आज कार चालवायला सुरुवात करून मला पाच वर्षे झाली, परंतु अजूनही मला हे स्वप्न असल्यासारखेच वाटते. लहानपणापासून आपली काही स्वप्ने असतात. काही स्वप्ने पुरी करण्यासाठी आपण जिवापाड मेहनत करतो, पण काही स्वप्ने अशी असतात जी मागे पडतात, परंतु आपले आयुष्यसुद्धा खूप सुंदर आहे, जे प्रत्येक चांगल्या-वाईट दिवसांत आपल्याला एक संधी नक् की देते जेव्हा ही मागे पडलेली स्वप्ने पुरी करायला वाव मिळतो. असेच माझेही एक स्वप्न होते ४ व्हीलर चालवण्याचे. तसे मला प्रत्येक गाडी चालवण्याची आवड आहे, मग ती सायकल असो किंवा लुना किंवा स्कूटर. घरी असलेली सगळी वाहने मी चालवून बघितली. अगदी माझ्या मोठय़ा भावाची बाईकसुद्धा मी चालवली. त्यालासुद्धा मला प्रत्येक गाडी शिकवायला आवडायची. खरे तर गाडय़ा चालवण्याची आवड मला त्याच्यामुळेच लागली असेल.
कॉलेजमध्ये असतानापासून मी टू व्हीलर चालवायचे, परंतु फोर व्हीलर चालवणे हे माझ्यासाठी एक स्वप्न होते. कॉलेज संपल्यावर पुढचे शिक्षण, जॉब, लग्न, मुले या सगळ्यामध्ये हे स्वप्न थोडे मागे पडले. घरी कार आली, पण नवरा गाडी चालवतोय म्हटल्यावर आपण चालवण्याचा विचार करावा असे वाटलेच नाही. स्वप्न पुरे करण्यासाठी ड्रायिव्हग स्कूल लावले, ड्रायव्हिंग लायसन्स मिळवले, परंतु रस्त्यावर कार चालवण्याची हिम्मतच होत नव्हती. अचानक नवऱ्याचे काही वर्षांसाठी परदेशी जाण्याचे ठरले, परंतु मला भारतातच राहावे लागणार होते. या सगळ्यामुळे रस्त्यावर कार चालवायला शिकण्याची निकड लक्षात आली.
लवकरात लवकर रस्त्यावर कार चालवण्याचा आत्मविश्वास यावा यासाठी मी एक ट्रेनर ठेवला. ड्रायिव्हग स्कूलच्या गाडीला ट्रेनरच्या सीटजवळसुद्धा क्लच व ब्रेक असतात, परंतु आपल्या गाडीमध्ये ही सोय नसते. त्यामुळे कार चालवण्याचे जरा जास्तच दडपण आले होते.
पहिल्याच दिवशी गाडी इमारतीच्या बाहेर काढायची होती. मला वाटले होते की हा ट्रेनर स्वत: आधी गाडी गेटच्या बाहेर घेईल आणि नंतर मला चालवायला देईल, परंतु त्याने सांगितले, ‘गाडी तुम्हालाच बाहेर काढावी लागेल मी फक्त बाजूला बसून तुम्हाला सूचना देणार.’ हे ऐकून माझे तर धाबेच दणाणले. तरीसुद्धा मी हिम्मत जोडली, आधी देवाचे नाव घेतले आणि स्टीयिरग व्हील पकडले. स्टीयिरग व्हील जर जास्तच घट्ट धरले होते. तसे तो म्हणाला, ‘हे स्टीयिरग व्हील गाडीला जोडलेले आहे. ते कुठेही जाणार नाही. थोडे सल धरले तरी चालेल.’ मला हसू आले. हळूहळू माझी भीड चेपली, परंतु आम्ही कमी गर्दीच्या ठिकाणीच गाडी चालवायचो.
दोन – तीन दिवसांनी ट्रेनरला काम होते, त्यामुळे त्याला शिकवायला यायला जमले नाही. मग त्या ट्रेनरची जागा दुसऱ्या ट्रेनरने घेतली. हा ट्रेनर भयंकर कडक. कारचा प्रेमी. म्हणजेच माझा नवरा. पहिल्याच दिवशी त्याचा ओरडा खात आणि गाडीला कुठेही साधा ओरखडाही पडू नये याची काळजी घेत आमचे ट्रेिनग सुरू झाले.
पहिल्याच दिवशी त्याने मला गर्दीच्या जागी गाडी घ्यायला लावली. त्याचा युक्तिवाद साधाच होता की आपल्याला भारतात काही रिकामे रस्ते मिळणार नाहीत किंवा सगळेच लोक वाहतुकीचे नियम पाळतील असेही नाही आणि स्वतंत्रपणे गाडी चालवायला लागल्यावर मला समजले की ते खरेच आहे. या ट्रेिनगचा मला खऱ्या अर्थाने फायदा झाला.
खरी परीक्षेची वेळ तेव्हा आली ज्या वेळी मला एकटीला कार चालवायची होती. एकटीने कार चालवायला हिम्मत होत नव्हती, परंतु मी काही हार मानणार नव्हते. त्यामुळे कितीही अडचणी आल्या तरी मी व्यवस्थित गाडी चालवून दाखवणारच, असे ठरवले आणि पुढचे सगळे सोप्पे झाले. एकदा चढावावर कार अचानक थांबवावी लागली आणि बंद पडली. आता ती सुरू करून पुढे नेणे हे एक आव्हानच होते, कारण मागे आणि पुढे भयंकर ट्राफिक होता. चढावावर गाडी जेव्हा बंद पडते तेव्हा ती सुरू केल्यावर आधी पुढे जाण्याऐवजी मागे जाते. मी एक सेकंद डोळे मिटून देवाचे नाव घेतले, सर्व सूचना नीट आठवल्या आणि कार स्टार्ट करून व्यवस्थित पुढे घेतली. या घटनेनंतर माझा गाडी चालवण्याचा आत्मविश्वास खूपच वाढला. आता कितीही गर्दीच्या ठिकाणी मी व्यवस्थित गाडी चालवू शकते. तसेच कोणतीही गाडी तेवढय़ाच आत्मविश्वासाने चालवू शकते. कार चालवण्याचे स्वप्न तर मी पूर्ण केलेच, परंतु कारमधून आई- वडिलांना फिरवताना त्यांच्या डोळ्यांमधील कौतुक बघून खूपच समाधान मिळते.
– प्राजक्ता फणसे, नाशिक