऱ्या मोटारींच्या बॅटऱ्यांना किंवा फ्युएल सेलना चार्ज करण्यासाठी आवश्यक आहे ती वीजपुरवठय़ाची यंत्रणा. केवळ यंत्रणाच नव्हे तर विजेच्या निर्मितीसाठीही तेथे वेगवेगळे प्रयत्न चालू आहेत. तुलनात्मक दृष्टीने तशी वीजपुरवठय़ाची फार कमतरता आहे, असे दिसत नाही. ही स्थिती अर्थातच भारतात अजून तरी नाही.
वेगवेगळ्या प्रकारांतून तयार केलेली वीज युरोपात दिसून येते. पवनचक्क्य़ांमधून झालेली वीजनिर्मिती, सौरऊर्जा, जलविद्युत केंद्रे, कोळशावरील वीजनिर्मिती यामुळे विकसित देशांमध्ये वीज उत्पादनाचे चांगले सक्षम जाळे अजून तरी पुरेसे ठरलेले आहे. विजेवर मोटारींमधील या बॅटऱ्यांना चार्ज करण्याचे विद्युतभारित करण्याचे काम घरांमधील वीजपुरवठय़ांमधून केले जाते त्याचप्रमाणे पेट्रोलपंपाप्रमाणे हेच काम व्यावसायिक स्तरावरही होऊ लागले आहे. त्यासाठी चांगली पायाभूत सुविधा निर्माण झाली आहे. वेगवेगळ्या खासगी कंपन्यांना त्यात आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करता आलेले आहे. खासगी कंपन्यांप्रमाणेच सरकारी स्तरावरही अशी केंद्रे तयार केलेली आहेत. संयुक्त करारान्वये खासगी-सार्वजनिक प्रकल्पही या सेवेत कार्यान्वित आहेत. मोठे जाळे तयार करण्यात आले आहे. ही सारी यंत्रणा उभी करण्यामागे एक शिस्तबद्ध, सूत्रबद्ध रचना, नियोजन असल्यामुळे हे सारे जमले आहे. भारतात अशा प्रकारच्या नियोजनामध्ये मात्र तूर्तास तरी अभाव आहे, बेशिस्त आहे, ही बाब नाकारता येणार नाही.
या प्रकारच्या विद्युत मोटारींच्या चार्जिगच्या कामामुळे होणारे फायदे नक्कीच लोक घेऊ लागले आहेत. विद्युत मोटारींची संख्याही कमी नाही तसेच वेगवेगळ्या कंपन्यांनीही तशी मॉडेल्स उतरविली आहेत. केवळ प्रवासी वाहने नाहीत, तर मालवाहू छोटी व्यावसायिक वाहनेही रस्त्यावर धावत आहेत. पर्यावरणलक्ष्यी म्हणून ही वाहने नक्कीच उपयुक्त आहेत, ही बाब जरी खरी असली तरी मायलेजच्या दृष्टीने त्या त्या देशांमधील पेट्रोल वा डिझेलसारख्या इंधनांच्या तेथील किमतीच्या तुलनेतही ही वाहने फार मायलेजप्रभावी वा कमी खर्चीक आहेत, असे मात्र मुळीच नाही. या प्रकारच्या पर्यावरणलक्ष्यी इंधनामध्ये वीज ही कोणत्या प्रकारातील वापरता त्यावरही काही गोष्टी अवलंबून राहू शकतात. त्यातही सौरऊर्जा वापरून तयार होणारी वीज वापरली तर प्रत्येक मोटारमालकाला घरीदेखील अशी वीज सौरऊर्जा आधारित विद्युतभारित करणारी यंत्रणा बसविता येईल. सर्वसाधारण सरकारी वा खासगी कंपन्यांच्या वीजपुरवठय़ापेक्षा काहीशी स्वस्त वीज वापरता येऊ शकेल. भारतात अनेक ठिकाणी, विशेष करून ग्रामीण भागात होणारी वीजचोरी, त्यात असणारे भारनियमन अशा बाबी लक्षात घेतल्या तर वीजपुरवठय़ातही अजून भारत ‘कोसो दूर’ आहे, ही स्थिती नाकारता येणारी नाही. विजेची वाढती गरज लक्षात घेतली, तर भारतात अजूनही बरीच पायाभूत यंत्रणा या विजेवरील मोटारी चार्जिग केंद्रासाठी तयार व्हायची आहे. ती जर आयात करायची म्हटली तरी त्यामुळे खर्च नक्कीच वाढेल. अर्थात या साऱ्या बाबी युरोपात पार पुढे गेलेल्या आहेत. त्यामुळे तेथील जीवनशैली, विशेष करून युरोप, अमेरिका येथील शहरी जीवनशैलीचे मूल्य महाग आहे व ते स्वीकारले गेले आहे. तेथील परडोई उत्पन्न हेही विचारात घेण्यासारखे आहे. यामुळेच विजेवर चालणाऱ्या मोटारी पर्यावरणलक्ष्यी असल्या तरी मोठय़ा प्रमाणात त्या किफायतशीर असतील असे अजिबात म्हणता येणार नाही. मात्र त्यामुळे शहरातील वाहतुकीच्या साधनांमध्ये फायदा होऊ शकेल, अशी परिस्थिती नक्कीच आहे. हीच स्थिती भारतातील शहरांमध्येही काही प्रमाणात लागू होऊ शकते. विजेवरील मोटार घेण्यासाठी अमेरिकेत सरकारी सवलत देण्यात येते. अशा प्रकारच्या सवलती या त्या देशांच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असतात.
चार्जिग स्टेशन्स म्हणजे नेमके काय ते पाहिल्यास असे वाहन वापरणारा मालक किफायतशीर राहू शकतो. विशेष करून शहरी वाहतुकीसाठी अशा वाहनांना मायलेजप्रभावी होता येते हे विशेष. ही बाब या वाहनाच्या बनावटीमुळे, तंत्रज्ञानामुळे सिद्ध झाली आहे. मागील लेखात सांगितल्याप्रमाणे ही चार्जिग स्टेशन्स एसी आहेत, डीसी आहेत हे समजून घेतले पाहिजे. त्यावर विद्युत मोटारींच्या चार्जिगसाठी किती वेळ लागतो, ते स्पष्ट होते. त्याचप्रमाणे ही वीज कोणत्या प्रकारच्या साधनाने निर्माण केली आहे, ती बाबही महत्त्वाची आहे. त्यावरही वीज खर्चाचा आकार निश्चित होतो. दुसरी बाब म्हणजे काही ठिकाणी तुमच्या मोटारीची बॅटरी त्या केंद्रावर देऊन ती बदलून त्याऐवजी विद्युतभारित बॅटरी ताब्यात घेता येते. त्यामुळे तुमचा चार्जिगसाठी वेळ जात नाही. अर्थात या साऱ्या विकसित देशांमधील सुविधा आहेत. जपान, चीनमध्येही चार्जिगवरील वाहने आहेत, पण त्या साऱ्या वाहनांचा वापर कसा केला जातो, कुठे केला जातो, त्या मोटारींचे चार्जिग कधी व कसे करायचे, देखभाल कशी करायची या सर्व बाबींवर जितके लक्ष द्यावे लागते तेदेखील वेगळे व लक्षणीय काम असेल.
मोटार मेकॅनिक हा उत्कृष्ट वायरमन वा वीज साधनांचा कुशल कारागीर हवा हेदेखील ओघाने आले. अशा प्रकारच्या मोटारींमध्ये सुरक्षितता ही किती, हा वेगळा विषय आहे. बॅटरी पॅक गरम होण्यामुळे मोटारीत उष्णता वाढते का, आग लागण्याची शक्यता किती असते, त्या त्या देशांमधील हवामानानुसार काही फरक केले जातात का, या बाबीही विजेवर आधारित मोटारींमध्ये महत्त्वाच्या आहेत.
चार्जिग करायचे म्हटले की नेमके चार्जिग स्टेशन कोणते चांगले आहे, तेथे वायरिंग आपल्या मोटारींसाठी सुयोग्य आहे का, वायरलेस चार्जिगची सुविधाही असणारे स्टेशन व आपली मोटार त्यासाठी योग्य आहे का, असे अनेक प्रश्न भवितव्यात निर्माण होणार आहेत, पण या साऱ्या प्रश्नांना सामोरे जाण्यापूर्वी भारतीय स्थिती नेमकी काय आहे, याचाही विचार भारतात अशा प्रकारच्या मोटारी आणण्यापूर्वी केला जाणे गरजेचे आहे हे मात्र निश्चित!