‘राधा ही बावरी’ या मालिकेतील भूमिकेमुळे घराघरांत पोहोचलेला अभिनेता सौरभ गोखले आता ‘परतु’ आणि ‘शिणमा’ या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांसमोर येणार आहे. परतु हा चित्रपट जगभरातील विविध चित्रपट महोत्सवांमध्ये दाखविण्यात आला असून गाजला आहे. सौरभला ड्रायव्हिंगची नितांत आवड आहे.

सौरभ गोखले
टीव्ही मालिका, नाटक, चित्रपटाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी जावे लागते. ड्रायव्हिंग हे माझे ‘पॅशन’ आहे. ड्रायव्हिंगची प्रचंड आवड असल्यामुळे अनेक गाडय़ा मी हौसेने चालविल्या आहेत. छोटय़ा हॅचबॅक कारही मी चालविल्या आहेत. माझ्याकडे आधी फियाट पुन्टो ही गाडी होती. तीही मी भरपूर चालवली आहे. परंतु माझे ‘पॅशन’ हे खरे तर स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकलचे आहे. एसयूव्ही गाडय़ा खूप बळकट, भरपूर अवाढव्य आणि विशेषत: शहराबाहेरील रस्त्यांवर बिनधास्त आणि मनसोक्तपणे चालविण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. त्यातही टाटा मोटर्सशी माझे एक निराळे नाते आहे असे म्हटले तरी चालेल. माझे आई-बाबा आणि मीसुद्धा काही काळ टाटा मोटर्समध्ये नोकरी केली आहे. त्यामुळे टाटा मोटर्सच्या सर्व गाडय़ा आणि मॉडेल्सची मला चांगली जाण आहे. एसयूव्हीची आवड असल्यामुळे लहानपणापासूनच मला एसयूव्ही प्रकारातील टाटा सफारी आणि त्यातही स्टॉर्म या मॉडेलची गाडी कधी ना कधी तरी आपल्याकडे हवी असे वाटायचे. हे माझे स्वप्न दीड वर्षांपूर्वी पूर्ण झाले. साधारण ११ लाख रुपयांना टाटा सफारी स्टॉर्म सिल्व्हर रंगाची गाडी मी घेतली. पुण्यात-मुंबईतच नव्हे तर सर्व ठिकाणी जाण्यासाठी मी ही गाडी वापरतो. ‘परतु’ या चित्रपटाचे चित्रीकरण राजस्थानमध्ये करण्यात आले आहे. म्हणून टाटा सफारी स्टॉर्म घेऊन मी राजस्थानपर्यंत ड्रायव्हिंग करण्याचा मनसोक्त आनंद लुटला आहे. लहानपणापासूनचे एसयूव्हीचे माझे एक स्वप्न साकार झाले, याचा मला निश्चितच आनंद वाटतो. अल्टिमेट ड्रीम कार अर्थात एसयूव्ही प्रकारातील गाडी कोणती असे विचाराल तर मी नक्कीच ‘हमर एच २’ या एसयूव्ही गाडीचे नाव निश्चितच घेईन. जनरल मोटर्स या जगविख्यात कंपनीची हमर ही एसयूव्ही लोकप्रिय ठरली होती. सध्या हमर एच २ हे मॉडेल उपलब्ध आहे. त्यांच्या हमर या मॉडेलच्या गाडय़ा अमेरिकन लष्करासाठीच वापरल्या जातात. कमर्शिअल उपयोगासाठी एच २ हे मॉडेल आहे. जेव्हा शक्य असेल तेव्हा हमर एच २ या मॉडेलची एसयूव्ही मला घ्यायला नक्कीच आवडेल.

शब्दांकन – सुनील नांदगावकर