राजेशाही थाटमाटाच्या अलिशान मोटारीचे आकर्षण सर्वानाच असते, त्याविषयी अप्रूप वाटत असते. अर्थात ही मोटार एका विशिष्ट वर्गातील ग्राहकाला परवडणारी असते. ती देखील त्या वर्गातील ग्राहकाची तशी आवड असली की अशी शाही मोटार घेण्यासाठी तो ग्राहक मागेपुढे पाहात नाही. भारतातील अशा या खास ग्राहकांसाठी अलिशान मोटारी सादर करण्याची आता चांगलीच चढाओढ सुरू आहे. औडी किंवा सर्वसाधारणपणे मराठी उच्चार करताना ज्याला आपण ऑडी म्हणतो, त्या औडीने सेदान श्रेणीतील आपल्या ए६ या मोटारीची विशेष आवृत्ती आता सादर केली आहे. युरोपात प्रथम क्रमांकावर असलेल्या औडीने अत्याधुनिक अशा सुविधा देण्यासाठी त्यांनी तेथील ए८ या सेदान मोटारीतील काही सुविधांचा ए ६ या भारतात सध्या देत असलेल्या मोटारीत समावेश केला आहे. ३००० सी सी इतकी जबरदस्त ताकद असणारी व फोर व्हील ड्राइव्ह असणारी ए ६ ची ची विशेष आवृत्ती ऑडीने जयपूर येथे मोठय़ा थाटामाटाने सादर केली.  या ए ६ च्या विशेष आवृत्तीच्या ड्राइव्हचा अनुभव जयपूर-आग्रा मार्गावर ‘लोकसत्ता टेस्ट ड्राइव्ह’ला देण्यात आला.
सध्याच्या ए ६ या सेदान प्रकारच्या मोटारीला नव्या सुविधा व ताकद देऊन तयार करण्यात आले आहे. मोकळ्या चौपदरी डांबरी रस्त्यावर ताशी तब्बल १८० किलोमीटर इतक्या वेगाने ही मोटार अतिशय भक्कमपणे व आत्मविश्वासाने धावली, अगदी पोटातील पाणीही न हलू न देता सेदानची चाल सुरक्षित आणि शाही प्रवासाची होतीच  व आधुनिक शास्त्रीय सुविधेच्या सहाय्याने तिचे सारथ्य करतानाही पूर्ण नियंत्रणबद्ध अशी राहू शकली.
पूर्णपणे ऑटोगीअर असणारी ए-६ ची ही विशेष आवृत्ती सध्याच्या उपलब्ध असणाऱ्या ए ६ पेक्षा अधिक काही देऊ करणारी आहे. यामध्ये युरोपात असलेल्या ए ८ या ऑडीच्या सेदानमधील काही सुविधाचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये वातानुकुलीत यंत्रणा, एमएमआय रिमोट नियंत्रणाची सुविधा, चालकाच्या शेजारील आसनाला मागे बसलेल्या प्रवाशालाही ते आसन रिक्त असताना वा नसताना पुढे मागे करून घेण्याची सुविधा आदी सुविधांचा समावेश आहे. १९६८  सीसी  (ए६ -२.० टीडीआय)व २९६७ सीसी (ए६ – ३.० टीडीआय) अशा प्रकारच्या टीडीआय इंजिन सुविधा असणारी दोन स्वतंत्र श्रेणीमध्ये ही मोटार उपलब्ध करण्यात आली आहे.
स्पोर्ट ड्राइव्ह पर्याय वापरला तेव्हा क्षणार्धात वेग घेण्याची क्षमता ३००० सीसी च्या इंजिनात होती. इंजिनाचा विशिष्ट पद्धतीने येणारा आवाज त्या मोटारीच्या ताकदीचा अंदाज देतो व त्या इंजिनाची ताकद किती प्रबळ आहे, याचाही अंदाज सहज पणे येतो. आतील सर्व व्यक्तींना बसण्यासाठी असणारी आरामदायी सुविधा, वातानुकूलीत यंत्रणेचा सर्वांना पाहिजे त्या प्रकाराने वापरण्याची सुविधा, सुरक्षिततेसाठी देण्यात येणाऱ्या आठ एअरबॅग्ज, रस्त्याची स्थिती जशी आहे, त्यानुसार एअर सस्पेंशनमध्ये आपोआप होणारे बदल, त्यामुळे मोटारीत बसणाऱ्याला खराब रस्त्यातही न बसणारे झटके, रात्रीच्यावेळी असणारे हेडलॅम्प हे लेड हेडलाइट असून त्यामुळे रस्ता अतिशय सुस्पष्टपणे दिसतो, त्याच्या उंच सखलपणाचीही कल्पना येते. अद्ययावत अत्याधुनिक सुविधेने नटलेली ही ए ६ सेदान ताकदीच्यादृष्टीने एसयुव्ही सारखी आहे पण आरामदायी म्हणून सेदानचे सौख्य देणारी आहे. अद्ययावत, अलिशान, अत्याधुनिक अन् आरामदायी सेदान असेच ए ६ चे वर्णन करावे लागेल.

तांत्रिक वैशिष्टय़े
इंजिन : व्ही ६ इंजिन, ९० अंश व्ही अँगल, ४ सिलेंडर्स, २९६७ सी सी,
कमाल ताकद : १८० किलोव्ॉट (२४५ हॉर्स पॉवर४०००-४५०० आरपीएम
कमाल टॉर्क : ५०० आयबी- १४०० – ३२५० आरपीएम
कॉमन रेल इंजेक्शन सिस्टिम : (प्लेझो इंजेक्टर्स) टबरे चार्जर्स इंटरकूलरसह
ट्रान्समिशन : क्वॉत्रो कायम फोर व्हील ड्राईव्ह सेल्फ लॉकिंग क्राऊन गीअर सेंटर
डिफ्रेन्शियल, / ट्रान्समिशन टाईप : ७ स्पीड एस ट्रॉनिक इलेक्ट्रो हायड्रोलिक नियंत्रण
दोन हायड्रोलिक नियंत्रणाचे  मल्टिप्लेट क्लच
लांबी/रुंदी/उंची/व्हीलबेस (सर्व एमएम मध्ये) : ४९१५/१८७४/१४६८/२९१२
सस्पेंशन : फ्रंट- फाइव्ह लींक, डबल अप्पर व लोअर विशबोन्स, अँटी रोल बार, कंटिन्यूअस डॅम्पिंग कंट्रोल (सीडीसी) शॉक अ‍ॅब्सॉर्बर्स, / रेअर – सेल्फ ट्रॅकिंग ट्रॅपेझोडिअल लींक अ‍ॅक्सल विशबोनसह, कंटिन्यूअस डॅम्पिंग कंट्रोल (सीडीसी) शॉक अ‍ॅब्सॉर्बर्स,
ब्रेक : फ्रंट- डय़ुएल सर्किट ब्रेक डायग्नोअल स्प्लीट, ईएसपी, ब्रेक सव्हरे हायड्रॉलिक असिस्ट, व्हेन्टिलेटेड डिस्क, अ‍ॅल्युमिनिअम, कंपोझिट फिक्स कॅलिपर. / रेअर- व्हेन्टिलेटेड डिस्क, कास्ट फिक्स कॅलिपर्स इलेक्ट्रोमेकॅनिकल पार्किंग ब्रेक.
व्हील्स : ८.० जेएक्स १७ लाइटवेट फोर्जड् अ‍ॅल्युमिनिअम व्हील
टायर्स : २२५/५५ आर १७
मूल्य : ४६ लाख ३३ हजार रुपये (एक्स शोरूम दिल्ली) जकात, कर, नोंदणी, विमा आदी बाबी अतिरिक्त

माहिती
मनोरंजनाची सुविधा
* ६ सी डी चेंजर किंवा डीव्हीडी चेंजर
* ऑडी साऊंड सिस्टिम किंवा बोस कंपनीची साऊंट सिस्टिम पर्याय
* म्युझिक इंटरफेस
* ब्लू टूथ इंटरफेस
* चालकासाठी लागणारी विविध माहिती व त्यासाठी ७ इंचाच्या रंगीत स्क्रीनची सुविधा
* एमएमआय रेडिओ प्लस, ६.५ इंचाचा स्क्रीन
* एमएमआय रिमोट
* व्हॉइस डॉयलॉग,
* नेव्हिगेशन सिस्टिम

जादुई चावी
ए ६ ची विशेष आवृत्ती ही ‘अत्याधुनिकपणेच’ सुरू करावी लागते हे एक वैशिष्टय़ आहे. सेन्सर असणारी ए ६ या नव्या मोटारीची चावी कोणत्याही खाचेत न घालता केवळ खिशात ठेवून तुम्ही मोटारीत प्रवेश करता आणि खिशाबाहेरही चावी न काढता मोटार सुरू करता. समोर दिलेल्या मीटरवरील नोंदी, व बटणांचे दिवे याकडे फक्त नजर असूदे नंतर ऑटो गीअरच्या कळा ड्राइव्ह व स्पोर्ट पद्धतीने टाकत जाता येते आणि मोटारीला पाहिजे त्या वेगासाठी एक्सलरेटरवर पाय दाबत व ब्रेकवर, स्टिअरिंगवर  नियंत्रण ठेवीत मोटार पुढे सरकवा. इतक्या सोप्या पद्धतीने वाहन चालविण्याचा अनुभव. रस्ता मोकळा दिसताच अगदी झटकन गती घेण्यासाठी एक्सलरेटरवर फक्त पाय रेटा तो देखील हळूवारपणे. कुठेही घाई न करता सहजपणे मोटार चालविण्याचा अनुभव या अत्याधुनिकतेमुळे येतो. तुम्ही मोटार चालविण्यापूर्वी तुमची आसन स्थिती, स्टिअरिंग वरखाली करण्याची व ते जुळविण्याची स्थिती, आरशांचा आवश्यक कोन ही स्थिती निश्चित केली व ही सारी जुळणी तुम्हाला वाहनचालनासाठी सुयोग्य वाटली तर फक्त ती सेव्ह करा, त्यानंतर तुम्ही मोटारी बाहेर आल्यानंतर पुन्हा मोटार चालविण्यासाठी आत प्रवेश कराल तेव्हा तुमची ही निवडलेली स्थिती आपोआप तेथे जुळवून घेतली जाते. दोन चाव्या तुम्हाला मिळतात. त्यावर प्रत्येकी दोन पद्धतीच्या या स्थिती निश्चितीची रचना साठवता येते. तुमची चावी म्हणजे एकप्रकारचे इलेक्ट्रॉनिक गॅजेटच म्हणावे लागते. तुम्ही मोटारीजवळ येताच तुमच्याकडे खिशात असणारी चावी आपोआप तुम्हाला मोटारीत बसण्यासाठी संकेतबद्धकरून मोटार खुली करते. तुम्हाला केवळ दरवाजाच्या मूठ खेचून दरवाजा उघडावयाचा असतो. तुम्ही बाजारातून खरेदी केली हातात सामान असेल तर मागील डिक्कीत ते सामान ठेवण्यासाठी तुम्ही केवळ डिक्कीपुढे जा व पाय त्याखाली फक्त घ्या डिक्कीचे दारही तुम्हाला मूठ न खेचता आपोआप उघडले जाते, ज्यावेळी तुमचे हात सामानामुळे अडकलेले असतील तरी सामान जमिनीवर न ठेवता ते थेट डिक्कीत ठेवण्याची ही व्यवस्था आहे. साान डिक्कीत ठेवताना चावी चुकून सामानाच्या पिशवीत राहिली गेली व आत राहिली तर डिक्की बंद होत नाही, तुम्हाला ती चावी ताब्यात घेऊन डिक्की बाहेर असल्याची खात्री या सेन्सर्सना करून द्यावी लागते. तरच ती डिक्की बंद होते. थोडक्यात चावीच्या या नजाकतीमुळे तुमची मोटार चोराने तुम्हाला धक्का मारून चोरली व चावी तुमच्याकडे असेल तर चोर काही अंतरापर्यंतच जाऊ शकेल, नंतर गाडी बंद पडेल. चावी खिशाबाहेर काढण्याचीही गरज नाही.

ऑडीची वैशिष्टय़े
* क्वॉत्रो म्हणजे फोरव्हील ड्राइव्ह या प्रकारची ही मोटार असून स्पोर्टसाठी हे क्वॉत्रो वापरले जाते.
* मागील व पुढील चाकांना ६०/४० अशा टक्केवारीत इंजिनची ताकद विभागलेली असून त्यामुळे रस्त्यावर आवश्यक तेव्हा लागणारी गती, ताकदीची विभागणी आपोआप केली जाण्याचे तंत्र यात वापरले गेले आहे.
* स्पोर्टी एस ट्रॉनिक असणारे इंजिन हे वाइड गीआर रेशो असणारे व अंतर्गत ज्वलनही तरी कमी करणारे आहे. त्यामुळे सेदानच्या प्रभावीपणाला चांगली गती मिळाली आहे.

* अंतर्गत सौंदर्य आणि आरामदायी रचना
* अंतर्गत प्रकाशयोजनेमुळे पुरेशा प्रकाशाबरोबरच सुस्पष्टताही येते
* आरामदायी व मोकळेपण देणारी अंतर्गत रचना
* एमएमआय रेटिओ ऑपरेटिंग सिस्टिम त्यात मिळणारी ६.५ वा पर्याय ८ इंचाचा स्क्रीन
* बहुकार्यात्मक स्टिअरिंग व्हिल
* ‘बोस’ची साऊंड सिस्टिम
* क्रूझ नियंत्रण
* छोटे महत्त्वाचे सुटे भागही अ‍ॅल्युमिनियम वा उच्च दर्जाच्या पोलादाद्वारे तयार
* क्झेनॉन प्लस लेड टेल लाइट
* अत्याधुनिक चासी
* इलेक्ट्रोमेकॅनिकल पॉवर स्टिअरिंग
* मेटॅलिक रंग
* १० आरे असणारी १७ इंची अलॉय व्हील
* स्मृतिपटलासह असणारे आरसे
* हेडलॅम्प व वायपरसाठी सेन्सर
* पर्यायात्मक एअर सस्पेंशन
* स्काय रूफ
* इलेक्ट्रिक ग्लास रूफ
* चालकाचे आसन इलेक्ट्रिक ताकदीद्वारे नियंत्रित त्यात मेमरी सुविधेचा समावेश (स्मृतिपटलाचीही साथ)
* फोर झोन ऑटोमॅटिक एअरकंडिशन
* कम्फर्ट की

एप्रिल २०१३ या महिन्यात ऑडी इंडियाच्या ७७० मोटारी विकल्या गेल्या असून ३७ टक्के विक्री वृद्धी साध्य केली गेली. २०१२-२०१३ या आर्थिक वर्षांत ९३५० मोटारी विकल्या गेल्या. देशभरात विक्रीचे हे मापक लक्षात घेऊन या वर्षांच्या अखेरीपर्यंत विक्रेत्यांची संख्या ३४ पर्यंत जाणार असून त्या देशाच्या विविध भागांचा समावेश आहे.  या आर्थिक वर्षांमध्ये चीननंतर आशिया खंडात भारत ही ऑडीच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ ठरली आहे.  यामुळेच २०१३ हे वर्ष ऑडीसाठी स्पर्धात्मक असेच ठरणार आहे, असे ऑडी इंडियाचे भारतातील प्रमुख मायकेल पश्र्क यांनी सांगितले.