डिझेलची किंमत लवकरच कमी करू, पाच वर्षांत प्रथमच डिझेलच्या किमतीत घट होणार अशा प्रकारची हाकाटी पिटली जात असतानाच पेट्रोलच्या दरात मात्र चढ-उतार सुरूच आहेत. परंतु गेल्या काही वर्षांतला ट्रेण्ड लक्षात घेतला तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतील फरक फार काही राहिलेला नाही, असेच दिसते. त्यामुळे डिझेल कार काय किंवा पेट्रोल कार काय त्यांच्या किमतीत फरक असला तरी त्या ज्या इंधनावर चालणार आहेत, त्या इंधनाची किंमत महत्त्वाची. असा विचार केला तर नक्कीच पेट्रोल कारच बरी असे म्हणावे लागेल.
बीएमडब्ल्यू
अगदी गेल्याच आठवडय़ात पेट्रोलच्या किमतीत ६५ पैशांनी घट झाली. मात्र, डिझेलची किंमत लवकरच कमी होईल, असे वारंवार सांगितले जात असले तरी त्यात काही घट होताना दिसत नाही. आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत क्रूड तेलाच्या किमती वाढल्या किंवा कमी झाल्या की, लगेचच आपल्याकडे पेट्रोलच्या किमतीत चढ-उतार होताना दिसतो. या पाश्र्वभूमीवर पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त असलेल्या डिझेलमुळे त्यामुळे गेल्या काही वर्षांत लोकांचा डिझेल कार घेण्याकडे कल वाढू लागला होता. आता मात्र गेल्या वर्षांपासून हा ट्रेण्ड कमी होऊ लागला आहे. गेल्या वर्षांच्या सुरुवातीपासून डिझेलच्या किमतीत वाढ होऊ लागली. आणि आता तर अशी परिस्थिती आहे की, दोन्ही इंधनांच्या किमतीत फार फार तर नऊ ते दहा रुपयांचा फरक राहिला आहे. त्यामुळे गेल्या वर्षांपासून डिझेलवर चालणाऱ्या गाडीपेक्षा पेट्रोलवर चालणाऱ्या गाडीच्या मागणीत वाढ होऊ लागल्याचे निदर्शनास आले आहे. अगदी टक्केवारीच्या बाबतीतच सांगायचे झाल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतील ४५ टक्क्यांची तफावत आता १५ टक्क्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे कोणत्याही गाडीच्या डिझेल व्हेरिएन्टवर जास्तीचे एक लाख रुपये का मोजावे, असा विचार ग्राहक करू लागले आहेत. यासाठी आपण तुलनाच करून पाहू.
पेट्रोलवर चालणारी कार का घ्यावी?
पहिली गोष्ट म्हणजे पेट्रोलच्या दरात दर महिन्याला एक तर वाढ तरी होत असते किंवा मग वाढ तरी होते. त्यामुळे तुमच्या दरमहा पेट्रोलच्या खर्चात वाढ किंवा मग घट तरी होते. या पाश्र्वभूमीवर तुम्हाला तुमच्या कारचा अॅव्हरेज अधिक तुमच्या कारलोनचा हप्ता यावरील सर्व गणिताची मांडणी करून खर्चाची तरतूद करता येते. तसेच पेट्रोल व्हेरिएन्टच्या गाडय़ांची किंमत डिझेल व्हेरिएन्टपेक्षा कमी आहेत. हा विचार करता पेट्रोलवर चालणारी कारच बरी. बघा तुम्हीच विचार करून.
तुम्ही डिझेल कार का घ्यावी
पेट्रोलच्या किमती डिझेलपेक्षा ४० टक्क्यांनी जास्त होत्या त्या वेळी डिझेलवर चालणारी गाडी घेण्यास काहीच हरकत नव्हती. मात्र, गेल्या वर्षांपासून परिस्थिती बदलली आहे. तुमची कार महिन्याला दोन ते अडीच हजार किमी प्रवास करत असेल तर तुम्हाला डिझेल व्हेरिएन्ट परवडणारे आहे. मात्र, तुमचा दरमहा एवढा प्रवास होत नसेल तर पेट्रोलवर चालणारी कारच बरी. कारण तुम्ही ज्या ब्रॅण्डची पेट्रोल व्हेरिएन्ट कार घेणार त्याच ब्रॅण्डच्या डिझेल व्हेरिएन्टची किंमत पेट्रोल व्हेरिएन्टपेक्षा किमान लाखभर रुपयाने अधिक आहे. शिवाय तुमच्या गाडीचा ईएमआयही जास्त असतो. उदाहरणच द्यायचे झाल्यास मारुती सुझुकीचे पेट्रोल व्हेरिएन्ट डिझेल व्हेरिएन्टपेक्षा कमी किमतीचे असेल आणि ती तुम्ही पाच वर्षांच्या कर्जावर घेतली असेल तर सध्याच्या ११ टक्के व्याजदरानुसार डिझेल कारवरील व्याजाचा आकडा जास्त असेल. तीच परिस्थिती इतरही ब्रॅण्डच्या गाडय़ांनाही लागू असेल. म्हणजे तुमच्या कारलोनचे हप्ते अधिक तुमचा दरमहा डिझेलचा खर्च व गाडीची देखभाल यांचे गुणोत्तर केल्यास ते पेट्रोलच्या तुलनेत जास्त आढळेल, मग तुम्ही डिझेलवर चालणारी गाडी घ्यावी का..